पहिले पान | कोलाज | तेजस्वी शोधयात्रा

तेजस्वी शोधयात्रा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

‘राण्यांचे दक्षिणेतील आगमन’ हे पुस्तक म्हणजे एक शोधयात्राच आहे. कोकण, गोवा. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राणे वंशाचा आणि त्यांच्या इतिहासाचा घेतलेला अभूतपूर्व शोध.

बाबासाहेब पुरंदरे यांनी गेली ५०-६० वर्ष आपल्या प्रखर, तेजस्वी वाणीने पुरा महाराष्ट्र पिंजून महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि त्यांचा स्वाभिमान शिकवला. बाबासाहेबांच्या या शिकवणीतूनच डॉ. रमेश राणे यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सखोल अभ्यास व संशोधन करून  राण्यांचे दक्षिणेतील आगमनहे पुस्तक लिहिले. हे पुस्तक म्हणजे एक शोधयात्राच आहे. कोकण, गोवा. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राणे वंशाचा आणि त्यांच्या इतिहासाचा घेतलेला अभूतपूर्व शोध.

 

राजस्थानातील राजपुतांचा इतिहास स्फूर्तिपद आणि बोधप्रद असा आहे. राजस्थानच्या या सूर्यवंशी सिसोदेकुळातच  कोकण, गोवा, कारवार, गुजरात, चेन्नई, तंजावर आणि नेपाळ येथे पसरलेल्या राणे लोकांचं कूळ आहे. मात्र आपल्या या भव्यदिव्य इतिहासाबद्दल एकूणच औदासिन्य आहे. परिणामी त्याबद्दल अज्ञानही आहे. आपल्या पूर्वजांविषयी असलेलं हे अज्ञान व अनास्था दूर करण्यासाठीच डॉ. रमेश राणे यांनी ऐतिहासिक साधनांचा धांडोळा घेतला. त्यातूनच सिसोदे, केलवाडा, चितोडगड, उदयपूर आणि अरवलीच्या पर्वतमय प्रदेशातून म्हणजेच राजस्थानमधून निघालेल्या राण्यांचा समग्र इतिहास रमेश राणेंच्या डोळ्यासमेर उलगडत गेला आणि तोच इतिहास साधार लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण हा इतिहास लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच यश्स्वी झालेला आहे.

 

लेखक रमेश राणे यांची ही शोधयात्रा तब्बल वीस वर्ष सुरू होती. सुरूवातीला एक छंद म्हणून त्यांनी मिळालेल्या माहितीची टाचणंही लिहून ठेवली होती. मात्र नंतर त्यांनी इतिहासाची साक्ष पटविण्यासाठी राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातील संबंधित गावांना भेटी दिल्या. जेथे जेथे राणे समाज राहतो त्या गावात ते जाऊन पोहोचले. तेथील स्थळांची छायाचित्रं टिपली. तेथे भेटलेल्या जुन्याजाणत्या वृद्ध लोकांच्या भेटी घेऊन, त्यांच्याकडून मिळालेली माहिती संकलित करून ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहिली. संदर्भ साहित्य गोळा करून अनेक हिंदी, मराठी, गुजराती व इंग्रजी ग्रंथ वाचले. त्यातूनच हे पुस्तक साकार झाले आहे.

 

परंतु या ग्रंथांची शोधयात्रा खडतर असली, तरी या शोधयात्रेचं वर्णन करणारी भाषा मात्र साधी, सोपी नि ओघवती आहे. त्यात कोठेही क्लिष्टता आलेली नाही. इतिहासविषयक संदर्भ त्यावरील टिपांसहित दिलेले आहेत. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मधून-मधून पानोपानी उद्बोधक आणि रंजक माहिती चौकटीतून वाचायला मिळते. त्यामुळे हा 292 पृष्ठांचा ग्रंथ वाचताना ऐतिहासिक माहिती मिळतेच. पण चौकटींमुळे मनोरंजनही होतं. तसंच 28 सप्तरंगी छायाचित्रांमुळे या ग्रंथातील माहिती बोलकी झालेली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला राजस्थान राज्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती तसंच तेथे साजरे होणारे सण, उत्सव, जत्रा, साहित्य, कला, चालीरीती व भाषा यांची माहिती दिली आहे. इ.स. ७३४मध्ये चितोड जिंकून चितोडगडावर राणेंच्या राज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या राणेंचा मूळ पूर्वज बाप्पा रावल याच्या शौर्याची यशोगाथा मन थक्क करून सोडते. त्याच्याप्रमाणेच अजिंक्य ठरलेला महाप्रतापी महाराणा हमीर, सिसोदिया राणा, मेवाडचा महान सेनानी राणा प्रताप, अकबर पुत्र जहांगीराचा सतरा वेळा पराभव करणारा राणा अमरसिंह इत्यांदिची शौर्यगाथा थक्क करून सोडते. या राणांचीच परंपरा आज महाराष्ट्रातील राणेमंडळी चालवत आहेत.

 

दक्षिणेत उतरलेल्या राणांचा इतिहास कथन करताना, शिवाजीराजे भोसले, सावंतवाडीकर सावंत-भोसले, अबू पहाडावरून दक्षिणेत उतरलेले राजपूत परमार-पवार-सावंत पटेल, नागपूरकर खरा-याचे सावंत भोसले, शृंगारपूरकर सुर्वे, खानविली बेणीचे खानविलकर, बोरथडेकर सोनजीबाबा घराणं, खानदेशातील रावल घराणं या राण्यांशी संबंधित सग्यासोय-याची विस्तृत माहिती या पुस्तकात दिली आहे. इसवी सन १७६८मध्ये राणा कुंभकर्णाच्या वंशातील राणा पृथ्वी नारायण सिंह यांनी खाटमांडू जिंकून मेवाडमधील राणेवंशीय राजवट प्रस्थापित केली. तसंच गोमंतकात पोर्तुगीजांविरुद्ध लढणारा बंडखोर दीपाजी राणे, पानिपतवर लढलेला खोरीतील रामराव राणे, मोगल सरदाराला पराजित करताना धारातीर्थी पडलेला नारिंग्रेचा राणा जयसिंह, कुर्लीचा शिवगड घेताना वीरमरण लाभलेला आचिण्र्याचा अजरेजीराव, सांगुळवाडीचे चांदजीराव व जगदेवराज, गुजरातेत नाथोरामला ठार करून धरमपूरला राण्यांचे राज्य स्थापन करणारा राणा रामसिंह, तसंच कोल्हापूरचे शेतकरी सहकारी संघस्थापन करणारे रावसाहेब राणे या सर्व सिसोदिया कुलीन वीरांची माहिती या पुस्तकात मिळते.

 

राजस्थानपासून सुरू झालेला आणि दक्षिणेत थांबलेला राणेमंडळींचा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचविण्यात रमेश राणे यशस्वी झाले आहेत.

राण्यांचे दक्षिणेत आगमन : एक शोधयात्रा

 

लेखक : डॉ. रमेश ग. राणे

 

शलाका प्रकाशन, पुणे-२९२

 मूल्य : रु. २६०/-

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0