एनटीसी विकणार मुंबईतील 55 एकर जमीन
चालू आर्थिक वर्षात मुंबईतील 55 एकर अतिरिक्त जमीन विकून पाच हजार कोटी रुपये उभे करण्याची एनटीसीची योजना आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) चालू आर्थिक वर्षात मुंबईतील 55 एकर अतिरिक्त जमीन विकून पाच हजार कोटी रुपये उभे करणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनी गुरुवारी मुंबईत ही माहिती दिली. मुंबईतील पोद्दार गिरणीच्या मालकीची अतिरिक्त जमीन विकण्यासाठी गुरुवारी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू झाली. पोद्दार गिरणीच्या 2.39 एकर जागेसाठी पहिल्याच दिवशी 284 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. ही लिलाव प्रक्रिया पुढील दोन दिवस चालणार आहे.
मुंबईतील अतिरिक्त जमीन विकून पाच हजार कोटी रुपये उभारण्याची एनटीसीची योजना आहे, असे मारन म्हणाले.
भारत आणि पोद्दार मिलच्या मालकीची जमीन विकून दोन हजार कोटी रुपये मिळतील, तर आणखी सहा गिरण्यांच्या मालकीची अतिरिक्त जमीन विकून तीन हजार कोटी रुपये मिळतील, असं वस्त्रोद्योग खात्यातील एका अधिका-याने सांगितले. यापैकी पोद्दार गिरणीच्या मालकीची जागा विकण्यासाठी लिलावाची प्रक्रिया शनिवारपर्यंत चालू राहील, तर भारत गिरणीच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया चार ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
पोद्दार गिरणीच्या मालकीची जागा विकत घेण्यासाठी एनबीसीसी या सरकारी कंपनीसोबत इंडियाबुल्स इन्फ्राटेक आणि लोढा फार्म्स या कंपन्यांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला आहे. भारत गिरणीच्या जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत इंडियाबुल्स इन्फ्राटेक, व्हिडियोकॉन रियलिटीज, लोढा डेव्हलपर्स या कंपन्या भाग घेणार आहेत.
एनटीसीने गेल्या चार वर्षांत जमिनीच्या विक्रीतून चार हजार कोटी रुपये उभे केले आहेत. मुंबई तसेच देशाच्या अन्य शहरांतील 26 जागा एनटीसीने विकल्या आहेत, असे एनटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के रामचंद्रन पिल्लई यांनी सांगितले. जमिनींच्या विक्रीतून उभा केलेला पैसा एनटीसीचा विकास एक एकात्मिक वस्त्रोद्योग कंपनी म्हणून करण्यासाठी होत असल्याचे ते म्हणाले. जिनिंग, कताई, विणकाम, कापडावर प्रक्रिया करणे तसेच तयार कपड्यांची निर्मिती या कापड उद्योगाच्या सर्व बाजूंचा विकास करण्यासाठी हा पैसा वापरला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनटीसीकडे सध्या मुंबई, इंदूर, कोइंबतूर या शहरांमध्ये तसेच कर्नाटक राज्यात मिळून 1,300 एकर अतिरिक्त जमीन आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा