बंडखोर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

धर्माने घालून दिलेल्या दंडकांना साहित्याच्या माध्यमातून छेद दिल्यामुळे रोषाचे धनी ठरलेल्या साहित्यिकांमध्ये तस्लिमा नसरीन यांचं नाव अग्रभागी आहे

तस्लिमा नसरीन हे नाव अगदी अलीकडे चर्चेत आलं ते कर्नाटकमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमुळे. तस्लिमा नसरीन या मूळच्या बांगलादेशी लेखिकेच्या नावाने कर्नाटकातल्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात बुरख्याबाबत व्यक्त झालेल्या मतांमुळे या दंगलींना तोंड फुटलं. या दंगलींमुळे संचारबंदी लागू करावी लागली. दोघांचे प्राण गेले. सध्या अज्ञातवासात असलेल्या तस्लिमा यांनी हा लेख आपण लिहिलाच नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. अर्थात, हा लेख त्यांनी लिहिलेला नाही, हे मान्य केलं तरी तस्लिमा नसरीन आणि वाद असं समीकरणच गेल्या काही वर्षात तयार झालंय. धर्माने घालून दिलेल्या दंडकांना साहित्याच्या माध्यमातून छेद दिल्यामुळे रोषाचे धनी ठरलेल्या साहित्यिकांमध्ये तस्लिमा यांचं नाव अग्रभागी आहे, हे गेल्या काही वर्षातल्या घडामोडींवर नजर टाकली, तर सहज लक्षात येईल. त्यांच्या नावासोबत सातत्याने जोडल्या गेलेल्या वादाने काही प्रमाणात त्यांच्या साहित्यालाही झाकोळून टाकलं आहे की काय, अशी शंका या घडामोडींवर नजर टाकली असता येते.

 

1962 साली बांगलादेशच्या मैमनसिंग जिल्ह्यात जन्मलेल्या तस्लिमा गेली 16 वर्ष मायदेशापासून दूर आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या तस्लिमा यांनी साहित्य लेखनाची सुरुवात केली ती कवितांपासून. 1986 साली त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांचे विषय मुख्यत: स्त्रियांच्या प्रश्नांवर होते. वैद्यकीय अधिकारी म्हणून खेड्यापाड्यांत काम करत असताना आणि त्यानंतर मैमनसिंगच्या स्त्रीरोग केंद्रात काम करताना अनुभवायला मिळालेल्या स्त्रियांच्या दु:खाला त्यांनी या कवितांतून वाचा फोडली. स्त्रियांच्या दुरवस्थेला बहुतांशी जबाबदार असलेल्या धार्मिक रूढी-परंपरांवर तस्लिमा यांनी कवितांच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या या बंडखोर साहित्यामुळे मूलतत्त्ववादी डिवचले गेले आणि तिथूनच तस्लिमा आणि वाद असं समीकरण तयार व्हायला सुरुवात झाली.

 

तस्लिमा यांचा तिसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर तर इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी त्यांच्याविरोधात मोहीमच सुरू केली. त्यांच्या कविता आणि सदरं प्रसिद्ध करणा-या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले केले. अर्थात, एकीकडे त्यांच्या बंडखोर साहित्याविरोधात आगडोंब उसळलेला असताना, दुसरीकडे त्या बेस्टसेलर लेखकांच्या पंगतीत जाऊन बसल्या होत्या. 1992 साली तस्लिमा स्मॅश कमिटीस्थापन झाली. या कमिटीच्या सदस्यांनी नॅशनल बुक फेअरमध्ये तस्लिमांच्या साहित्याची होळी केली. बुक फेअरमध्येच त्यांच्यावर हल्ला झाला. दुसरीकडे बांगलादेशसोबतच भारतातल्या पश्चिम बंगालमध्येही तस्लिमांचं साहित्य बेस्टसेलर ठरत होतं.

 

तस्लिमा यांच्या साहित्याविरोधात मूलतत्त्ववाद्यांमध्ये उसळलेल्या वादाचा कडेलोट झाला तो 1993 साली त्यांची लज्जाही कादंबरी आल्यानंतर. भारतामध्ये बाबरी मशीद पाडली गेल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील एका हिंदू कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या छळाची गोष्ट सांगणा-या या कादंबरीच्या माध्यमातून तस्लिमा यांनी केवळ धार्मिकच नव्हे, तर अनेक राजकीय संकेतांवरही कोरडे ओढले होते. त्यामुळे साहजिकच बांगलादेश सरकारने त्यांच्या या कादंबरीवर बंदी आणली. लेखनातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून सरकारने त्यांच्यावर खटला भरला. तब्बल तीन लाख मूलतत्त्ववाद्यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरोधात फतवा जारी केला. त्यानंतर गेल्या 17 वर्षात त्यांच्याविरोधात अनेक फतवे जारी झाले. दुस-या बाजूला अर्थातच अनुवादांच्या माध्यमातून लज्जाजगभरातल्या वाचकांपर्यंत पोहोचतच होती. तस्लिमा यांच्यावर पुरस्कारांची बरसात चालू होती.

 

या सगळ्या घडामोडींतून तस्लिमा नसरीन यांचं असामान्य धैर्य जगासमोर आलं. मूलतत्त्ववाद्यांनी काढलेले असंख्य फतवे, शिरच्छेदासाठी लावली गेलेली बक्षिसं या कशाचीही तमा न बाळगता तस्लिमा यांनी लेखन चालू ठेवलं. त्या पहिली दोन वर्ष जर्मनीत राहिल्या. मग स्वीडन, अमेरिका, फ्रान्समध्ये राहिल्या. बांगलादेशात परतण्याचे प्रयत्नही त्यांनी चालूच ठेवले. मात्र आजारी आई-वडिलांना भेटण्यासाठीही त्यांना बांगलादेशात जाता आलं नाही. 2000 साली त्यांना भारतात राहण्यासाठी परवानगी मिळाली आणि त्या कोलकात्यात राहू लागल्या. मधल्या काळात त्यांनी आत्मचरित्राचं लेखन सुरू केलं होतं. 2003 मध्ये भारतातल्या इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनीही त्यांच्याविरोधात फतवा जारी केला. 2007 साली हैदराबादमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग प्रसिद्ध झाल्यानंतर परिस्थिती आणखी कठीण झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करून पश्चिम बंगालमधल्या कम्युनिस्ट सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवलं आणि नंतर कोलकाता सोडण्यास भाग पाडलं. दिल्लीतही त्यांना नजरकैदेत राहावं लागलं. 2008 मध्ये तर त्यांना भारत सोडून जावं लागलं. त्यानंतर 2009 साली त्या भारतात परतल्या ख-या, पण भारत सरकारने अनेक अटी घालून त्यांना टुरिस्ट व्हिसावर देशात राहण्याची परवानगी दिली.

 

धार्मिक, सामाजिक, राजकीय चौकटींना न जुमानता आपले विचार परखडपणे मांडण्याची किंमत तस्लिमा नसरीन यांनी पुरेपूर मोजली आहे. धर्मग्रंथातल्या स्वत:ला अतार्किक वाटलेल्या गोष्टींना त्यांनी उघड आव्हान दिलं. राजकीय संकेतांवर सडेतोड टीका केली आणि विशेष म्हणजे कोणत्याही टप्प्यावर माघार घेतली नाही. आपल्या वैचारिक बांधिलकीशी त्या ठाम राहिल्या. अर्थात, बंडखोरी हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य असलं तरी ते बंडखोरीत अडकलेलं नाही. तर्कशुद्धता, वेगळेपणा, प्रगल्भता, असामान्य धैर्य ही त्यांच्या साहित्यातली वैशिष्टय़ं आहेत. मात्र ही वैशिष्ट्यं सततच्या वादांमुळे काहीशी झाकोळली गेली आहेत.

 

बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर भारतातल्या मुस्लिमांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त करणा-या बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारतातल्या मुस्लिमांची सुरक्षितता ही भारताची अंतर्गत बाब आहे. तुम्ही बांगलादेशातल्या हिंदूंची काळजी घ्याअसं लज्जामधल्या एका व्यक्तिरेखेच्या तोंडून सुनावण्याचं धैर्य तस्लिमा यांच्याकडे होतं. आज पाकिस्तानात झालेल्या शिखांच्या हत्येबाबत भारतामध्ये परराष्ट्र खात्याच्या स्तरावर आरडाओरडा चाललेला असताना पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांची सुरक्षितता ही पाकिस्तानची अंतर्गत बाब आहेअसं मत भारतासारख्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्रातही कोणत्याच स्तरावर व्यक्त झालेलं नाही, ही बाब तस्लिमा यांनी 1993 साली घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्याजोगी आहे. तस्लिमा यांच्या साहित्याचा वेगळेपणा, प्रगल्भता, तर्कशुद्धता त्यांच्या बंडखोरीला पुरून उरणारा आहे, तो असा. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0