पाइपलाइन लाइफलाइन
तानसा-वैतरणा परिक्षेत्राची सहल म्हणजे विशाल जलाशय आणि वनवैभव दाखवणा-या वन पर्यटनाची भटकंती. त्यातून निर्सगवाचन करत ऋतुचक्राशी संवाद साधायचा, म्हणजे मग मुंबईची जीवनरेखा म्हणून परिचित तानसा-वैतरणा अर्थात मोडकसागरकडेही ‘पर्यटन’ म्हणून पाहता येते.
कोणत्याही संस्कृतीचा विकास होताना तेथील जलस्रेतांचा सहभाग ही तर त्यांची प्राथमिक गरज. हजारो वर्षापूर्वीदेखील आर्यानी नदीकाठच्या विशाल भूप्रदेशाची निवड करून संपन्न संस्कृतीचा वारसा आम्हाला दिला. थोडक्यात काय तर पाणी म्हणजे जीवन हे सर्वसामान्य आहे.
आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या ब्रिटिशांच्या दूरदृष्टीमुळे मुंबईत व्यापारवृद्धी व्हायला लागल्यावर साहजिकच लोकवस्ती वाढायला लागली. त्यातून पाणीपुरवठय़ाच्या प्राथमिक गरजेतून 1885मध्ये जलस्रेत शोधयात्रेला सुरुवात झाली. आजच्या विहार तलावाच्या संवर्धन-विकासाला याच काळात चालना मिळाली.
औद्योगिक मुंबई विस्तारताना पाण्याची गरजही वाढत होती. त्यासाठी मुंबईपासून 103 किमीवरील पूर्व ठाणे जिल्ह्यातील वन समृद्धीनी वेढलेल्या ठिकाणी तानसा नदीवर 1892 मध्ये तानसा जलाशयाची निर्मिती झाली. सहा दशकांचा काळ गेल्यावर वाढत्या लोकवस्तीबरोबर पाण्याची तहानही वाढली. तानसा अपुरा पडायला लागल्यावर स्वातंत्र्योत्तर काळात 1954 साली तानसानजीक 16 किमीवरील वैतरणा नदीवर मजबूत बंधारा घालून या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा व्हायला लागला. मुंबई वस्तीत स्थापत्त्य विशारद ना. वि. मोडक हे या प्रकल्पाचे शिल्पकार असल्याने त्यांच्याच नावाने ‘मोडक सागर’ म्हणून हे जलक्षेत्र महशूर आहे.
मुंबईपासून 120 किमीवरील 1954 साली उभारलेल्या या अजस्त्र धरणाची लांबी 548 मीटर असून धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 450 चौ.किमी इतकी प्रचंड आहे. या धरणाच्या कठड्यालगतचे विश्रामधाम आणि विविध फुलझाडांनी वेढलेला हा परिसर तर नामी आहे, येथील हिरवाई आणि गार हवेवरील निरव शांतता दुर्मीळ आहे. येथे पाण्याची मुबलकता असल्याने उंचच-उंच वाढलेल्या वृक्षांच्या पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा संचार आपल्याला अनुभवता येतो. येथील वनसंपदा आणि फुलांच्या संवर्धनातून नैसर्गिक वातावरणाचा बाज सांभाळला गेला आहे. दुर्मीळ शांततेच्या पार्श्वभूमीवरील विशाल जलाशय अनुभवण्यासाठी टोलेजंग धरणाच्या भिंतीवरून चालण्याचे श्रम जाणवतच नाहीत. धरण क्षेत्रातून सोडलेल्या अजस्त्र पाणी प्रवाहाचा धीरगंभीर आवाज ऐकत सृष्टीचे औदार्य आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचा मानवनिर्मित चमत्कार अनुभवण्यासाठी येथे दिवसभरात केव्हाही यावे.
खरे तर तानसा-वैतरणा जलसंपत्ती ही तशी सह्याद्री पर्वतराजाची निसर्गकृपा आहे. दख्खन-पश्चिमेकडून येणारे पर्जन्य अनुकूल असे मोसमी वारे अगडबंब सह्याद्री आपल्या अंगावर खेळवतो, परिणामी पर्वतरांगेतील मुंबई-पुणे प्रदेश परिसरावर वरुणराजाची मेहरनजर आहे. येथे दरसाल अडीच ते तीन हजार मिली मीटर इतका प्रचंड पाऊस कोसळतो. त्यामुळे पाण्याबरोबर वनसंपत्तीची येथे कमतरता नाही.
वन विभागाने तानसा परिसर संरक्षित वनविभाग म्हणून घोषित केलाय. 216.75चौ.किमीचा हा विस्तीर्ण परिसर साग, हिरडा, वड, बेहडा, खैर, बांबू अशा वृक्षांनी बहरला आहे. सृष्टीचे नियम आणि वेळापत्रक काटेकोर सांभाळणा-या या अभयारण्यात काही वृक्ष मोसमानुसार आपले रंग बदलतात. पाणी आणि जंगलसंपत्ती येथे असल्याने त्याच्या आश्रयाला सांबर, तरस, रानडुक्कर, चितळं, हरणं असे अनेक प्राणी येथे संचार करताहेत. अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा मुक्तसंचार आणि स्थलांतरीत पक्ष्यांचा वावर येथे नेहमीच बघायला मिळतो.
मध्ये रेल्वेवरील आसनगाव स्थानकालगतचे शहापूर हे मुंबईपासून 50 किमीवरील तालुक्याचे ठिकाण, मग येते ते नाशिक मार्गावरील आटगाव. येथून 13 किमी अंतरावरील तानसा जलाशयाकडे जाताना घनदाट वनस्पतींचा सहवास लाभतो. आपल्या वहानालाही झुकलेल्या वृक्षांचा लडिवाळ स्पर्श होत असतो. तानसाकडे मार्गस्थ होताना काही वेळ वाटेत थांबल्यास देवदुर्लभ-दुर्मीळ निसर्ग नजारा अनुभवण्यासारखा आहे. येथे कोणीही निसर्गवाचन करत अंतर्मुख होऊन नतमस्तक होईल, असे दुर्मीळ वातावरण येथे आहे.
तानसा-वैतरणा हा 16 किमीचा रस्ता मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असून येथे येण्याकरिता त्यांच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे. आम्ही ‘बीएमसी’च्या प्रसिद्धी व जनसंपर्क खात्यातर्फे आयोजित पत्रकारांच्या अधिकृत ‘टूर’ला गेलो होतो, हे इथे नमूद करणे आवश्यक वाटते.
कोणत्याही प्रकारचा पर्यटन प्रवास असू द्या. त्या-त्या क्षेत्राचे ऋतुमान हे घटक ध्यानात घ्यावेच लागतात. मुंबई-ठाणे व नाशिकलगतच्या तानसा-वैतरणा सहलीला यायचे तर धुवॉँधार पावसात किंवा पावसाळा संपताना. या परिक्षेत्राची सहल म्हणजे विशाल जलाशय आणि वनवैभव दाखवणा-या वन पर्यटनाची भटंकती आहे. त्यातून निसर्ग वाचन करत ऋतुचक्राशी अंतर्मुख होऊन संवादही साधता येईल.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा