महिला एकत्रीकरण केंद्र
औंधमधल्या एका बारक्याशा गल्लीतलं ‘बंजारा’. खरं तर याला बुटिक म्हणावं की दुकान म्हणावं की महिलांचं एकत्रीकरणाचं केंद्र म्हणावं, हेच पटकन उमगत नाही, असं काहीतरी. कारण असं ऐकलं होतं, की महिला इथे येतात आणि आपला असा खास पेहराव तयार करतात. अमेरिकेतलं ‘फायबर आर्ट्स’ या मासिकाने त्यांची नोंद 2001 सालीच घेतली आहे.
‘बंजारा’मध्ये शिरलात की येतात हातमागाचे खास वास. चहूबाजूंनी टांगलेल्या दिसतात अगदी खास तयार करवून घेतलेलया ओढण्या/ दुपट्टे. मधल्या चौकोनात चारी बाजूला नजर फिरवली, तर आंध्र, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, छत्तीसगढ, लखनौ अशा १० राज्यांतल्या खास कला प्रदर्शित करणा-या कपड्यांचे स्थान. अगदी पारंपरिक रंगांपासून नवीन रंगछटांनी ही कलाकारी. पण त्याचबरोबर ‘बंजारा’मध्ये हातमाग या नैसर्गिक पद्धतीच्या कपडय़ांबरोबर तयार होताना दिसतात नैसर्गिक अशी मैत्रीची नाती. या ‘बंजारा’ची निर्माती नीता देशपांडे तिला भेटल्यावर या मैत्रीचं मर्म सहज उलगडतं.
नीता स्वत: हातमागावर तयार केलेल्या कपड्यांची पहिल्यापासून शौकिन. तब्बल २० वर्षापूर्वी ती ब्युटी थेरपिस्ट होती. पुण्यातल्या फग्र्युसन रस्त्यावर तिचं स्वत:चं थेरपी सेंटर होतं. तिचे हातमागावर तयार केलेले सुती, पण खास परंपरेतले, वेगवेगळ्या त-हेने डिझाइन केलेले कपडे पाहून थेरपी सेंटरमधले ग्राहक तशाच कपड्यांची मागणी करू लागले. त्यावेळी पुण्यात अशी खास हातमागाची, विविध राज्यांतल्या परंपरागत हातमाग कलाकारीचं कापड फारसं उपलब्ध नव्हतं. त्यामुळे लोकांना नीताकडची ड्रेसमटेरियल्स इतकी आवडायला लागली की, थेरपी सेंटरपेक्षा नीताला कपड्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष पुरवावं लागलं. या मागणीतूनच नीताने थेरपी सेंटर बंद करून ‘बंजारा’ सुरू करायचा निर्णय घेतला. योग्य वेळी मागणीप्रमाणे व्यवसाय बदलण्याची धमक तिने दाखवली.
अगदी मोजक्या पैशात छोट्या जागेतून बंजारा सुरू झालं आणि मोठय़ा प्रमाणात कापड आणायची गरज भासली. मग तिने हातमाग वस्त्रोद्योगापर्यंत थेट पोहोचायचं ठरलं. एका हातमागाच्या प्रदर्शनात हातमाग विणकरांबरोबर काम करणाऱ्या ‘दस्तकार आंध्र’ या सामाजिक संस्थेशी तिचा परिचय झाला. बंजारा सुरू करताना पहिला मदतीचा हात तिने मागितला तो या संस्थेचा. या संस्थेच्या संपर्कातून नीता आंध्र प्रदेशातल्या विणकारांपर्यंत पोहोचली आणि तिथून विविध विणकरांच्याच ओळखीने तिचा विविध राज्यांतल्या विणकरांकडे पोहोचायचा प्रवास सुरू झाला. त्या-त्या राज्यांच्या हातमाग कलेची वैशिष्टय़ं आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि विणकरांना त्याची योग्य किंमत मिळावी याचा प्रयत्न ती तेव्हापासून आजपर्यंत करत आहे.
‘बंजारा’साठी विविध राज्यांतल्या दुर्गम खेडय़ांमध्ये फिरताना विणकरांच्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणांचं निरीक्षण नीता यांना करता आलं. यापैकी ब-याच विणकरांचे हातमाग हे त्यांच्या घरातच असत. राज्या-राज्यांप्रमाणे थोडाफार फरक असला, तरी सगळ्या विणकरांची घरं कौलारू. घरात किमान २ ते ४ माग आजही असतात. एके ठिकाणी धागे रंगवण्याचं काम सुरू असतं, तर दुसरीकडे कापड धुण्याचं काम सुरू असतं. घरच या व्यवसायात मग्न. या विणकरांना माग लावण्यासाठी काय - काय करावं लागतं, कोणाकोणाची मदत लागते, कोणत्या परिस्थितीत ते काम करतात, त्यांची कला जपण्याचा ते प्रयत्न कसा करतात हे सारं नीताने पाहिलं. खरं तर कोणत्याही कोर्समध्ये हे शिकवत नाहीत. विणकरांच्या कामाचा अंदाज आल्यानेच ती हातमागात मशिनप्रमाणे सारखेपणा, नेमकेपणा नसण्याची कारणं ग्राहकांना पटवून देऊ शकली.
हळूहळू ती वेगवेगळय़ा पद्धतीचं डिझाइन कसं मागावर करतात ते पाहू लागली आणि स्वत: मागावर त्याचं सेटिंगही करून देऊ लागली. कारण पारंपरिक कला लोकांना आवडत असल्या तरीही त्यात वैविध्य नसेल, तर शहरी ग्राहक ते विकत घेणार नाहीत, हे नीतामधल्या उद्योजिकेने ओळखलं होतं. म्हणून ती स्वत: वेगळे रंग, डिझाइन सुचवू लागली. नवीन डिझाइन करताना थोड्या तांत्रिक अडचणी येत. शिवाय विणकरांना हे विकलं जाईल ना, ही भीती वाटे. पण नीताने तो विश्वास त्यांना दिला. तिने कधीही विणकारांचे पैसे बुडू दिले नाहीत. त्यांना अधिकाधिक हातमाग कापडाची मागणी नीता सातत्याने करत असते. त्यामुळे त्यांची काम न मिळण्याची भीती कमी झाली आहे.
मात्र हाममागावर काम करणारे विणकरच हळूहळू कमी होत असल्याचं तिच्या लक्षात आलं आहे. त्यांच्या घरातली सुशिक्षित पिढी या व्यवसायातले शारीरिक कष्ट आणि त्यामानाने मिळणारा कमी पैसा पाहून विणकाराच्या कामापासून पळ काढत आहे. त्यांना पगारी नोकरी गरजेची वाटत आहे. काही व्यावसायिक कष्टाने आपली कला सुरू ठेवण्यासाठी धडपडत आहेत. पण या क्षेत्रातल्या सहकारी संस्था किंवा सरकारी अनुदानातून सुरू असणा-या विविध हातमाग प्रदर्शनांमधला भ्रष्टाचार या विणकरांना या धडपडीपासून परावृत्त करील की काय, अशी शंका विणकरच नीताला बोलून दाखवतात. नीता मात्र ही कला म्हणून पुढे आणण्यासाठी धडपडते. यासाठी मग ती बंजारामध्ये डिझाइनचे ब्लॉक्स ठेवते. विणकर कशा परिस्थितीत काम करतात हे दाखवण्यासाठी संबंधित फोटो, व्हिडिओ आपल्या ग्राहकांना दाखवते. (एक प्रकारचं तिने या क्षेत्रातलं सुरुवातीचं दृक्श्राव्य संकलनच केलं आहे आणि तेही नकळत!)
बंजाराच्या सुरुवातीपासूनच तिचे यजमान, गिरीश तिच्याबरोबर विणकरांबरोबर यायचे; कारण ब-याच दुर्गम भागात त्यावेळी स्त्री व्यावसायिक ही संकल्पना रूढ झालेली नव्हती. बरेचदा तिला पदर गुंडाळून जावं लागे. बरेच विणकर तेव्हा स्त्रीबरोबर बोलायलाही तयार नसत.त्यावेळचा त्यांचा एक अनुभव खूपच चित्तथरारक आहे. ते दोघेही छत्तीसगढच्या धीमतरी या भागात गेले होते. इथले बरेचसे भाग नक्षलग्रस्त असल्याने त्यांना दिवसाच प्रवास करता यायचा. एकदा ते दोघेही जीपने प्रवास करत असताना, जीपवाल्याने गाडी अचानक जंगलात घातली. हे दोघं ख्रिस्ती असण्याची शक्यता त्याला यांच्या इंग्लिश बोलण्यावरून वाटली आणि त्यावेळी तिथे धर्मातराचे प्रयत्न हेत असत. तेव्हा या दोघांनी मंगळसूत्र दाखवून, गायत्री मंत्र ऐकवून आपली सुटका करून घेतली. हे सांगताना नीता आजही क्षणभर शांत, धीरगंभीर होते.
18 वर्षात बंजारा आज मोठ्या जागते उभं आहे. ब-याचशा गरजू मुलींना बंजाराने आपल्यात सामावून घेतलं आहे. यात एक विकलांग मुलगीही आहे. नीता या सगळय़ांना प्रेमाने प्रशिक्षण देते. आज तिची ही टीम उत्तमरीत्या उभी आहे. त्यामुळे आज कोणताही वेगवेगळय़ा राज्यातला खास असा फेस्टिवल करायचा असेल, तर सगळ्या जणी आणि नीताकडचे टेलर्स एकजुटीने कामाला लागतात. यात नीता विविध राज्यांतली कारागिरी एकत्र करून तेही ग्राहकांसमोर पेश करते. व्यवसायाचे सगळे नियम ती पाळते. ती ज्या विणकरांकडून काम करवून घेते, त्यांच्याकडे बालकामगार नाही ना, ते उर्वरित कचरा योग्य जागी टाकतात ना, याची खात्री करून घेते. ‘मनोविकास’ या विकलांगांसाठी काम करणा-या संस्थेकडून ती व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच कागदी पिशव्या करून घेते. कोणत्याही प्रकारे जाहिरात न करता तिचे ग्राहक आजही एकमेकांमुळे वाढत गेलेले आहेत. तिच्या बंजारातले कपडे ‘लगान’ चित्रपटात वापरले गेल्याचं या चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कार प्राप्त भानू अथय्या यांनी तिला स्वत: सांगितलं. तिने स्वत:चे काही ब्रँडही तयार केले आहेत. म्हणूनच तिचा व्यवसाय गल्लीच्या एका टोकाला असूनही भरभराटीचा होतोय.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा