पहिले पान | कोलाज | बाकी प्रश्न..

बाकी प्रश्न..

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

देश स्वतंत्र झाला म्हणजे तो इथल्या सर्व लोकांचा झाला. या स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडताना मात्र काही क्षेत्रांत लोक बाजूलाच पडल्याचं दिसतं. शिक्षण आणि आरोग्य सर्वापर्यंत पोहोचत नाही, तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचे फायदे ‘जनते’पासून दूरच राहतात. राज्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि वैज्ञानिक प्रगतीच्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केला, पण अजेंडा अधुराच राहिला. प्रसंगी सरकारच्या विरुद्ध जाऊन वेगळी उत्तरं शोधण्याचं काम ज्या लोकचळवळींनी केलं, त्यातून आलेले हे तिघा कार्यकर्त्यांचे खास लेख. अनुभवातून आलेल्या या उत्तरांची चर्चा व्हायलाच हवी!

  • स्वतंत्र विचाराचे शिक्षण आहे कुठे? 

हुमायून मुरसल

जात, धर्म, लिंग, भाषा आणि वंश असा कोणताही भेद न करता, प्रत्येकालाकायद्यापुढे समानताएवढ्या व्यापक स्वातंत्र्याचा अनुभव जातीव्यवस्थेने पिडलेल्या जनतेला संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच मिळाला, तो 15 ऑगस्ट 1947 रोजी. हजारो वर्षाच्या गुलामीला स्वल्पविराम मिळाला आणि भांडवली लोकशाही विराजमान झाली. तरीही हा बदल अनन्यसाधारणच होता. आधुनिक शिक्षणाची दारे मागासवर्गीयांसह स्त्रियांना खुली झाली ती ब्रिटिशांमुळे! त्यापूर्वी कोण्या सुलतान वा महाराजांना अशी ना बुद्धी सुचली ना धारिष्ट झाले.

त्रेसष्ट वर्षात देशाने केलेलीआर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीनेत्रदीपकच आहे. आज देशात 300 विद्यापीठे आहेत. देशी-परदेशी विद्यापीठांची भर पडत आहे. अवकाश, जनुकियपासून अणुतंत्रापर्यंत सर्व प्रकारचे संशोधन करणा-या दर्जेदार संस्था आपल्याकडे आहेत. लोकसंख्येच्या जोरावर जागतिक बाजारपेठेला तंत्रज्ञ, वैज्ञानिक पुरवू एवढाह्यूमन रिसोर्सचा साठा आपल्याकडे निर्माण होतोय. एकट्या आयआयटीसाठी सात हजार स्पर्धक दरवर्षी प्रयत्न करतात. जागतिकीकरणाच्या स्पर्धेसाठी आणि विकसित देशाच्या पंक्तीत बसण्यासाठी आपण किती आतुर आहोत, हे यावरून दिसते.

सहिष्णुता आणि कत्तली, चराचरात देव आणि माणसाला पशुतुल्य वागणूक, हा विरोधाभास आपल्या समाजाचा स्थायीभाव राहिला आहे. त्यामुळे शैक्षणिक विषमता स्वाभाविक मानली गेली. उच्च शिक्षणाचा गतीने विकास करणारे सरकार सामान्य माणसाला मुलभूत प्राथमिक शिक्षणाचा हक्क देण्यासाठी 2010 सालाची वाट पाहते.. तेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 17 वर्षानी! यात आश्चर्य कसले? मुस्लिमांची 25 टक्के मुले शाळेत जात नाहीत असे न्या. सच्चर यांनी सांगितले, पण सर्व सरकारी मदत असूनही दलित-आदिवासींची अवस्था यासारखीच आहे. एकंदर 44 टक्के मुले पहिल्या चार वर्षात गळतात. आज निव्वळ साक्षरता 64 टक्के आहे. यातही स्त्री-पुरुषांतील तफावत 25 टक्के तर ग्रामीण-शहरी तफावत 20 टक्के आहे. यावरून वर उल्लेखलेल्या प्रगतीचा अर्थ लावला जावा.

जीवन शिक्षण हा विचार मागे पडून शिक्षण देणे आणि घेणे यात सरळ धंदेवाईक विचार रुजला आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांच्या दरमहा लाखो रुपयांच्या पगारांनी नवमध्यमवर्गाला भुरळ पाडलेली आहे. भावी उत्पन्नाचा विचार करून आज शिक्षणासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करायला माणसे तयार आहेत. दर्जेदार इंग्रजी शिक्षण संस्थेत प्रवेश आणि शिकवण्यासाठी झुंबड आहे. शिक्षण हे नफा देणारा उद्योग बनल्यामुळे अनेक भांडवलदार आणि कार्पोरेट्स कोट्यवधींची गुंतवणूक करत आहेत. अनेक शहरांतून खासगी नावाजलेली शिक्षण केंद्रे अस्तित्वात आली असून तेथे अब्जावधींची उलाढाल सुरू आहे. दुसरीकडे दररोज एक मराठी सरकारी शाळा बंद पडत आहे. या प्रक्रियेतून हद्दपार होणारा कोणत्याही धर्मा-जातीचामराठी माणूसकोठे जाणार?

ज्या शैक्षणिक प्रगतीबद्दल आपण बोलतो ते नेमके कोण आहेत? त्यांची टक्केवारी काय? देशात 20 वर्षावरील लोकांच्या लोकसंख्येमध्ये 6.7 टक्के सर्व ग्रॅज्युएट आणि 0.7 टक्के डिप्लोमा-सर्टिफिकेटधारक आहेत. (सर्व आकडे 2001च्या जनगणनेनुसार) मुस्लिमांची ही आकडेवारी 3.6 टक्के आणि 0.4 टक्के तर दलित आदिवासींची एकत्रित 2.4 टक्के आणि 0.3 टक्के आहे. याचा अर्थ उच्च शिक्षणातील ही प्रगती आणि प्रचंड गुंतवणूक मूठभर श्रीमंत आणि मध्यमवर्गासाठीच आहे. ग्रामीण, अविकसित प्रदेशातील, त्यानंतर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लिम इतर ओबीसी या जनतेच्या समान संधीचे काय? ग्रामीण टॅलेंट नवोदय विद्यालयात सामावून तर इतरांना राखीवतेचे आमिष दाखवून त्यांच्या असंतोषाचा निचरा केलेला आहे. त्यामुळे जे यशस्वी होत नाहीत ते स्पर्धेत कमी पडतात. म्हणजे अपात्र ठरतात. ही व्यक्तिगत उणीव आहे, यात व्यवस्थात्मक दोष नाही असेच मानायची मोकळीक!

आजकाल मराठीच्या प्रेमाची चलती आहे. मराठी पाट्या, मराठी सिनेमा, मराठी गाणी यांसाठी मोठा आग्रह आहे, पण शिक्षणातल्या मराठीचे काय? ग्रामीण भागातल्या झोपडपट्टी, कामगारवस्ती, गावकुसाबाहेरच्या, भटक्या-विमुक्तांसाठी आणि मोहल्लावाल्यांसाठी संस्कृतप्रचुर, शुद्ध, पुस्तकीस्टँडर्ड मराठी ही इंग्रजीइतकीच परकीय भाषा आहे. वाचन आणि शुद्ध लेखनासाठी वर्षानुवर्षे खर्डेघाशी करूनही किती टक्के मुलांना आकळते प्रश्नच आहे. याची खात्री करण्यासाठी सर्व वर्गातून मराठी विषयात नापास होण्याची आकडेवारी पाहावी! अथवा प्राथमिक-माध्यमिक शाळेचे पेपर तपासणा-या शिक्षकांना खरे बोलणार असतील तर विचारावे. सरकारची प्रशासकीय, तांत्रिक भाषा वाचायला धास्ती वाटते. शब्दकोशातही ती सापडत नाही. त्यापेक्षा इंग्रजी शब्दाने हायसे वाटते! कोणाच्या कानाखाली फटका मारून हा बदल होणार?

शिक्षण हे सरकार, सत्ताधारी आणि समाजातील वर्चस्ववादी गटांसाठी आपल्या विचासरणीला आणि सत्तेलामान्यताप्राप्त करण्याचे साधन असते. भांडवली उत्पादन व्यवस्थेचे पुनरुत्पादन आणि जतन करण्याचे माध्यम असते. त्यामुळे शिक्षणात (मेकॉलेनीतीपासून अलीकडे गुजरातमध्ये झालेल्याभगवेकरणापर्यंत) राजकारण आहे. अंकित करण्याचे किंवा कोऑप्ट करण्याचे राजकारणहीमान्यतेचे राजकारणच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत सामावून मोठ्या संख्येने असलेल्या पददलित जनतेची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न झाला. डॉ. आंबेडकरांची भूमिका न समजावून घेताच त्यांच्या अनुयायांनी घटनेला आदर्श आणि पवित्र मानले. त्यामुळे त्यांना कोऑप्टकरणे सोपे झाले. ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध लढ्यापुरते महात्मा फुलेंना मराठ्यांनी वापरले; पण त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माला सोडचिठ्ठी दिली. त्यांची मुले आता हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते बनलीत. बहुजनांना शिक्षण मिळाल्यास मुक्तीचा मार्ग मिळेल ही समजूत भाबडेपणा ठरली. फुल्यांचंगुलामगिरीवाचून त्यांचे शिक्षणसम्राट वारसदार स्वत:च शोषक बनले. राजर्षी शाहूंचा आदर्श बाजूला सारून मराठा शॉव्हेनिझम वाढला. परिवर्तनवाद्यांची अशी शोकांतिका झाली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणा-यांचा राडा सुरू आहे. या सा-या गदारोळात मराठी माणूस, त्याचा अंतरात्मा स्वतंत्रपणे काही विचार करू शकेल, एवढे तरी या शिक्षण व्यवस्थेने त्याला दिले आहे का?

(लेखक कोल्हापूरमधील सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

  • विज्ञानाला विवेकाची वेसण कधी 

सुहास परांजपे

 स्वातंत्र्यानंतरची एक-दोन दशके आशेची, उमेदीची होती. एका नव्या स्वतंत्र आणि समर्थ भारताच्या उभारणीत विज्ञान-तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान आपण दिले होते. मोठ्या अपेक्षेने वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिक संस्था उभ्या केल्या होत्या. या क्षेत्रात स्वावलंबी होणे हा उद्देश होता. विज्ञान-तंत्रज्ञान सर्वाना सुखी व समृद्ध जीवन मिळवून देण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरेल, असा आत्मविश्वास होता. त्यानंतर बराच काळ लोटला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाने या काळात काय दिले, काय दिले नाही, याचा थोडा हिशेब मागे वळून करायला हवा.विज्ञान-तंत्रज्ञानाने साधलेली प्रगती आज आपले डोळे दिपवते. घराघरात मोबाइल, टीव्ही पोचला आहे. अजस्त्र कारखाने, अजस्त्र धरणे, मायाक्रोसर्जरी, पाहिजे त्या गुणधर्माचे धातू आणि संगणक क्षेत्रात तर बोलायलाच नको; पण याच विकासाचा परिणाम म्हणून आपल्या दिपलेल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीदेखील आहेत. जगातला सर्वात मोठा औद्यागिक अपघात-भोपाल वायुगळती आहे. आपल्या नद्यांची गटारे झालेली आहेत. अणुभट्टय़ा जशा आहेत तसा जादुगुडाच्या लोकांना झालेला अणुसंसर्गही आहे. ठिकठिकाणी प्रदूषकांनी केलेला उत्पात आहे - बडोद्याच्या केमिकल गोल्डन कॉरिडोरमधल्या विहिरीतून निघणारे पिवळे पाणी आहे. देशोदेशी धातू मिळावेत म्हणून खाणकामातून उद्ध्वस्त होणारे आदिवासी प्रदेशही आहेत. शेतक-यांना जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली स्वत:च्या हातात नियंत्रण एकवटणारी आणि निसर्गात अनियंत्रित जनुके सोडणारी हायब्रीड व बीटी पिके आहेत किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या नावावर त्यांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण करण्याच्या उद्देशांनी त्यांच्या शरीराशी केलेले खेळ आहेत. याशिवाय जागतिक पातळीवर होणारे हवामानातले बदल आणि त्यांचा परिणाम ही एक वेगळीच कथा आहे. एक काळ असा होता की, तेव्हा जे जे सर्वात आधुनिक, सर्वात पुढारलेले ते स्वागतार्ह ठरत होते. प्रगतिशीलतेचा तो हवाला होता. आज तसे राहिलेले नाही. अणुऊर्जेचे तंत्र सर्वात पुढारलेले म्हणून त्यालाच आजचा पर्याय मानणे चुकीचे ठरेल. अणुऊर्जेत करावी लागणारी किरणोत्सर्गक पदार्थाची व्यापक व मोठ्या प्रमाणावर होणारी हाताळणी विसरून चालणार नाही, त्या प्रक्रियेतून शिल्लक उरणा-या शेकडो-हजारो वर्षाचे अर्ध-आयुष्य असणा-या किरणोत्सारी पदार्थाच्या समस्येचे गांभीर्य विसरून चालणार नाही किंवा अणुभट्टय़ांमध्ये काम करणा-या कामगारांच्या धोक्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.कुंग फू ते कलारीपट्टूपर्यंत पूर्वीची सगळी सैनिकी शास्त्रं पहिली तर त्यातून एक शिकवण अभिप्रेत दिसते. समोरच्या माणसाला प्रचंड इजा करण्याची ताकद ही शास्त्रे देत. म्हणूनच त्यांचा चांगल्या स्वभावावर शांत व अहिंसक वागणुकीवर भर असे. विध्वंसाची प्रचंड ताकद असणे याचा अर्थ त्या ताकदीच्या वापरावर विवेकाची वेसण हवी, असे सूत्र होते. आज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान ही वेसण हरवून बसले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसांच्या, त्यांच्या आयुष्याच्या, परिसराच्या आणि एकंदर निसर्गाच्या क्रमांमध्ये उलथापालथ घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य खचितच मिळवले आहे; पण त्यात या विवेकनिष्ठतेचा जवळपास पूर्ण अभाव आहे.अन् का नसावा? ज्या समाजातून हे विज्ञान-तंत्रज्ञान उभे राहिले आहे, त्याची छाप त्याच्यावर पडणे अपरिहार्य आहे. विज्ञान-तंत्रज्ञान कसे असेल, त्याच्या विकासाची दिशा कशी असेल हे काही सामान्य माणसे किंवा शास्त्रज्ञ ठरवत नाहीत. ते ठरते ते नफेखोरीवर आधारलेल्या आपल्या व्यवस्थेमार्फत, खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बोर्डरूम्समध्ये. ही नफेखोरी माणसांच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहत नाही. भोपाळ आणि औषध कंपन्या ही याची ढळढळीत उदाहरणे आहेत. ज्यांना त्यातून लाभ होतो ते एका वेगळ्या चकाकणा-या दुनियेत वावरत असतात. त्याच्या दुष्परिणामांत जगत असणा-यांचे एक वेगळे जग असते. या चमचमत्या परीघाबाहेरच्या अंधारात हे दुभंगलेपण फार सोयीचे असते. मात्र काही परिणाम- उदाहरणार्थ, हवामान बदल - असे असतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्यच नसते! लोकाभिमुख विज्ञान-तंत्रज्ञानाच्या निर्मितीची, त्यांच्या लोकाभिमुख वापराची मागणी घेऊन संघर्ष केल्याशिवाय या व्यवस्थेतवर विवेकाची वेसण पडणार नाही. मनुष्यांचे व निसर्गाचे संरक्षण - संवर्धन करणारे विज्ञान-तंत्रज्ञान शक्य आहे; पण ते निर्माण होईल या व्यवस्थेशी आणि आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या स्वरूपाशी दिल्या जाणा-या संघर्षातून. (लेखक soppecom या संस्थेत पाणी व जमीन या विषयावर गेली अनेक वर्षे काम करत  आहेत.)   
  • सर्वासाठी आरोग्यकोणत्या मार्गाने

डॉ. अनंत फडके 

 

स्वातंत्र्य मिळून 63 वर्षे झाली. तरी सर्व जनतेचा हक्क म्हणून आरोग्य-सेवा पुरवण्याचे आव्हान अजूनही सरकारने पेललेले नाही. अत्यंत तुटपुंजी, सुमार दर्जाची सरकारी आरोग्य सेवा व अनियंत्रित म्हणून बरीचशी अशास्त्रीय व महागडी खासगी आरोग्य सेवा असे आजचे एकंदरीत चित्र आहे. ग्रामीण भाग, गरीब भाग, गरीब जनता, विशेषत: आदिवासी मोठय़ा प्रमाणात आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. आरोग्य सेवा पुरवण्याच्या स्वत:च्या जबाबदारीकडे काणाडोळा करायचा व खासगी सेवेला मुक्त स्वातंत्र्य द्यायचे या धोरणामुळे हे चित्र उभे राहिले आहे. ते बदलूनसर्वासाठी आरोग्य सेवाहे ध्येय येत्या 10 वर्षात गाठणे शक्य आहे. मात्र त्यासाठी मोठा सामाजिक राजकीय दबाव निर्माण व्हायला हवा. असा दबाव निर्माण झाला तर - 1) सरकारी आरोग्य व्यवस्थेत वाढ आणि सुधारणा व 2) खासगी सेवेच्या दर्जा व शुल्काचे प्रमाणीकरण या दोन्हीची धोरणे प्रत्यक्षात येतील.

  • सरकारी आरोग्यसेवेसाठी..
सरकारी दवाखाने, रुग्णालये मिळून देशातील फक्त सुमारे 15 टक्के रुग्णांवर उपचार करतात. या सेवांचा दर्जा सुमार आहे. लोकांचा त्यावर फारसा विश्वास नाही. त्यांच्याशी संवाद, नाते व सेवा यात आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे. ती करताना सार्वजनिक व्यवस्थेत दुप्पटी-तिपटीने वाढ करायला हवी. कारण खासगी दवाखाने, रुग्णालये कशी असावीत याचे मापदंड समाजात रुजवण्यासाठी ठिकठिकाणी चांगले सरकारी दवाखाने व रुग्णालये हवीत. पण सध्या ती खासगी डॉक्टरांना, ट्रस्टना चालवायला दिली जात आहेत. सरकारने ती स्वत: चालवायला हवीत. पुण्यात मनपाची किमान आरोग्य-यंत्रणा असल्यामुळे स्वाइन-फ्लूच्या साथीला तोंड देता आले. पण ही यंत्रणा अपुरी असल्याने तिच्यावर प्रचंड ताण पडला व लोकांचीही खूप गैरसोय झाली. साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध अशा वेळी सार्वजनिक व्यवस्थेचा कणा अत्यावश्यक असतो. त्यामुळे सुधारित रूपातील सरकारी आरोग्य यंत्रणा दुपटी-तिपटीने वाढवण्यासाठी नियोजन करायला हवे.
  • खासगी सेवांचे काय?
तसे केले तरी अनेक वर्षे खासगी आरोग्यसेवा ही प्रमुख सेवा राहणार हे उघड आहे. इतर अनेक देशांमध्ये खासगी डॉक्टरांची बिले बहुतांशी सार्वजनिक पैशातून दिली जातात. भारतात याच दिशेने जायला हवे. याचे विशेष कारण म्हणजे कितीही रास्त शुल्क आकारले तरीही भारतातील निदान 40 टक्के गरीब जनता व कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांनाही खासगी आरोग्यसेवा परवडत नाही. या सेवेच्या दर्जाचे अजून प्रमाणीकरण झालेले नाही. काही नामांकित रुग्णालयांमध्ये सुयोग्य इमारत, चांगली यंत्रसामुग्री/उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी या निदान पूर्व अटी पूर्ण केलेल्या असतात. (या सर्वाचा रुग्णाच्या हितासाठी मेळ घालणे व रुग्णाशी संवाद साधणे याबाबतीत मात्र भरवसा देता येत नाही.) पण इतर अनेक दवाखाने व रुग्णालये यामध्ये तर या पूर्व अटीही पूर्ण केलेल्या नसतात. हे चित्र बदलून खासगी दवाखाने, रुग्णालये यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ व कामकाज-पद्धत याबाबतचे किमान मापदंड ठरवले पाहिजेत व त्याआधारे प्रमाणिकरण करायला हवे. सरकारने खासगी सेवेची बिले प्रमाणित सेवेसाठी प्रमाणित शुल्कया आधारेच भागवली पाहिजेत असा इतर देशांचा अनुभव सांगतो.टायफॉइड, मलेरिया, हृदयविकार आदींची शंका आली की निरनिराळ्या पातळीच्या हॉस्पिटल्समध्ये प्रमाणित सेवा द्यायचे म्हणजे काय हे तज्ज्ञ समित्यांनी ठरवावे लागेल. तसेच कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारायचे हेही ठरवावे लागेल. या वाटाघाटींमध्ये खासगी डॉक्टरांचे, मनपाचे प्रतिनिधी या सोबत नागरिकांचे प्रतिनिधीही हजर हवेत. कारण ज्यांच्या आयुष्याबद्दल, आरोग्याबद्दल तज्ज्ञ डॉक्टर ठरवत असतात व ज्यांच्याकडून कर गोळा करून डॉक्टरांची बिले भागवली जाणार त्यांच्या प्रतिनिधींना निदान काय चर्चा होते हे तरी कळायला हवे! असा सरकारी व विमा योजनांचा अनुभव आहे की, या योजनेअंतर्गत रुग्ण आला की हॉस्पिटल बिले फुगवतात. असे गैरप्रकार टाळण्यासाठी पारदर्शकता व देखरेख हवी. थोडक्यात सरकारी दवाखाने, रुग्णालये यात वाढ व सुधारणा करणे, खासगी आरोग्य सेवेचा दर्जा व त्यासाठीचे शुल्क याचे प्रमाणीकरण करणे व अशा प्रमाणित खासगी सेवेची बिले सरकारने भरण्याची व्यवस्था निर्माण करणे या त्रिसूत्री भोवती सर्वासाठी आरोग्य सेवा हे ध्येय गाठता येईल.सध्या सरकारचा आरोग्यावरील खर्च राष्ट्रीय उत्पादनाच्या एक टक्का आहे. वरील प्रकारे आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी तो तीन टक्के करावा लागेल. (जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस पाच टक्क्यांची आहे.) भारतातआहे रेवर्गावर कराचा बोजा विकसित देशांच्या मानाने फार कमी आहे. विकसित देशांत कराचे राष्ट्रीय उत्पादनाशी प्रमाण 25 टक्के आहे, भारतात ते फक्त 14 टक्केच आहे. 2005मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने किमान सामाईक कार्यक्रमामध्ये म्हटले होते की, आरोग्यावरचा सार्वजनिक खर्च राष्ट्रीय उत्पादनाच्या दोन ते तीन टक्के केला जाईल, पण त्यासाठी आहे रेवर्गावर जादा कर बसण्याऐवजी मनमोहनसिंग सरकारही त्यांना सवलती देत आहे. 2009-10च्या बजेटमध्ये उद्योगांना 80 हजार कोटीच्या तर 2010-11च्या अंदाजपत्रकात पगारदारांना 26000 कोटीच्या कर सवलती देण्यात आल्या!  हे धोरण बदलण्यासाठी सामाजिक, राजकीय दबाव निर्माण झाला तर मात्र सर्वासाठी आरोग्य सेवाहे ध्येय प्रत्यक्षात येऊ शकेल.(लेखकजनस्वास्थ्य अभियानचे सह-समन्वयक आहेत.)

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0