बोंबला...
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे पडसाद उमटू लागले असून खासगी प्रवासी तसेच मालवाहतूकदारांनी भाड्यात वाढ केली आहे.
मुंबई/ नवी मुंबई (प्रतिनिधी/वार्ताहर) पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांनी महागाईच्या आगीत तेल ओतले असून खासगी प्रवासी वाहतूकदारांनी शनिवारी मध्यरात्रीपासून प्रवासी भाडय़ात माणशी 50 ते 200 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. मालवाहतूकदारांनीही आपल्या गाडीभाडय़ात 15-20 टक्क्यांची वाढ केली असून ती मंगळवारपासून अमलात आणली जाणार आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह धान्याचे दरही 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, इंधनदरवाढीवरून केंद्रातील विरोधक आक्रमक झाले असतानाच सत्ताधारी यूपीएतील तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या पक्षांनीही दरवाढ मागे घेण्यासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मात्र, दरवाढ मागे घेतली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने महागाईत वाढ होईल, अशी कबुलीही त्यांनी दिली.तिकिटदरांत दोनशे रुपयांनी वाढ
मुंबई ते पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या कमी अंतरांच्या मार्गावर किमान 50 रुपये आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या 200 रुपये वाढ करण्यात आल्याचे खासगी बस वाहतूकदारांचे नेते निरंजन तायडे यांनी ‘प्रहार’ला सांगितले. पुणे ते नागपूर मार्गावर धावणा-या साध्या खासगी बस वाहतुकीच्या तिकिटाचे दर 500 रुपयांवरून 700 रुपये करण्यात आले आहेत. तर खासगी व्होल्वो बस प्रवासासाठी एक हजार रुपये आकारण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
मालभाड्यात 20 टक्क्यांनी वाढ
मालवाहतूकदारांनीही लांब पल्ल्याच्या वाहतूकदरात 15 ते 25 टक्के वाढ केल्याची माहिती ‘महाराष्ट्र हेवी गुड्स व्हेईकल असोसिएशन’चे महासचिव मोहिंदरसिंग घुरा आणि महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी दिली. दोन दिवस सुट्टी असल्याने मंगळवारपासून ही दरवाढ होणार आहे. जे वाहतूकदार संघटित आहेत त्यांना डिझेल दरवाढीचा फटका फारसा जाणवणार नाही. पण एकदोन वाहने असलेल्या वाहतूकदारांचे मात्र नुकसान होईल, असे घुरा यांनी सांगितले.
भाज्याही 15-20 टक्के महाग?
राज्यभरातून वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा भाजीपाला छोटय़ा छोटय़ा टेम्पोतून मुंबईतील घाऊक बाजारात पोहचवण्यात येतो. अशा टेम्पोच्या भाडय़ात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी किलोमागे आकारण्यात येणारा दर रुपयाने वाढून साडेतीन रुपये प्रतिकिलो गेला आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील भाज्यांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ होणार आहे, अशी माहिती एपीएमसीतील घाऊक भाजी व्यापारी रामदास पवळे यांनी दिली.
काँग्रेस चर्चेस तयार
नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याच्या मुद्दय़ावर तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक हे सहकारी पक्ष आक्रमक बनले आहेत. या विसंवादाचा फायदा भाजपसारख्या विरोधकांना मिळू नये यासाठी या मुद्दय़ावर यूपीएतील घटक पक्षांना विश्वासात घेण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. वेळ पडल्यास अंशत: दरवाढ मागे घेण्याचे सूतोवाचही पक्षातील नेते करत आहेत. काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांच्या शनिवारच्या वक्तव्यानंतर दरवाढीबाबत पक्ष लवचिक झाल्याचे जाणवले.ंMarathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा