स्त्रीवादी विचारधारेची वाटचाल
जात्यंधता, धर्माधता, वांशिक वैमनस्य, दहशतवादाने त्रासलेल्या जगाला सावरायचं तर स्त्री-मुक्तीवादी विचारधारेचं प्रकाशबीज जपण्याची गरज आहे. कारण याच विचारात वैश्विक मानवी संस्कृतीचं बीजही दडलेलं आहे.. आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री मुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ शारदा साठे यांचा विशेष लेख.
बघता बघता आंतरराष्ट्रीय महिलादिनाची शताब्दी होऊनसुद्धा गेली. काहींच्या हिशेबाने ती या वर्षी पूर्ण होणार. तर काहींच्या मते, ती 2008 सालीच झाली; पण या विषयावर शिवाजी महाराजांची जन्मतिथी आणि जन्मवर्ष यावर जसे वाद घातले गेले तसे वाद घालण्याचे काहीच कारण नाही. मानवमुक्तीच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात ही एक-दोन वर्षे म्हणजे दर्यामे खसखस! असो. तर 08 मार्च रोजी 100वा किंवा 102वा आंतरराष्ट्रीय महिलादिन मोठ्या धूमधडाक्याने साजरा होणार आहे. पहिल्या जगातली, दुस-या जगातली आणि तिस-या जगातली सर्व राष्ट्रे यात सामील व सहभागी असणार आहेत. सर्व भाषांतील दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके त्यासाठी खास पुरवण्या काढून स्त्री चळवळीने काय कमावले आणि काय गमावले, याचा आढावा घेणार आहेत. कोणी म्हणजे कोणीही त्यात मागे राहणार नाही. कामगार कष्टकरी स्त्रियांसाठी हा आपला, आपल्या मागण्यांसाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करायचा दिवस. सैन्याच्या अधिपत्याखाली वा टाचेखाली भरडल्या जाणा-या ब्रह्मदेश वा पाकिस्तानसारख्या देशातील स्त्रियांसाठी हा लोकशाही प्रस्थापनेचा लढा जारी ठेवण्याचा दिवस. मागास राष्ट्रांतील स्त्रियांच्या दृष्टीने जागतिकीकरणाच्या दुष्परिणामाविरुद्ध जागृती निर्माण करण्याचा हा दिवस. दहशतवाद, आतंकवाद आणि सीमा प्रश्नावरून एकमेकांशी शत्रुत्व बाळगून असणा-या देशांतील स्त्रियांसाठी तर किती तरी असंख्य प्रश्नांवर तटून उभे राहण्याचे सामर्थ देणारा हा दिवस, विकसनशील जगातील स्त्रियांसाठी सक्षमीकरणाची (आर्थिक, राजकीय, भौतिक) मार्गक्रमणा चालू ठेवण्याचे डावपेच आखण्याचा हा दिवस. भारतातील धार्मिक मूलतत्त्ववादाशी लढणा-या स्त्रियांसाठी- मग त्या अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, हिंदुस्थानमधील असोत की इंलंग्ड, आर्यलडमधील असोत, खूपच आव्हाने या दिवसाने समोर उभी केली आहेत. सूर्यप्रकाशात लोलक धरला तर प्रकाशात एकवटलेले निरनिराळे रंग दिसतात. त्या रंगांच्याही असंख्य रंगछटा असतात. तसाच काहीसा हा आंतरराष्ट्रीय महिलादिन आहे. हे निमित्त साधून निरनिराळे जनसमूह आपापले निर्धार आणि ओळखी घेऊन त्यांचेच सक्षमीकरण करण्याची स्वप्ने पाहतात, डावपेच आखतात आणि कृती करतात किंवा कृतीसाठी सज्ज होतात. सर्वाना आपण सर्वानी एकत्र येऊन, एकजुटीने हे करावे असे वाटत असते. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. 01 मे हा आंतरराष्ट्रीय कामगारदिन सा-या जगात साजरा होतो. जगातील कामगारांनीच एक व्हा असा नारा दिला जातो; पण तो कुठे एकत्र साजरा होतो? प्रत्येक कामगार संघटना आपापला झेंडा घेऊन, आपापले राजकारण घेऊन आणि आपली वैचारिक छत्री अबाधित ठेवण्याचा निर्धार करूनच कामगारदिन साजरा करते. तसेच या आंतरराष्ट्रीय संघटनांना ज्या प्रश्नांना प्राधान्य द्यावेसे वाटते, ते प्रश्न पक्षप्रणीत महिला संघटनांना त्यापुरते का होईना दुय्यम महत्त्वाचे वाटतात. त्यांचा स्वत:चा राजकीय पक्षाचा अजेंडा असतो. स्त्री कामगारांना संघटित करणा-या संघटनांना आपली महिला कामगार जमविण्याची क्षमता लक्षात घेऊन आपल्याच विभागाच्या मागण्यांना प्राधान्य देणारे निदर्शन करावेसे वाटते. राज्य शासन 31 मार्च डोळ्यासमोर ठेवून निधी मोकळा सोडते आणि ग्रामपंचायत, बचतगट, शासकीय योजनांच्या लाभार्थी स्त्रियांना एकत्र आणते.
व्यापक एकजुटीचा एकत्रित आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा होणे म्हणजे दुधात साखर; पण तसे घडले नाही म्हणून काही फारसे बिघडत नाही. त्या-त्या पातळीवर कमी-अधिक प्रमाणात स्त्रीमुक्तीचा विचार प्रसृत होतोच आणि त्याचा काही ना काही प्रभाव स्त्रियांवर आणि पुरुषांवरही पडल्याशिवाय राहत नाही. तेव्हा सर्वत्र होणा-या महिलादिनाचे स्वागतच करायला हवे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या संकल्पांचा परिपोष झाला, त्याही एका बाजूने समष्टीचे तर दुस-या बाजूने व्यक्तिस्वातंत्र्याचे परिमाण होते आणि जग होते नवोदित भांडवलशाहीचे व कारखानदारीचे. तेव्हापासून आजतागायत या तीनही संकल्पनांची वाटचाल भांडवलशाही पद्धतीनेच झाली आहे. समाजवाद आणण्याचे प्रयत्न फोल ठरले. तर भांडवलशाहीने आतापर्यंत लवचिकपणा दाखवून स्वातंत्र्या, समता व बंधुत्वाच्या सर्व घोषणांवर स्वामित्वच प्रस्थापित केले. जो प्रवास समाजवादाच्या प्रस्थापनेमुळे सुकर होऊ शकला असता तोच प्रवास भांडवलशाहीच्या लवचिक बांध्यामुळे रडत-रखडत, अडखळत करावा लागत आहे. त्यातून शंभर विकृती निर्माण होत असतील तर पन्नास तरी सुकृती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एखादी सुकृती गगनाला गवसणी घालणारी असू शकते. जसं हिंसाविरहित जग संपूर्ण जगाचे चित्र बदलू शकते.
असे म्हणतात की, जगातील युद्धे बंद झाली आणि युद्धसाधननिर्मिती थांबली तर जगात कुणीही उपाशी मरणार नाही, थंडीने कुडकुडणार नाही की बेघर राहणार नाही. एवढेच नव्हे; तर कुणीही दरिद्री राहणार नाही. पण ते तितके सोपे नाही. समृद्ध आणि श्रीमंत अमेरिकेत वंचित जनविभाग आहेत आणि गरीब भारतातच एक मोठी श्रीमंत अमेरिका वसलेली आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येएवढा सज्जड आणि सुखाची साधने बळकावून बसलेला मध्यमवर्ग एकटय़ा भारतात आहे. पेट्रो डॉलर्सनी गब्बर बनलेले अरब जग आहे आणि त्याहीपेक्षा अधिक संख्येने गरिबीचे भोग वाट्याला आलेले आफ्रो-आशियाई मुस्लिम जग आहे. त्यांचा धर्म एक आहे म्हणून त्यांच्यातली विषमता काही संपुष्टात आलेली नाही आणि अन्यायही दूर झालेला नाही.
आफ्रिका खंडातील नैसर्गिक खनिज संपत्तीवर आता कम्युनिस्ट चीनसकट सर्व विकसित राष्ट्रे नजर लावून आहेत. त्यांना आफ्रिकेचा विकास करून ‘आपलेच’ दारिद्रय़ नष्ट करायचे आहे. तिथे तर वांशिक संहार आणि अफाट भूकमारी व दारिद्रय़ यांनी थैमान मांडले आहे. उत्तर गोलार्धातील सधन आणि प्रगत राष्ट्रे व दक्षिण गोलार्धातील अर्धविकसित व दरिद्री राष्ट्रे पर्यावरणाच्या प्रश्नावर एकमेकांविरुद्ध उभी ठाकलेली आपण पाहतोच आहोत.
जात्यंधता, धर्माधता, वांशिक वैमनस्य, राष्ट्रदुराभिमान, अण्वस्त्रे, युद्धसाधन निर्मिती, दहशतवाद व दहशतवादाची आंतरराष्ट्रीय जाळी आणि स्थानीय दहशतवादाची अमानुष रूपे यांनी आज जगाला वेढले आहे. त्यामुळे आपण एका ब्लॅक होलच्या खोल-खोल गर्तेत कोसळत आहोत की काय, असे वाटू लागते. पण त्या अंधाराला भेदण्यासाठी काही प्रकाशकिरणेही आपल्याजवळ आहेत. पुरुषप्रधान समाजरचनेशी विद्रोह करत स्त्रीमुक्तीवादाची प्रतिक्रियात्मक विचारधारा हा एक प्रकाशकिरण आहे. तिने आपले प्रकाशाचे जाळे सर्वदूर फेकण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्त्रीमुक्तीच्या विचारातच जात, धर्म, वंश, वर्ग, वर्ण, राष्ट्र यांना सुष्टतेच्या मार्गावर घेऊन येण्याची ताकद आहे. एक वेळ अशी होती की, स्त्रीमुक्तीचा विचार स्त्रियांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज होती. आता गरज आहे, ती तो विचार सार्वत्रिक करण्याची. या विचारात हिंसारहित समाजनिर्मितीचे बीज आहे. दारिद्रय़निर्मूलन आणि विषमतानिर्मूलनाचेही बीज आहे. याच विचारात सर्वधर्मसमभावाचे, वैश्विक मानवी संस्कृतीचे बीज आहे. सर्वसमावेशकतेचे बीज आहे. म्हणूनच मला असे वाटते की, आंतरराष्ट्रीय महिलादिन कोणीही साजरा करावा. अगदी घराघरात तो साजरा झाला तरी चालेल.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा