संवेदनशील प्रेक्षक घडवायचा आहे
चांगल्या आशयाचे चित्रपट नाहीत म्हणून तसे प्रेक्षक नाहीत आणि प्रेक्षक नाहीत म्हणून चांगले चित्रपट नाहीत हे वर्तुळ उमेश कुलकर्णी आणि त्याच्यासारख्या नव्या फळीतल्या दिग्दर्शकांना तोडायचं आहे. त्यासाठी अनाकलनीय भासणा-या आर्ट फिल्म्स आणि व्यावसायिक बटबटीतपणा यांचा कुठेतरी मध्य गाठायचा आहे. आपल्याला हवा तसा चित्रपट मनापासून केला तर प्रेक्षकांना तो नक्की आवडतोच यावर विश्वास असणारा उमेश चित्रपटनिर्मितीच्या कोणत्याही चाकोरीत अडकून घ्यायला तयार नाहीये.
अमुक एका भाषेत बनणारे, उदाहरणार्थ बंगाली, इराणी, जपानी, फ्रेंच, मल्याळी चित्रपट चांगले असतात अशा चर्चा फेस्टिवलच्या वाऱ्या करणा-या किंवा वेगळ्या वाटेचे सिनेमे आवर्जून बघणा-या चित्रपटप्रेमींमध्ये होते तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? एखाद्या भाषेतले चित्रपट आपली अशी ओळख कशाच्या बळावर तयार करतात? अस्सल मातीत रुजलेल्या जाणिवा, जीवनमूल्यं, परिसर घेऊन बनलेले हे चित्रपट वैश्विक आशय मांडण्यात इतक्या चांगल्या प्रकारे यशस्वी कसे होतात? या प्रश्नांच्या उत्तरांतच खरं तर प्रादेशिक भाषेतल्या सिनेमांनी कसं असावं याचं गमक दडलेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये आलेल्या ‘श्वास’, ‘वळू’, ‘टिंग्या’, ‘गाभ्रीचा पाऊस’ अशा काही मराठी सिनेमांनी हेच प्रश्न मराठी सिनेमांबद्दल विचारण्यासाठी चित्रपट रसिकांना भाग पाडलं आहे. आणि ही लाट मराठी चित्रपटविश्वात ज्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी आणली त्यातलं एक प्रॉमिसिंग नाव म्हणजे उमेश कुलकर्णी.
उमेशचा ‘वळू’ दोन वर्षापूर्वी रॉटरडॅम वगैरे फेस्टिवल्सना जाऊन आलाच होता. यावेळीही पुसान, रॉटरडॅम, बर्लिनसारख्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांमध्ये झळकून आलेला त्याचा ‘विहीर’ लवकरच प्रदर्शित होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या चित्रपटांसाठी मराठीची बनत चाललेली ओळख ही त्याच्यासारख्या दिग्दर्शकासाठी खूपच आश्वासक आहे. ‘बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘विहीर’ची निवड होणं ही तर ऐतिहासिक घटना होती. कारण पस्तीस वर्षानंतर एखादा मराठी चित्रपट या फेस्टिवलसाठी आमंत्रित केला गेला. सत्यजीत रेंनी पहिल्यांदा वेगळ्या पद्धतीचा भारतीय सिनेमा जगापर्यंत पोहोचवला. नंतर शाम बेनेगल किंवा अदूर गोपालकृष्णन यांनी ते काम पुढे चालू ठेवलं आणि ते आता मराठीत होतंय. मराठी चित्रपटाच्या कक्षा ज्या पद्धतीने रुंदावत आहेत किंवा आजच्या जगण्याची जी काही मूल्यं आहेत तो तपासतो आहे त्या पद्धतीने मला वाटतं की, मराठी चित्रपटांत आलेला हा नवा प्रवाह खूप वर्षानी आला आहे आणि तो चांगला आहे. तरुण दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग मराठी चित्रपटांत करतो आहे. त्या सगळ्या प्रयत्नांचा एक टप्पा बर्लिनमधलं सिलेक्शन हा होता. एखादी गोष्ट जितकी वैयक्तिक, जितकी त्या-त्या मातीमध्ये रुजलेली असते, तेवढी ती युनिव्हर्सल असते याचा पुन्हा प्रत्यय या निमित्ताने आम्हाला आला. आपल्या या संदर्भाशी काहीही संबंध नसलेल्या मंडळींनी रॉटरडॅम, बर्लिनमध्ये हा चित्रपट पाहिला. भारतीय सिनेमा म्हणजे बॉलिवुड अशी जी एक कल्पना बनत चालली होती त्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट त्यांच्यासाठी आश्चर्याची होती की, आपल्या आयुष्याबद्दल काही बोलू बघतील अशाही फिल्म्स मराठीमध्ये बनत आहेत.’ - तो सांगतो.‘विहीर’ची गोष्ट ही दोन पौगंडावस्थेतल्या मुलांची गोष्ट आहे. दहा र्वष हा विषय उमेशच्या मनामध्ये घोळत होता. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे एखादा विषय जितका जास्त मनात घोळवत ठेवावा तितका तो लोणच्यासारखा मुरत जातो आणि ती कल्पना आकाराला येत जाते. विहीरच्या बाबतीत काहीसं तसंच झालं आहे. तो सांगतो, ‘आपल्याकडे नेहमी चित्रपटात किंवा साहित्यात एक तर लहान मुलं असतात किंवा मोठी माणसं चितारलेली असतात. पण हे जे मधलं वय आहे ते प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पना तेव्हा तयार होत असतात. त्यात आपल्याला जे समजतं तेच बॅगेज पुढच्या आयुष्यात आपण कॅरीऑन करतो. त्यामुळे या महत्त्वाच्या काळाचं जे गमक आहे ते शोधावं हा या चित्रपटाचा एक हेतू आहे. दुसरं म्हणजे आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मृत्यू ही संकल्पना आपल्यासमोर येते तेव्हा आपला जो सगळा निरागसपणा असतो तो एका अर्थी गळून पडतो. आणि आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने आपण बघायला लागतो. गौतम बुद्धांच्या बाबतीत जे मृत्यूच्या दर्शनाने झालं तो संदर्भ इथे आहे. आणि तशा अर्थाचा एक अनुभव या चित्रपटात आहे.’
जगण्याचा एखादा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून जगण्याचे पापुद्रे उलगडू बघणा-या अशा चित्रपटांची आपली म्हणून एक भाषा असते, जी असे चित्रपट नियमितपणे बघणा-या प्रेक्षकांच्या ओळखीची असली तरीही सर्वसामान्य प्रेक्षकांना बऱ्यापैकी गोंधळात टाकणारी असते. व्यावसायिक सिनेमांच्या प्रवाहात असे सिनेमे घेऊन येणं हा एक प्रकारे धाडसाचाच प्रयोग असतो. आज हे धाडस नवे दिग्दर्शक करू बघत आहेत त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असल्याचं तो सांगतो. ‘माझ्यापुरतं सांगायचं झालं तर फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकण्याआधी मी सुमित्रा भावे सुनील सुकथनकरांकडे सहा वर्ष असिस्टंट होतो. इन्स्टिटय़ूटमध्ये शिकत असताना जगभरातले चांगले सिनेमे पाहिले तेव्हा जाणवलं की मराठीमध्ये जे सिनेमे बनत होते ते आणि आपलं आयुष्य यांचा फार कमी संबंध आहे. आणि काहीच मंडळी उदाहरणार्थ जब्बार पटेल, अमोल पालेकर किंवा नचिकेत जयू पटवर्धन वगैरे वेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनवत आहेत. याच दरम्यान ललित कला केंद्रामध्ये जागतिक चित्रपटांचे फेस्टिवल्स होऊ लागले, पुणे फेस्टिवल, मामी फेस्टिवल सुरू झाले आणि जगभरात नेमके कशा प्रकारे चित्रपट बनवले जात आहेत याचं भान आम्हा तरुण मंडळींना यायला लागलं. चित्रपटाची वेगळी भाषा ओळखीची झाली आणि काही वेगळ्या प्रकारे बनवण्याचं धैर्यही आलं. यात बाजारपेठेच्या आघाडीवर झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे मल्टिप्लेक्सचं आगमन. सर्व प्रकारच्या सिनेमांसाठी स्वतंत्र मंच या मल्टिप्लेक्स संस्कृतीत मिळाला. त्याशिवाय माझ्या ‘गिरणी’ किंवा ‘थ्री ऑफ अस’सारख्या शॉर्ट फिल्म्स जगभर दाखवल्या गेल्या. आणि त्यानिमित्ताने जगात खूप ठिकाणी प्रवास केला. त्यातून एक अवधान आलं की, आपल्याच मातीतला सिनेमा बनवायला हवा. तोही आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर.’
तरीही आपल्याला हवा तसा सिनेमा बनवणं, सोपं नव्हतंच. उमेशच्या ‘वळू’ने बॉक्स ऑफिसवर कितीही चांगली घोडदौड केली असली तरीही निर्मात्याच्या अभावी तो उमेश, गिरीश कुलकर्णी, प्रशांत पेठे आणि गणपत कोठारी अशा चार मित्रांना स्वत:च निर्मित करावा लागला. ‘मुळात वळू जेव्हा तयार केला होता त्याही वेळेला मी आणि गिरीशने असं ठरवलं होतं की कोणत्याही कन्व्हेन्शनल प्रकारे अमुक हे चालतं म्हणून ते करायचं नाही. आपल्याला जे वाटतं, म्हणायचं आहे ते आपल्याला ज्या पद्धतीने म्हणायला आवडेल आणि अत्यंत मनापासून करावंसं वाटेल तसंच करायचं. म्हणूनच कमर्शियल सिनेमांमध्ये गाणी, अंगविक्षेपांचा विनोद वगैरे गोष्टी लागतात, अशा ज्या काही दृढ संकल्पना होत्या त्या सगळ्या आम्ही धुडकावून लावल्या होत्या. पण प्रेक्षकांच्या मनामध्ये त्याने ज्या प्रकारे स्वत:चं काही एक स्थान तयार केलं त्यातून एक चांगला आत्मविश्वास आला की आपण जे मनापासून करतो ते प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतं. कारण आजच्या प्रेक्षकांना आजची जी जाणीव आहे ती नव्या पद्धतीने समजून घेण्याची इच्छा आहे. आजच्या आपल्या जगण्याचे जे काही पैलू आहेत ते समजून घ्यायला आणि आपल्या स्वत:कडे बघायला प्रेक्षक हा वेगळ्या अर्थाने उत्सुक असतो.’
उमेशला याबाबतीत प्रेक्षकांना दोष देणं मान्य नाही ते याच कारणामुळे. त्याच्या मते मराठी प्रेक्षक हा नाटक, कविता, साहित्य, शास्त्रीय संगीत हे सगळं समजणारा प्रेक्षक आहे. संवेदनशील आहे. पण त्याला तशा प्रकारचा अनुभव मराठी चित्रपटांतून मिळत नव्हता. किंवा फार मोजक्या प्रमाणात मिळत होता. कारण चित्रपटात फार मोठय़ा पद्धतीचं अर्थकारण गुंतलेलं असतं, त्यातून मग एक वर्तुळ तयार होतं की प्रेक्षक नाहीत म्हणून वेगळे चित्रपट बनत नाहीत आणि तसे चित्रपट नाहीत म्हणून प्रेक्षक नाहीत. आणि हेच वर्तुळ मोडणं हे त्याच्या पिढीच्या दिग्दर्शकांपुढचं मोठं आव्हान आहे. ‘मला वाटतं आपण आपल्या प्रेक्षकांना इतकी वर्ष बुद्धू समजून स्पून फिडिंग फार केलं आहे. आयुष्यातला सगळा सूक्ष्म अनुभव घेण्याची क्षमताच या सगळ्या गोष्टींनी मारली जात आहे. या सगळ्यामुळे आज एकूणच समाजाची संवेदनशीलता कसोटीला लागली आहे. ज्या पद्धतीच्या टीव्ही मालिका आपण बघतो. ज्या पद्धतीचं बंबार्डिग आपल्यावर सगळ्याच माध्यमातून होतंय त्यातून आपलं मन चांगलं ठेवणं, संवेदनक्षम राखणं यासाठी प्रत्येक माणसाला काही वेगळे प्रयत्न करावे लागतील. वेगळ्या चित्रपटांला प्रतिसाद देणं ही त्यातली एक कृती ठरू शकेल. अर्थात, त्यासाठी तसा अनुभव या क्षेत्रात काम करणा-यांनी प्रेक्षकांसाठी तयार केला पाहिजे. नुसतीच टीका करत राहण्यात काही अर्थ नाही. मग हळूहळू चित्र बदलेल आणि प्रेक्षक अधिक संवेदनशीलतेने या कलेकडे बघू लागतील. पण ते एकटय़ाचं काम नाही. त्याची चळवळ बनायला हवी.’ - उमेश सांगतो.
त्याच्या फळीच्या मंडळींकडून सध्या हेच प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू असल्याचं दिसतं. अनाकलनीय भासणा-या आर्ट फिल्म्स आणि तद्दन व्यावसायिक बटबटीतपणा यांचा त्यांना कुठेतरी मध्य गाठायचा आहे. ‘विहीर’चं हेच वैशिष्ट्य उमेश सांगतो. ‘विहीर’मध्ये आम्ही जे काही मांडलं आहे ते अत्यंत साध्या पद्धतीने मांडलेलं आहे. किचकट, अनाकलनीय असं काही त्यात नाही. ‘विहीर’ हा फार धीरगंभीर, विषण्ण करणारा अनुभव नाही तर जगण्याविषयी प्रसन्न वाटेल असा, जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा अनुभव आहे. मी काय, माझा सहकारी गिरीश कुलकर्णी काय आम्ही सगळीच आयुष्याबद्दल पॉझिटिव्ह असलेली मंडळी आहोत.’ - उमेश सांगतो. या टप्प्यावर तरी ‘विहीर’ प्रेक्षकांकडून स्वीकारला जाणं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठीची रीतसर प्रसिद्धी करण्याची जबाबदारीही तो उत्साहाने पार पाडतोय. आताच्या काळात क्रिएटिव्हिटी वेगळी आणि मार्केटिंग वेगळं, असं म्हणून चालणार नाही कारण जो चित्रपट दीड-दोनशे लोकं आपला सगळा वेळ, मेहेनत, क्रिएटिव्हिटी खर्च करून बनवत असतात, ज्यात खूप एफर्ट्स गुंतलेले असतात ती कलाकृती जर प्रेक्षकांनी पाहिली नाही तर त्याचा काही उपयोग नाही आणि मराठी चित्रपटांची ही नवी भाषा, त्यातली पॅशन समजणारे वितरक बनत नाहीत तोवर दिग्दर्शक आणि त्याची टीम यांनाच हे काम करावं लागणार आहे, हे तो स्पष्टच सांगतो.
चित्रपटाला आपल्या मातीचा संदर्भ हवा, असं उमेश म्हणतो तेव्हा त्यातला मराठीचा आग्रह कुठच्या अट्टहासातून आलेला नसतो. ‘हिंदी चित्रपट बनवायला माझी ना नाही. पण बॉलिवुडमध्ये पोहोचणं हेच मोठं ध्येय आहे असं मला वाटत नाही. खरं तर वळूनंतर एक हिंदी चित्रपट मी साइनही केला होता. पण त्याहीपेक्षा ‘विहीर’ बनवण्याची निकड मला जास्त जाणवली. त्यामुळे मी तो चित्रपट केला. हिंदी फिल्म बनवण्यासाठी मराठीचा पायरीसारखा वापर मला कधीच करायचा नव्हता. माझं मन मराठी आहे. त्यामुळे माझ्या अनुभवांशी जोडलेली फिल्म मी बनवेन तेव्हा आपसूकपणे ती मराठीच बनणार. एवढंच. सध्या विहीरचं प्रदर्शन हे माझं प्राधान्य आहे. फार पुढचं मी नाही बघत. नाही तर त्याचीही एक चाकोरी बनते. आणि मला ती नको आहे.’ - तो सांगतो. उमेशच्या ‘वळू’ सिनेमातला बैल मुक्त आयुष्य जगू बघणा-या वृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा होता. उमेश कुलकर्णीमधला दिग्दर्शकही अशा चाको-या टाळत पुढे जाऊ पाहतो आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा