ज्याचा त्याचा टायगर
आपल्या समस्येवर घराबाहेर उत्तर शोधताना समोर येणाऱ्या प्रलोभनांच्या मोहात आपण घसरलो आणि घराला विसरलो, असे टायगर म्हणतो; पण त्यापेक्षाही ‘अपार कष्ट करून पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर चालून येणा-या प्रलोभनांचा उपभोग घेणे, हा आपला अधिकारच आहे, अशी आपली भावना झाली होती,’ असे तो म्हणतो. एकविसाव्या शतकात पैसा आणि प्रसिद्धी यांच्यामागे धावणा-या कोट्यवधी पुरुषांची नेमकी हीच भावना झालेली आहे. प्रत्येक पुरुषात एक टायगर दडून बसलेला आहे.
पापाची कबुली, म्हणजे ‘कन्फेशन’, देऊन ते थोडेफार धुऊन टाकण्याची चांगली प्रथा बौद्ध, ख्रिश्चन धर्मात आहे. जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्स याचा ‘कबुलीजबाब’ सध्या गाजतो आहे. मराठी किंवा इतर भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांतून फारसे नसेल; पण इंग्रजी आणि विशेषत: अमेरिकी प्रसारमाध्यमांतून हा विषय विलक्षण चवीने चघळला जातो आहे.
नावलौकिक असलेल्या व्यक्तींवर प्रसारमाध्यमांची घारीसारखी नजर असते. जणू त्यांना खासगी आयुष्य नसतेच. प्रिन्सेस डायना आणि युवराज चार्ल्स यांच्यातील बेबनाव चव्हाट्यावर आणला, तो माध्यमांनीच. डायना ही विसाव्या शतकाच्या काठावरची, ‘शायगर्ल’चे ‘बोल्ड अँड ब्युटीफुल’मध्ये रूपांतर झालेली आधुनिक स्त्री होती. अॅण्ड्रय़ू मॉर्टनमार्फत आपली ‘ट्रू स्टोरी’ तिने जगाला सांगितली आणि जेम्स ह्युइटबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांचीही कबुली दिली, तेव्हा केवढा गहजब उडाला होता. मात्र लग्नानंतरही कॅमिला पार्कर-बोल्स या आपल्या प्रेयसीबरोबर संबंध ठेवणा-या युवराज चार्ल्सने असे कन्फेशन दिले नाही. उलट डायनाच्या ‘अपघाती मृत्यू’नंतर घटस्फोटिता कॅमिलाशी विवाह करून तिला राजप्रासादात आणले.
हाच चार्ल्स उद्या इंग्लंडचा राजा होऊ शकतो. त्याला राणीने केव्हाच माफ केले आहे आणि प्रजेनेही!
एड्रिक टॉण्ट ऊर्फ ‘टायगर’ वुड्स हा युवराज नाही किंवा बिल क्लिंटनसारखा अमेरिकेचा (तत्कालिन) अध्यक्ष नाही; पण जगातील एक प्रसिद्ध गोल्फपटू आणि अब्जाधीश तरुण (वय 33) आहे. एलिन नॉर्दग्रेन नावाची एक, सुंदर म्हणावी अशी, पत्नी तसेच सॅम आणि चार्ली अशी दोन गोंडस मुले असलेल्या टायगरच्या गाडीला तीन महिन्यांपूर्वी अपघात झाला. टायगरच्या बेफाम ड्रायव्हिंगमुळे नव्हे, तर त्याच्या भानगडीसंदर्भात एलिनबरोबर चाललेली बाचाबाची हातघाईवर आल्यामुळे हा अपघात घडला, असा शोध माध्यमांनी लावला. न्यूयॉर्कच्या नाइट क्लबमधील राशेल उशिटेल या तरुणीबरोबर टायगरचे संबंध असल्याचा दावा ‘नॅशनल एन्क्वायरर’ या टॅब्लॉइडने केला होता. अर्थात, टायगरने त्याचा आधी इन्कार केला. पण एप्रिल 2007मध्ये लास वेगास येथे टायगरची भेट झाल्यापासून आपले त्याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे आणखी एक वेट्रेस जेमी ग्रब्स हिने जाहीरपणे सांगितले. पाठोपाठ अनेक जणींचे नाव टायगरला जोडून त्याच्या भानगडींची चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागली आणि टायगरला तोंड उघडणे भाग पडले.
मोटार अपघाताबद्दल 164 डॉलर्स दंड भरताना टायगर फक्त तेवढीच जबाबदारी स्वीकारू शकला असता; पण त्याने धर्माचा आधार घेतला, तसे उपचार घेतले आणि त्याचाच भाग म्हणून ‘कन्फेशन’ दिले.
संसारी असूनही बाहेर संसारसुख शोधण्याची प्रतारणा आपण केली, हे कबूल करताना टायगरने दिलेला संपूर्ण जबाब इंटरनेटवर, माध्यमांत उपलब्ध आहे. तडे गेलेले घर सावरण्यासाठी टायगरने आता व्यावसायिक गोल्फमधून दीर्घकाळासाठी रजा किंवा निवृत्तीही घेतली आहे.
‘भानगड’ चव्हाट्यावर आलेला टायगर हा काही जगातील पहिला पुरुष नाही आणि विवाहबाह्यसंबंध असलेला एकमेवही नाही. विवाहबाह्यसंबंध ठेवण्यास बहुतांशी कोणताच धर्म आणि समाजही मान्यता देत नाही. अविवाहित राहून परस्त्रीशी किंवा परपुरुषाशीही संबंध ठेवणारे ही आणखी एक वर्गवारी आहे; पण चार्ल्स-डायना, क्लिंटन-मोनिका लुइन्स्की यांच्यापासून एन. डी. तिवारी यांच्यापर्यंतच्या अनेक प्रकरणांमध्ये मुख्य आक्षेप होता, तो आपली पत्नी अथवा पती यांच्याशी केलेल्या प्रतारणेचा.
माणूस हा कळप करून राहतो; त्याच्या समूहाने काही नीतिनियम बनवलेले असतात आणि समाजात राहणाऱ्या प्रत्येकाला ते पाळावे लागतात.
मनुष्याची व्याख्या ‘सोशल अॅनिमल’ म्हणजे ‘सामाजिक प्राणी’ अशी केली जाते. डेसमंड मॉरिस त्याचे वेगळेपण सांगतानाही ‘नेकेड एप’ असे संबोधतो. दोन पायांवर चालणारा मनुष्य हा बुद्धी, वाचाशक्ती अशा काही नैसर्गिक देण्यांमुळे शेकडो चतुष्पाद प्राण्यांपेक्षा निराळा असला, आणि ‘सामाजिक’ असला, तरीही एक ‘प्राणी’ आहे, हे समजाशास्त्रज्ञही मानतात. प्राण्याप्रमाणेच त्याच्याही काही नैसर्गिक ऊर्मी असतात; पण समाजात राहताना समाजस्वास्थ्यासाठी काही नीतिनियमांचे बंधन त्याला पाळावे लागते. पती किंवा पत्नीखेरीज इतर कोणाशीही शरीरसंबंध न ठेवणे, हा त्यातीलच एक.
हिंदूधर्मात प्रभू रामचंद्र हा एकपत्नीव्रती आणि आदर्श पुरुष मानला जातो; पण त्याच धर्माचे, आज जगभरात असलेले किमान 50 कोटी (अर्थात पुरुष) नागरिक रामावतारी किंवा रामासारखेच एकनिष्ठ आहेत, असे कोणीच म्हणणार नाही. आपल्या एकनिष्ठतेची, स्वच्छ चारित्र्याची ग्वाही सर्वच जण देत असले तरी प्रतारणेची संधीच न मिळाल्यामुळे ‘सक्तीने चारित्र्यवान’ राहावे लागणा-यांचीच बहुसंख्या असते, असे ग. वा. बेहरे म्हणत. ते खोटे म्हणता येत नाही!
प्रसिद्ध कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ‘कामेरू’ नावाची एक कादंबरी आहे. त्यातही त्यांनी भानगड चव्हाटय़ावर येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाचेच चारित्र्य सुरक्षित असते, अशी मांडणी केली आहे.
टायगर वुड्स हाही तीन महिन्यांपूर्वीपर्यंत ११ कोटी डॉलर्सची मालमत्ता असलेला, जगातील अव्वल व्यावसायिक गोल्फपटू आणि एक छान नवरा, घरेलू माणूसच होता. त्याच्याशी असलेल्या संबंधांची वाच्यता जेमी अथवा आणखी कोणी केलीच नसती, तर जगाच्या दृष्टीने तो बदफैली, व्यभिचारी ठरलाच नसता.चारित्र्याची सीमारेषाच एवढी धूसर असते. त्यामुळे फसवणूक करणे पाप ठरण्याऐवजी उघडकीला आलेली फसवणूक ‘पाप’ ठरते. पत्नी एलिन हिला कळू न देता टायगर अनेक जणींशी गेली काही वर्षे संबंध ठेवून होता. तिला ते अज्ञात होते, तोपर्यंत तो ‘चारित्र्यवान’च होता. व्यवहार परस्पर संमतीने चालू होते, तोपर्यंत ते ‘गैर’ नव्हते. पण उघडकीस आल्यावर ते ‘पाप’ ठरले. टायगरने या ‘पापकृत्या’ची कबुली दिली, त्यासाठी पैसा-प्रसिद्धी यावर पाणी सोडून शिक्षा भोगण्याची आणि जखम भरून काढण्याची तयारी दाखवली.
अशी माफी मागितली, प्रायश्चित घेतले, म्हणजे दोषमुक्त होता येते, असे नाही. टायगरच्या हातून घडले, त्याचे समर्थनही होऊ शकत नाही. तरीसुद्धा एक मान्य करायला हवे की, पापाची कबुली देण्यासाठीही ‘माणूस’ असावे लागते.
टायगरला या सर्व घटनाक्रमातून मिळालेला धडा मोठा आहे. यातून तो सावरला, तर पुन्हा त्या वाटेकडे तो फिरकणार नाही, असे अनेक जण मानतात. ‘जग राधेच्या वेडेपणावर नाही, तर तिचा पती अनय याच्या समजूतदारपणावर चालते,’ असे एक छान विधान आहे. ‘आस्था’ चित्रपटातील अमर हे कटू वास्तव स्वीकारतो. एलिनने असाच समजूतदारपणा दाखवावा की नाही, हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे.
आपण ‘घसरलो’ असे कबूल करताना टायगरने त्याचे समर्थन केलेले नाही, पण आपली वैयक्तिक अडचण (प्रॉब्लेम’) होती, असे सूचक विधान केले. त्याचे त्याने स्पष्टीकरण द्यावे, असा आग्रह धरणा-यांना त्याच्या वैवाहिक जीवनातील बेबनावाची चर्चा करून अब्रूचे धिंडवडे काढण्याचीच खुमखुमी असणार, हे उघड आहे. अर्थात, टायगरने तो ‘प्रॉब्लेम’ उघड करण्याची काही गरज नाही; कारण तो त्याच्या खासगी आयुष्याचा प्रश्न आहे.
टायगरचे एक विधान मात्र त्याच्या अमेरिकेलाच नव्हे, तर बहुतांश जगालाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे.
आपल्या समस्येवर घराबाहेर उत्तर शोधताना समोर येणा-या प्रलोभनांच्या मोहात आपण घसरलो आणि घराला विसरलो, असे टायगर म्हणतो. पण त्यापेक्षाही ‘अपार कष्ट करून पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर चालून येणा-या प्रलोभनांचा उपभोग घेणे, हा आपला अधिकारच आहे, अशी आपली भावना झाली होती,’ असे तो म्हणतो.
एकविसाव्या शतकात पैसा आणि प्रसिद्धी यांच्यामागे धावणा-या कोट्यवधी पुरुषांची नेमकी हीच भावना झालेली आहे.
प्रत्येक पुरुषात एक टायगर दडून बसलेला आहे. ते मान्य न करणारा एक तर ‘अमानवी’ असेल, कमालीचा नीतिमान, प्रभू रामचंद्र असेल किंवा धादान्त खोटारडा तरी असेल. जे आपले नाही, ते आपल्याला लाभावे, अशी अभिलाषा प्रत्येकाच्या मनात असते. ती स्वाभाविक असते. वैषयिक भावनेचा त्यास अपवाद करता येत नाही. पण गौरी देशपांडे यांचा ‘तेरुओ’ कादंबरीतच छान असतो. तो जोपर्यंत स्वप्नरंजनापुरता, मानसिक प्रतारणेपुरता असतो, तोपर्यंत चालू शकते. अभिलाषेचे रूपांतर हव्यासात झाले आणि पैसा-प्रसिद्धीच्या बळावर उपभोगाचा अधिकार मिळवण्यासाठी पाऊल टाकले गेले की, तो व्यभिचार ठरतो.
अशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फसवणूक, प्रतारणा सारेच जण क्षणोक्षणी करीत असतात. आपण चारित्र्यवान आहोत, असे म्हणवून घेत स्वत:ची फसवणूक करीत राहतात. टायगरला व्यभिचारी ठरवून स्वत:ला ‘स्वच्छ प्रतिमे’च्या वर्गात उभे करू पाहतात. आपल्याकडे भले पैसा-प्रसिद्धी नसेल, पण उद्या कसोटीचा क्षण आला, तर सुनीता देशपांडे यांनी ‘आहे मनोहर तरी..’मधून जगाला दाखवून दिलेल्या भय्याप्रमाणे निसरड्या पायरीवरही तोल सांभाळणे आपल्याला जमेल का, या प्रश्नाचे उत्तर ज्याने-त्याने शोधावे.
..आणि त्यापेक्षाही असे ‘पाप’ आपल्या हातून घडलेच तर टायगरप्रमाणे ‘कन्फेशन’ देण्याची तयारी आपली असेल का, याचेही खरेखुरे उत्तर प्रत्येकाने स्वत:ला द्यावे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा