‘हुसेन प्रकरणा’च्या अभ्यासासाठी काही मुद्दे
मकबूल फिदा हुसेन 2006 पासून भारताबाहेर राहतात. सरकारच्या मते, त्यांनी भारतात परतायला हवं. कतारनं देऊ केलेलं नागरिकत्व हुसेन यांनी स्वीकारलं, तरी त्यांचं ‘राष्ट्रीयत्व’ भारतीयच राहील. हुसेन आदरणीय असोत वा नसोत, पण त्यांच्याबद्दल अभ्यासपूर्ण बोलण्याची सवय आपल्याला लागायला हवी. अज्ञानानिशी वाद घालण्यात काय अर्थ आहे? या अभ्यासाच्या आधी काही मुद्यांची ही उजळणी..
विवस्त्र मूर्ती: या भारतवर्षातल्या ज्या राजेरजवाड्यांमुळे हिंदू संस्कृती टिकली असं म्हटलं जातं, त्यांनी जर सत्तेसाठी एकमेकांशी न लढता आसिंधुसिंधूपर्यंत अखण्ड हिन्दु-स्थानाचं जाज्वल्य स्वप्न सहाव्या शतकातच पाहिलं असतं, तर ‘भारतमाते’ची जी काही प्रतिमा तयार झाली असती तिनं कपडे घातले असते का? त्या वेळच्या- सहाव्या शतकातल्या ‘सरस्वती’नं कपडे घातले नव्हते, हा इतिहास आहे.
त्या अ-वस्त्रांकित ‘सरस्वती’च्या वीणाधारी दगडी मूर्तीची प्रतिमा इंटरनेटवर कुणालाही पाहायला मिळते. इंटरनेटची होळी होऊ शकत नाही. वेबसाइट भारतात ब्लॉक करता येऊ शकेल, पण दुबई, सान होजे वगैरेंसारख्या भारतप्रेमी (विश्व मराठी साहित्य संमेलनं नाही का झाली इथं?) शहरांमध्ये ती वेबसाइट सहज पाहता येईल. हिंदू देवतांच्या प्राचीन विवस्त्र मूर्ती भारतातच, कुठकुठल्या आडबाजूच्या देवळांमध्ये आहेतच; पण ही सरस्वतीची किंवा पार्वतीची मूर्ती आहे का, याबद्दलची माहिती अभ्यासकांपर्यंतच राहते.
राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व : दुबईत दीर्घकाळ राहण्यासाठीचा व्हिसा ऐ-यागै-याला मिळत नाही. या शहराला तुम्ही कामाचे वाटत असाल, तरच तो मिळतो, हे तर तिथं राहणारे शेकडो मराठीजनही तुम्हाला सांगू शकतील. मकबूल फिदा हुसेन नावाचा एक नव्वदीतला चित्रकार दुबईत गेली पाच वर्ष राहतो आहे, तो कोणत्या व्हिसावर, याचा शोध कोणत्याही मीडियानं घेतलेला नाही. या हुसेनला कतारचं मानद नागरिकत्व मिळाल्याच्या बातम्या मात्र ‘सिटिझनशिप’ (नागरिकत्व) हा शब्द न वापरता ‘राष्ट्रीयत्व’ (नॅशनालिटी) असा शब्द वापरून सांगितल्या/ लिहिल्या/ चर्चिल्या गेल्या. राष्ट्रीयत्व ही सामाजिक-सांस्कृतिक संकल्पना आहे, ते देण्या-घेण्याची प्रोसीजर सरकारकडे नसून लोकांच्या काही पिढ्यांकडे असते (त्यामुळे भगिनी निवेदिता किंवा मदर तेरेसा या विलायतेत जन्मलेल्या महिलांचं राष्ट्रीयत्व भारतीय ठरू शकतं). याउलट नागरिकत्व काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मिळू शकतं, हे अमेरिकेतले शेकडो मराठीजन तुम्हाला सांगतील. आपल्या मुलांपुढे वा नातवंडांपुढे ‘राष्ट्रीयत्वा’चा प्रश्न उभा राहील की काय, अशी भीती यापैकी काही अमेरिकास्थ मराठीजनांना वाटत असल्याचंही त्यांच्या भावना जाणून घेतल्यास लक्षात येईल.
चित्रकलेच्या ‘प्रगती’तलं योगदान : सांस्कृतिक सिद्धांताच्या (कल्चरल थिअरी) अभ्यासकांनी समजा हुसेनचं भारतीय चित्रकलेतलं योगदान काय, याचा विचार करायचं ठरवलं (आणि हुसेनच्या चित्रांमध्ये किती धनाढय़ांचा केवढा पैसा अडकलाय याचं टेन्शन न घेता हा विचार झाला,) तर काय दिसेल? हुसेन हा वसाहतोत्तर काळातल्या भारतीय चित्रकारांपैकी सर्वाधिक चित्रं प्रदर्शित करणारा चित्रकार आहे, कोणताही चित्रकार ‘लोकप्रिय’ होणं अशक्यच असलेल्या समाजात चित्रकार हा ‘लोकपरिचित’ घटक कसा बनू शकतो याचे प्रयोग हुसेनकडून अनेकदा झाले होते आणि ‘आधुनिक भारतीय चित्रकला म्हणजे हुसेनबिसेन’ असा समज लोकांमध्ये पसरण्याइतपत त्याची लोकपरिचितता वाढली होती, हे खरं आहे. अख्ख्या भारताच्याच ‘राष्ट्रीयत्वा’ला, ‘आपली कला म्हंजे कोणती कला?’ असा प्रश्न पडणं आवश्यक असतानाच्या काळात हुसेनची उमेद गेली. जागतिक कलाव्यवहार आणि जागतिक कलाविचारही देशांच्या सीमा ओलांडत असल्याची जाण या काळात अमूर्तीकरणाचा आधार घेणा-या काहीजणांचा होती, ती हुसेनकडे नव्हती असं म्हणावं लागेल. भारतीय विषयांमधूनच ‘भारतीयते’चा आविष्कार हुसेन करत राहिला. हा सोप्पा मार्ग संस्कारभारतीच्या चित्रकलावर्गापेक्षा किती वेगळा म्हणावा? दुसरीकडे, गेल्या १५वर्षाच्या काळात आर्थिक उदारीकरणामुळे कलाव्यवहार आणि इंटरनेटसारख्या साधनांमुळे कलाविचार खरोखरच वेगानं एकसंध होत चालला असताना चित्राबद्दलचे चित्रकारांनी केलेले जे विचार महत्त्वाचे ठरत गेले, त्यांच्या खिजगणतीत हुसेन नाही. ‘श्वेतांबरा’ हे मांडणशिल्प हुसेननं केलं होतं, एवढा एकमेव दुवा गेल्या १५ वर्षातल्या कलाविचाराशी हुसेनला जोडू शकतो. बाकी आनंदी आनंदच! इलस्ट्रेशन करणाऱ्यानं जितका-जसा विचार करावा, तितका-तसाच विचार हुसेन करू शकतो की काय, असा गंभीर आरोपवजा प्रश्नही १९९८ नंतर चर्चिला जाऊ लागला; पण त्याला उत्तर आहे.. घाशीराम कोतवाल आणि सफदर हाश्मी यांसारख्या, मुस्कटदाबीचे बळी ठरलेल्या सांस्कृतिक घटनांवर आधारित चित्रं हुसेननं केली होती. राज्यसभेचा सदस्य असताना हुसेननं केलेल्या स्केचेसचं पुस्तक ‘संसद उपनिषद’ या नावानं प्रसिद्ध झालं आहे. भारतातल्या राजकीय पक्षांबद्दलही हुसेनं चित्रं रंगवली. मदर तेरेसा किंवा महत्मा गांधी यांच्या हुसेन-कृत चित्रांमध्ये चेहरा कधीही नीटसपणे दाखवलेला नसूनसुद्धा या महनीय व्यक्तिमत्त्वांची ‘चिन्हं’ म्हणून ती चित्रं महत्त्वाची ठरतात. भारतीय कलापरंपरांमधल्या मोटिफ-मेकिंगचा (प्रतीकं ओळखून त्यांचं दृश्यरूप साकारण्याचा) भाग हुसेन यांनी खरोखरच असीम सृजनशीलतेनं जपला, याचीही साक्ष त्यांच्या ८० टक्के चित्रांमधून मिळू शकते. या प्रतीक-रूपांकनाला नेहमीच जी ‘आधुनिक’ डूब हुसेन यांनी दिली, त्यात मात्र क्युबिझममधल्या जोरकस-बंडखोर रेषेचा वापर बोधचित्रपर (इलस्ट्रेटिव्ह) हेतूसाठी केला. म्हणजे ‘विचाराधारित कले’ऐवजी ‘कौशल्याधारित कले’मध्येच हुसेन जास्त रमला. ‘आधुनिक भारतीयते’चा संबंध विचारांशीच असायला हवा होता, हे एकेकाळी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’चा भाग असणारे हुसेनसकट सर्वच्यासर्व कलाकार त्यांच्या पन्नाशीनंतर हळुहळू विसरतच गेल्याचं त्यांच्या कलाकृती सांगतात, या घसरणीला हुसेनही अपवाद नाही.
आजची पत : एवढं असूनही ‘भारतीय आधुनिक चित्रकलेचा मॅस्कॉट’ म्हणून हुसेनला पाहणं आजदेखील योग्यच आहे, पण गोची इतकीच की आजची विचाराधारित भारतीय चित्रकलाच स्वत:ला ‘आधुनिक’ हे बिरूद लावू इच्छित नाही. भारतातल्या आजच्या ‘समकालीन’ (कन्टेम्पररी) चित्रकलेला कुणाही मॅस्कॉटची - बोधचिन्हवजा व्यक्तित्वाची- गरजही नाही. या सर्व कारणांमुळे आजचे चित्रकार हुसेनसाठी जीव टाकू इच्छित नाहीत.
हुसेनच्या चित्रांची प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी प्रसारमाध्यमांमुळेच होत असल्याचं गेल्या दहा वर्षात दिसलं आहे. गुरुमूर्ती नामक एका माणसासाठी हुसेनं जी काही चित्रं केली होती, ती याआधीच्या हुसेन-चित्रांच्या दर्जाइतकीही नव्हती. ‘इंडियन हायवे’ नावाचं एक प्रदर्शन लंडनच्या ‘र्सपटाइन गॅलरी’त भरलं होतं, तिथं हुसेनची चित्रं बाकीच्या प्रदर्शनाशी विजोड दिसत होती. या प्रदर्शनात हुसेनच कशाला हवा होता, असा प्रश्न स्थानिक (तिथल्या) समीक्षकांनी केला. याला उत्तर अर्थातच नाही.
वादाचं अस्तित्त्व : कोणत्याही कलेबद्दल जे काही वाद घातले जातात, ते कलेवर अन्यायच करणारे असतात, हे जगाला माहीत आहेच. हुसेनबद्दल हा अन्याय योग्यच असल्याची कारणं ज्या संस्था-संघटनांकडून तावातावानं सांगितली जातात, त्यापैकी ‘सनातन प्रभात’ सारख्या संस्थांवर (बॉम्बस्फोट घडवून माणसं मारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे) भारतीय कायद्यानं बंदी घालण्यात आलेली आहे. भारतीय कायद्याला शिरोधार्य मानून ‘सनातन’च्या काही मित्र-संस्थांनी हुसेनवर ठिकठिकाणी फिर्यादी दाखल केल्या आणि भारतीय कायदय़ानुसार त्याच्यावर खटले भरले. त्यानंतर २००६ पासून हुसेन भारतवासी नाही. ज्यांना ‘भारतीय आधुनिक कला’ म्हणवल्या जाणा-या चित्रांमधून पैसा करायचाय अशा यच्चयावत गॅल-यांना हुसेनमध्ये इंटरेस्ट असतो, तो व्यवहार दुबईतून छान चालतो आहे. ‘आर्ट दुबई’ या चित्रकलेच्या व्यापारमेळय़ात येत्या पंधरवडय़ातच (१७ ते २० मार्च) ‘ग्रॉव्हेनॉर-वढेरा गॅलरी’ ही लंडनची गॅलरी हुसेनची चित्रं मांडणार आहे. हुसेनचं नव्वंकोरं चित्र थेट त्याच्याचकडून खरेदी करू इच्छिणा-यांना ‘आप कतारमें है’ (यू आर इन क्यू) असा अनुभव नेहमीच येई; तो आत्ताही येतो आहे. एवढं होऊनही ‘चित्रकलेच्या जागतिक इतिहासा’त निव्वळ वसाहतोत्तर सांस्कृतिक अभ्यासातली एक विचित्र घटना, इतकंच हुसेनचं महत्त्व राहील. हुसेनचं रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र वगैरे अद्यापही शाबूत असेल, त्याआधारे त्याचे नातेवाईक ‘हुसेन भारतीय नागरिकच’ असं सिद्ध करू शकतात. हुसेनचं राष्ट्रीयत्व भारतीय असूच शकत नसल्याचा अपप्रचार गेल्या दहा वर्षात फारच झाला आहे आणि ‘समकालीन चित्रकला’वाले भारतीय कलावंत तर राष्ट्रीयत्व-संकल्पनेच्या पलीकडले (पोस्टनॅशनल) होऊ पाहात आहेत. त्यामुळे हुसेनबद्दलच्या वादाचं अस्तित्व केवळ आपल्या अज्ञानात उरतं. हे अज्ञान एकतर चित्रकलेबद्दलचं, किंवा कायद्याबद्दलचं किंवा भारतीय दृश्यकलेतल्या विवस्त्रतेबद्दलचं असू शकतं.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा