मुकेश अंबानी पुन्हा सर्वात श्रीमंत भारतीय
पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सलग दुस-या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे.
न्यू यॉर्क-: पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सलग दुस-या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे. 29 अब्ज डॉलरच्या निव्वळ मालमत्तेसह अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत भारतीय ठरले असून जागतिक यादीत ते चौथ्या क्रमांकावर असल्याचे ‘फोब्र्ज’ या नियतकालिकाने म्हटले आहे. मेक्सिकोतील कार्लोस स्लिम (53.5 अब्ज डॉलर) यांनी गेल्या वर्षीच्या सातव्या स्थानावरून उडी मारून जगात सर्वाधिक श्रीमंत ठरण्याचा मान पटकावला आहे.मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी गेल्या वर्षी ‘फोब्र्ज’च्या क्रमवारीत 34 व्या स्थानावर होते. ते आणखी दोन पाय-या खाली घसरत 36 व्या स्थानावर आले आहेत. वर्षभरात संपत्तीत 3.6 अब्ज डॉलरची भर घालणाऱ्या अंबानी यांची निव्वळ मालमत्ता 13 अब्ज डॉलर झाली आहे.
मुकेश अंबानी यांच्यापाठोपाठ 28.7 अब्ज डॉलरच्या निव्वळ मालमत्तेसह पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल पाचव्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी आपल्या संपत्तीत नऊ अब्ज डॉलरची भर घातली आहे. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी गेल्या वर्षीच्या स्थानात 83 जागांनी सुधारणा आणि 17 अब्ज डॉलरच्या मालमत्तेची नोंद करत 28 वे स्थान पटकावले आहे. एस्सार समूहाचे प्रवर्तक शशी आणि रवी रुईया यांनीही प्रगती साधत गेल्या वर्षीच्या 86 व्या स्थानावरून यंदा 40 वे स्थान पटकावले आहे.
भारतीय अब्जाधीशांच्या संकलित मालमत्तेत 118.9 अब्ज डॉलरची वाढ होऊन ती 227.9 अब्ज डॉलवर गेली आहे. ‘फोब्र्ज’ नियतकालिकाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या श्रीमंतांच्या यादीतील भारतीय श्रीमंतांची संख्या गेल्या 24 वर्षात दुपटीने वाढून 50 झाली आहे.


Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा