PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महागाई हा चिंतेचा विषय- पंतप्रधान महागाई हा चिंतेचा विषय- पंतप्रधान ================================================================================ पीटीआय on 05 March, 2010 03:50:00 PM नवी दिल्ली- देशात गेल्या वर्षभरापासून अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती हा अतिशय चिंतेचा विषय असून याला आळा घालण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातील असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. आभारदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. अपुरा मान्सून आणि जागतिक मंदी अशा दोन्ही समस्यांवर मात करून दोन आकडी विकासदर गाठण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर 7.2 ते 7.5 टक्के राहील तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2010-11मध्ये हाच दर आठ टक्क्यांपर्यंत असेल असा विश्वास पंतप्रधान सिंग यांनी व्यक्त केला. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पाया मजबूत असून आर्थिक परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आणि सामाजिक सुविधा चांगल्या प्रकारे उभ्या केल्या तर देशाचा विकासदर दोन आकड्यांवर पोहचण्यात कोणतीच आडकाठी येणार नाही असे पंतप्रधान सिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले.