PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आरबीआय भांडवल पुरवठा कमी करणार? आरबीआय भांडवल पुरवठा कमी करणार? ================================================================================ पीटीआय on 28 January, 2010 08:00:00 PM मुंबई- वाढत्या महागाईला आळा घालण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून भांडवल पुरवठा आखडता घेणार असल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाला धक्का न लावता महागाई दर आटोक्यात आणणे आव्हानात्मक असल्याचे बँकेने नमूद केले आहे. सध्या महागाई अन्नधान्यापुरती मर्यादित असली तरी लवकरच अन्य वस्तूंचे दरही प्रमाणाबाहेर वाढण्याचा धोका आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्यासाठी बाजारातील रोखता कमी करण्याचे संकेत बँकेने दिले आहेत. बाजारातील भांडवलाचे प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक साधारणपणे रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर)., वैधानिक रोखता प्रमाण (एसएलआर) आदींमध्ये वाढ करते. त्यामुळे शुक्रवारी जाहीर होणा-या तिमाही पतधोरणातही सीआरआर, एसएलआरमध्ये वाढ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.