महागाई लवकर आटोक्यात येणे कठीणच!
अन्नधान्य महागाई दर चार ते पाच टक्क्यांवर आणण्याची आवश्यकता असून हे भारतापुढील मोठे आव्हान आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के सी चक्रवर्ती यांनी सांगितले.
सिडनी/नवी दिल्ली- अन्नधान्य महागाई दर चार ते पाच टक्क्यांवर आणण्याची आवश्यकता असून हे भारतापुढील मोठे आव्हान आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के सी चक्रवर्ती यांनी रविवारी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचे दर एवढ्यात खाली येणार नाहीत, असे संकेतही त्यांनी दिले.
महागाई दर खाली आणण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये ढिलाई आणणे देशाला अजिबात परवडण्याजोगे नाही, असे चक्रवर्ती यांनी सिडनी येथे दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. अन्नधान्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहायला हवे असतील, तर महागाई दर चार ते पाच टक्क्यांच्या वर जाता कामा नये आणि सध्या तरी ते खाली येणे कठीण आहे, असे चक्रवर्ती म्हणाले. देशातील अन्नधान्य महागाई दर 23 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 17.56 टक्के होता.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) पाऊण टक्क्याने वाढवून बाजारातील रोखता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 2011 किंवा जास्तीत जास्त 2012 पर्यंत महागाई दर चार ते पाच टक्क्यांवर येईल, अशी आशा रिझर्व्ह बँकेला आहे, असे चक्रवर्ती म्हणाले.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा