PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: निर्यातीची सलग तीन महिने भरारी निर्यातीची सलग तीन महिने भरारी ================================================================================ पीटीआय on 03 March, 2010 03:45:00 AM नवी दिल्ली- निर्यात क्षेत्राने घेतलेली भरारी तीन महिन्यांनंतरही कायम असून जानेवारी महिन्यात देशातील निर्यातीत 11.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अगोदरच्या वर्षातल्या 12.86 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यात झालेली 14.34 अब्ज डॉलरची निर्यात म्हणजे जागतिक मंदीचे वारे ओसरल्याचे संकेत आहेत. निर्यातीबरोबरच आयतीमध्येही सलग दुस-या महिन्यात वाढ झालेली आहे. गेल्या वर्षातल्या 18.22 अब्ज डॉलरच्या आयातीच्या तुलनेत ती 35.5 टक्क्यांनी वाढून 24.70 अब्ज डॉलरवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या घसरणीमुळे एप्रिल ते जानेवारी या कालावधीत निर्यातीत घट झाली असल्याचे दिसून आहे. गेल्या तीन महिन्यांपासून निर्यातीत होत असलेली वाढ लक्षात घेता देशातील निर्यातीचे वाईट दिवस संपले असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. फळे आणि भाजीपाला, सागरी उत्पादने आणि तंबाखू या क्षेत्रांनी लक्षणीय कामगिरी जानेवारी महिन्यात केलेली असून चहा, कॉफी, हिरे आणि अलंकार, औषध आणि प्लास्टिक या क्षेत्रांच्या निर्यात कामगिरीत सुधारणा झाली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. परंतु अभियांत्रिकी वस्तू, वस्त्र, कार्पेट, हस्तकला वस्तू आणि चर्मवस्तूंच्या कामगिरीत मात्र अद्याप सुधारणा झालेली नाही.