एलआयसीची नवी ‘युलिप’ योजना
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने आपला 54वा वर्धापनदिन साजरा केला. यानिमित्त एलआयसीने नवी युलिप योजना बाजारात आणली आहे.
मुंबई- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने आपला 54वा वर्धापनदिन साजरा केला. यानिमित्त एलआयसीने नवी युलिप योजना बाजारात आणली आहे. ‘पेन्शन प्लस’ असे योजनेचे नाव असून ही योजना दोन तारखेपासून लागू करण्यात आली आहे.
‘असोचेम’च्या एका परिषदेत एलआयसीचा 54वा वर्धापन दिन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. हा वर्धापन सोहळा आठवडाभर चालणार आहे. यावेळी ‘असोचेम’च्या अध्यक्ष स्वाती पिरामल आणि एलआयसीचे अध्यक्ष टी. एस. विजयन उपस्थित होते.
‘पेन्शन प्लस’ योजनेत प्रत्यक्ष आयुर्विम्याचे संरक्षण दिले जात नाही. त्याऐवजी पॉलिसीधारकाला उपलब्ध दोन फंडांपैकी एका फंडात पैसे गुंतवण्याचा पर्याय दिला जातो. पॉलिसीधारकाने प्रिमियम भरल्यानंतर फंडाचे अॅलोकेशन चार्जेस वजा करून उरलेल्या रकमेचे युनिट्स खरेदी केले जातात. एका पॉलिसी वर्षात गुंतवणूकदार (पॉलिसीधारक) दोन्ही फंडांमध्ये आलटून पालटून (स्विच) दोनदा गुंतवणूक करू शकतो. 18 ते 75 वर्षे वयाची व्यक्ती पेन्शन प्लस ही पॉलिसी घेऊ शकते. 54 वर्षानंतर एलआयसीचे विमा व्यवसायातील वर्चस्व अबाधित राहिले आहे. विमा व्यवसायातील एलआयसीचा हिस्सा 71.33 टक्के आहे. 1956मध्ये एलआयसीकडे 348.68 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यात वाढ होऊन या वर्षी ही मालमत्ता 11 लाख 52 हजार 57 कोटी रुपये झाली आहे. 2009-10 या वर्षात एलआयसीने एक लाख 85 हजार 986 कोटी रुपये प्रिमियम जमा केला होता. याच वर्षात एलआयसीचे एकूण उत्पन्न दोन लाख 98 हजार 721 कोटी रुपये होते. याच वर्षात कंपनीने 2.11 कोटी दाव्यांची पूर्तता केली होती. वर्धापनदिनानिमित्त पेन्शन प्लस पॉलिसी आणून एलआयसीने खुल्या बाजारातही आपले वेगळे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा