पहिले पान | अर्थजगत | सर्व क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न

सर्व क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा गोषवारा...

गेल्या वर्षी फेब्रुवारीत हंगामी आणि जुलैमध्ये नियमित वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. तेव्हा भारतातच नव्हे; जागतिक अर्थव्यवस्थांवर मंदीचे आणि पर्यायाने अनिश्चिततेचे सावट होते. आर्थिक वृद्धी कायम राखण्याला मर्यादा पडल्या होत्या. आर्थिक पेचप्रसंग कसा सोडवायचा तसेच याचा परिणाम टाळून अर्थव्यवस्थेची गती कशी राखायची, याची चिंता होती; परंतु मी आज विश्वासाने सांगू शकतो की, आर्थिक मंदीच्या संकटावर आम्ही मात करू शकलो. भारताची अर्थव्यवस्था गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खूप चांगली आहे.

 नऊ महिन्यांपूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीपेक्षा आजची आव्हाने कमी आहेत, असा याचा अर्थ नाही. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी तीन प्रमुख आव्हानांचा उल्लेख केला होता. पहिले आव्हान नऊ टक्के विकासदर पुन्हा गाठण्याचा आहे. तो गाठल्यावर दोन आकडी दराचा पल्ला गाठायचा हेही लक्ष्य आहेच. त्यासाठी विकास प्रक्रिया व्यापक व गतिमान होण्यासाठी मी इंद्रदेवाची प्रार्थना करतो. दुसरे आव्हान आर्थिक विकास सर्वसमावेशक करण्याचे आहे. कारण त्यानेच आम्हाला सामर्थ्य लाभते. त्यासाठी ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचे जाळे उभारावे लागेल अन् तेही कालबद्ध कार्यक्रमानुरूप. तिसरे आव्हान आमची सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारण्याचे आहे. या पद्धतीतील दोष निवारण करून ती अधिक सूत्रबद्ध आणि कार्यक्षम करण्यासाठी आम्हाला कटिबद्ध व्हावे लागेल. 2009-10 हे आर्थिक वर्ष खूप आव्हानात्मक राहिले. 2008-09च्या उत्तरार्धातील घसरण सकल राष्ट्रीय उत्पन्न 6.7 टक्क्यांवर येण्याला कारणीभूत ठरली, परंतु जागतिक मंदीच्या या तडाख्याला सामोरे जाण्यास भारत यशस्वी ठरला. याचा दृश्यपरिणाम नंतर जाणवेलही. 2009-10च्या पहिल्या तिमाहीतच आपल्या आर्थिक धोरणांना अनुकूलता लाभली. देशांतर्गत उत्पादनांची मागणी वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर वित्त पॅकेजेसचा उपयोग झाला. म. गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसारख्या उपायांमुळे लोकांची आमदनी वाढविता आली. 2010-11चे आर्थिक धोरण ठरविताना मी १३व्या वित्त आयोगाच्या शिफारशी विचारात घेतल्या आहेत. 2014-15पर्यंत केंद्र आणि राज्यांची एकूण कर्जाची सीमा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 68 टक्क्यांपर्यंत ठेवण्याची शिफारस आयोगाने केली आहे.

करप्रणाली सरल करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, हे सांगायला मला आनंद वाटतो. या प्रणालीत किमान अपवाद असतील अन् करांचे दरदेखील कमी राखण्यावर भर देण्यात आला आहे. आगामी एक एप्रिल 2011 पासून ती लागू केली जाईल. वस्तू आणि सेवाकरांच्या रचनेवरसुद्धा व्यापक सहमती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

निर्गुंतवणूक

 गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना मी सार्वजनिक उद्योगांच्या निर्गुंतवणुकीत म्हणजेच मालकी, भागीदारी व विकासात सामील होण्याचे जनतेला आव्हान केले होते. यंदा सरकार या माध्यमातून 25,000 कोटी रुपये उभे करणार आहे. पुढील आर्थिक वर्षात त्याहून अधिक निधी मिळावा, असा प्रयत्न राहणार आहे.

खत उद्योगाला सबसीडी (आर्थिक साह्य) देण्याबाबत मी गेल्या वर्षी नव्या धोरणाबाबत म्हटले होते. पोषणाधारित सबसिडी धोरण सरकारने आखले असून येत्या एक एप्रिलपासून ते अंमलात येईल. या क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. उपरोक्त दोन धोरणांसोबतच पेट्रोलियम पदार्थाच्या मूल्य निश्चितीचे टिकाऊ आणि व्यवहार्य धोरण ठरण्याचे गेल्या साली जाहीर केले होते. त्यासंदर्भात किरीट पारेख यांच्या नेतृत्वाखालील समितीने शिफारशी केल्या असून या खात्याचे मंत्री त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतील.

 

जागतिक मंदीचे सावट राहूनही भारतातील विदेशी भेट गुंतवणुकीचा ओघ स्थिर राहिला. एप्रिल ते डिसेंबर 2009 या काळात 20.9 अब्ज डॉलर एवढी थेट गुंतवणूक झाली. त्यापूर्वीच्या वर्षात त्याच काळात ती 21.1 अब्ज डॉलर होती. विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढता राहावा यासाठी ही प्रक्रिया अधिक सरल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आर्थिक मंदीतही भारतीय बॅँका सुदृढ राहिल्या. बॅँकिंग पद्धती सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याबरोबरच काही खासगी बॅँकांना परवानगी देण्यावर रिझव्‍‌र्ह बॅँक विचार करीत आहे.

 

विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)

 

आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सेझ (विशेष आर्थिक) क्षेत्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशांतर्गत व परकीय गंतवणूकसुद्धा त्यात आकर्षिली गेली आहे. 2009-10च्या पहिल्या तिमाहीतील सेझमधील निर्यातीने 127 टक्के वाढ नोंदवली.

 

कृषी क्षेत्राचा सर्वागिण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि खाद्यान्न सुरक्षितता हे आमच्या धोरणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यासाठी कृषी उत्पादनवाढ, वाया जाण्याचे प्रमाण कमी करणे, शेतक-यांना कर्जपुरवठा आणि प्रक्रिया उद्योग अशी चतु:सूत्री आखण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणजे हरित क्रांतीचा देशाच्या पूर्वेकडील राज्यात विस्तार केला जायचा आहे. बिहार, छत्तीसगढ, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओरिसात ग्रामसभा आणि शेतक-यांच्या प्रोत्साहनातून धान्यवाढीचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. प्रजासत्ताकाच्या हीरक महोत्सवी वर्षात डाळी आण तेलबियांचे उत्पादन करणारी 60 हजार गावे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

 

पायाभूत सोयी-सुविधा या आर्थिक विकासाचा खरा पाया आहे. रस्ते, बंदरे, विमानतळे, रेल्वे मार्ग यांचे व्यापक जाळे उभे करून आर्थिक विकास करण्याच्या हेतूने 2010-11 या वर्षात 1,73,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असून त्याचे दृश्यपरिणाम दिसावे यासाठी रोज 20 किमी अंतराचा महामार्ग उभारणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रेल्वेचे नेटवर्क सुधारण्यासाठी 16,752 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा निधी 950 कोटी रुपयांनी अधिक आहे. ऊर्जानिर्मितीवरसुद्धा भर देण्यात आला आहे. त्यामुळेच या क्षेत्राची तरतूद दुप्पट म्हणजे 5,130  कोटी रु. करण्यात आली आहे. गोवा राज्याच्या सुवर्ण जयंतीनिमित्त तेथील नैसर्गिक सौंदर्याच्या संवर्धनासाठी 200 कोटी रुपयांची तर देशातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विविध योजनांसाठी 22,300 कोटींची तरतूद केली आहे.

 ग्रामविकास हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. ग्रामीण विकासाच्या योजनांसाठी आगामी आर्थिक वर्षात भक्कम म्हणजे 66,100 कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे. म. गांधींच्याच नावे सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून 40,100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुरक्षितता लाभावी म्हणून राष्ट्रीय सुरक्षितता निधी स्थापन करण्यात येणार असून प्रारंभिक तरतूद म्हणून 1,000 रुपये दिले जातील. तसेच दारिद्रय़ रेषेखालील कामगारांसाठी आरोग्य विमा योजना राबविण्यात येणार आहे. सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पावले टाकण्यात येणार आहेत.

 वाढत्या आर्थिक तुटीबद्दल मी यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर यावर सरकार योग्य ती उपाययोजना करील याकडेही लक्ष वेधले आहे. ही तूट कमी करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0