पहिले पान | कोलाज | सोशल नेटवर्किंगचं समाजकारण!

सोशल नेटवर्किंगचं समाजकारण!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

कोणत्याही संघटनेचं बॅनर नाही, कोणती पत्रकार परिषद नाही, असं असतानाही अभिलाष कृष्णन, रचना ब्रार आणि जयदेव रुपानी या तिघांनी टॅक्सी व रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात सोशल नेटवर्किंग साईट्सवर वाजवलेला बिगुल लोकांपर्यंत पोहोचला, हे या माध्यमाचं मोठंच यश आहे. यानिमित्ताने आंदोलनाच्या नेटवर्किंगसाठी एक नवंच माध्यम उपलब्ध झालंय.

समाजात काळानुरूप, बदलत्या तंत्रज्ञानानुसार सातत्यानं बदल होत असतात. आंदोलनांच्या हत्यारांमध्येही असेच बदल पाहायला मिळतात. गांधीजींचं उपोषण ते आधुनिक गांधीगिरी पर्यंतचा प्रवास आपण पाहतोय. आंदोलन पुकारलंय तर ते लोकांना सांगायचं कसं याच्याही माध्यमांमध्ये किती झपाटय़ानं बदल झाले, हे परवाच्या मीटर जॅम आंदोलनानं दाखवून दिलं. लोकांनी लोकांसाठी केलेलं ते उत्स्फूर्त आंदोलन होतं आणि त्याचा शंख फुंकला होता फक्त इंटरनेटवरून! सोशल नेटवर्किंग साईटचा समाजकारणी चेहराच यानिमित्तानं पाहायला मिळाला. भविष्यातल्या लोकशाही मार्गाच्या आधुनिक निषेधांची ही नांदी आहे.

टॅक्सी-रिक्षा चालकांच्या मुजोर वागणुकीचा निषेध करण्यासाठी अभिलाष कृष्णन, रचना ब्रार आणि जयदेव रुपानी हे तीन तरुण एकत्र आले आणि त्यांनी किमान एक दिवस का होईना, पण या मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांना धडा शिकवूया असं आवाहन त्यांच्यासारख्याच तरुणांना, कॉपरेरेट क्षेत्रातल्या लोकांना आणि अन्य सर्वच सामान्यजनांना केलं. ही साद घालण्यासाठी त्यांनी ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर केला. मीटर जॅम नावाचं स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केलं. १२ ऑगस्ट हा दिवस या आंदोलनासाठी निवडण्यात आला. या दिवशी कोणीही प्रवासासाठी रिक्षा वा टॅक्सीचा वापर करू नका. त्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करा, तुमच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहन असेल तर इतरांना लिफ्ट द्या. अशाप्रकारे जवळचे भाडे नाकारणाऱ्या, प्रवाशांशी उद्धट वागणाऱ्या, मीटर वाढवून फसवणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर किमान एक दिवस का होईना पण बहिष्कार घाला, असे आवाहन या तरुणांनी सर्वाना केले. मुंबईत जे नेटकरी होते, त्यांच्यापर्यंत हे आंदोलन पोहोचलं, वृत्तपत्रांनीही ते उचलून धरलं आणि काही प्रमाणात का होईना त्याला प्रतिसाद मिळाला. मुंबईसाठी केलेलं या आंदोलनचं लोण या नेटवर्किंग साईटस्मुळे पार चेन्नईपर्यंत पोहोचलं.

तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या साधनांचाच वापर करा हे, या आंदोलनानं दाखवून दिलं. मागील लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्येही काही तरुणांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनच तरुणाईला मतदानाचं महत्त्व पटवून देणं, मतदान करण्यास प्रवृत्त करणं, आपला लोकप्रतिनिधी निवडण्यात सजगता दाखवणं आदी गोष्टी केल्या होत्या.

यापूर्वी या साइट्स तरुण वगळता अन्य वर्गामध्ये तशा बदनामच होत्या. चॅटिंगच्या मिषाने अनेक तरुणींच्या फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या होत्या. तरुणांना फक्त एकमेकांशी गप्पा मारून टाइमपास करण्यासाठी या साइट हव्या असतात, असं आजही अनेकांना वाटतं. अर्थात त्याला थोडीफार तरुणाईही जबाबदार आहे. अनेक मुलं-मुली खरोखरच कुचाळक्या करण्यासाठी, युटय़ूब व अन्य साइट्सवरचे व्हिडिओ एकमेकांशी शेअर करण्यासाठी केवळ या साइट्सचा वापर करतात. सेलिब्रिटींना प्रतिस्पध्र्याची चारचौघात निंदानालस्ती करण्यासाठी हे एक नवं खेळणं मिळालं हेातं. अर्थात सेलिब्रिटींमध्येही काही अपवाद आहेतच. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर खातं उघडल्या उघडल्या काही दिवसातच कॅन्सरपिडितांसाठी मदतीचं आवाहन करत सोशल नेटवर्किंगचा चांगला उपयोग होऊ शकतो, हे दाखवून चांगला पायंडा पाडला होता. म्हणूनच वर उल्लेख केलेल्या तीन तरुणांनी सामाजिक भान राखत, चांगलं काही ते शेअर करण्यासाठी केलेला या नेटवर्किंग साइटस्चा वापर वेगळा ठरला आणि हे तरुण लोकांच्या कौतुकास पात्र ठरले. कोणत्याही संघटनेचं बॅनर नाही, कोणती पत्रकार परिषद नाही असं असतानाही या तिघांनी या नेटवर्किंग साइट्सवर वाजवलेला बिगुल लोकांपर्यंत पोहोचला, हे या माध्यमाचं मोठं यश आहे. भविष्यात अनेक मोठी आंदोलनं या नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून होऊ शकतात. एकाच वेळी लाखोंपर्यंत-  विशेषत: युवावर्गापर्यंत- सहज पोहोचणं या साइट्स मुळे शक्य होतंय आणि हे पोहोचणं चांगल्या कामासाठी सत्कारणी लावता येऊ शकतं, हेच या तरुणांनी दाखवून दिलंय

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0