PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भारतात गुंतवणूक करा भारतात गुंतवणूक करा ================================================================================ पीटीआय on 02 March, 2010 04:45:00 AM रियाध- जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भारतातल्या पायाभूत क्षेत्रापासून ते हास्पिटॅलिटी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सौदीतील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘मजलिस - अल- शुरा’मध्ये (सौदी सल्लागार परिषद) बोलताना केले. पुढील 25 वर्षात देशाचा आर्थिक विकासदर 09 ते 10 टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आर्थिक विकासदर उंचावला तर देशातील लाखो नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढता येईल आणि देशाला जगातील मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न साकार करता येईल. आत्मविश्वास आणि आशावाद अशी देशाची भविष्याची वाटचाल आहे, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात भारताने ९ टक्के विकासदर कायम राखला असून जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणातही चालू आर्थिक वर्षामध्ये साडेसात टक्के विकासदर कायम राखला जाईल, असा आत्मविश्वास पंतप्रधांनी सौदी सल्लागार परिषदेतील मान्यवरांसमोर व्यक्त केला. पायाभूत, निर्मिती, सेवा, हॉस्पिटॅलिटी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सौदीतील गुंतवणूकदारांना संधी असून माहिती-तंत्रज्ञान, बॅँकिंग, दूरसंचार, औषध इत्यादी विविध क्षेत्रे सौदीमध्ये खुली झालेली असल्याने भारतीय कंपन्याही या संधीचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. जवळपास 500पेक्षा संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून सौदी अरेबियामध्ये दोन अब्ज डॉलरपेक्षा जास्त भारतीय गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सौदी हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार देश असून उभय देशातील व्यापारात अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य दृढ 2006 साली राजे अब्दुल्ला यांच्या झालेल्या दिल्ली भेटीनंतर सौदी आणि भारत यांच्यातील निर्यात वाढून ती अगोदरच्या ५० कोटीवरून २३ अब्ज डॉलरवर (२००८) गेली. या निर्यातीमुळे भारताला सर्वात जास्त कच्च्या तेलाची निर्यात करणारा इराण पिछाडीवर पडला. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या या तीन दिवसांच्या भेटीत सौदी अरेबियाने भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठय़ात दुपटीने वाढ करण्याचे जाहीर केले.ं