वाचलेला कवी
‘पुस्तकांच्या संग्रहाविषयी’ या कवितेच्या पोस्टरमुळे सतीश काळसेकर अनेकांना माहीत असतील. कवी असणं आणि भरपूर वाचनातून परंपरांबद्दलची निरीक्षणं न्याहाळत पुढे जाणं यात काळसेकर फरक करत नाहीत. परंपरांचं वाचन वर्तमानाशी भिडण्यासाठीच करायचं, या विश्वासातून काळसेकरांनी चळवळ आणि साहित्य यांतही कधी फरक केलेला नाही. मग ती कामगार चळवळ असो, लघुअनियतकालिकांची असो की वाचनचळवळ..
‘मी 1963 च्या सुमारास काळसेकरांच्या डोंबिवलीच्या जागेत गेलो होतो. त्यांच्या संसाराला नुकतीच सुरुवात होत होती. घरात फर्निचर अगदीच बेताचे होते. मुख्यत: जिथे जागा मिळेल तिथे पुस्तके होती. सुमारे पंचेचाळीस वर्षानी मी त्यांच्या पेणच्या जागेत गेलो होतो. डोंबिवलीत असलेल्या लहानशा ग्रंथसंग्रहाचा विशाल ग्रंथवृक्ष झाला आहे. त्याला एका खोलीत डेरेदार बुंधा आहे आणि त्याच्या पारंब्या बाकीच्या सर्व खोल्यांत पसरल्या आहेत. त्याच्या फांद्यांवर आंबेडकरांपासून वेदांपर्यंत, मार्क्सपासून निट्शेपर्यंत आणि तुकारामापासून अरुण कोलटकरांपर्यंतची मांदियाळी आहे. या वृक्षाच्या सावलीत आज काळसेकर पती-पत्नी राहात आहेत..’‘वाचणा-याची रोजनिशी’ या सतीश काळसेकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत प्रसिद्ध दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी सतीश काळसेकरांच्या वाचनवेडाचं असं नेमकं वर्णन केलंय. घरात तर पुस्तकं असतातच त्यांच्या सोबतीला; पण पेणहून मुंबईला लोकवाङ्मयच्या कार्यालयात जायचं असो वा अगदी थेट हिमालयात ट्रेकिंगला; त्यांच्या हाताशी एक पुस्तकांचं गाठोडं असतंच, मिळेल तिथे, वेळात वेळ काढून वाचायला. हे गाठोडंही हलकं नसतंच कधी. किंबहुना कपडय़ांपेक्षा पुस्तकांच्या गाठोडय़ाचंच वजन अधिक असतं अनेकदा. अगदी गाठोडय़ात दगड भरलेत असं वाटावं इतपत. म्हणूनच काळसेकरांची बायको या पुस्तकांना आवडीने आणि हक्कानेही दगडच म्हणते. तर असे हे दगड डोक्यात घालून घ्यायला.. म्हणजेच वाचायला काळसेकर कायम तत्पर असतात. ते त्यांच्यासाठी नुस्तं वाचन नसतं. वाचण्याची ही क्रिया त्यांच्यासाठी असते एक अनुभव.. आपल्या कवितेच्या सर्जनाइतकाच थोर!
म्हणूनच काळसेकर म्हणतात- ‘जेवढं वाचता येईल तेवढं माणसाने वाचलं पाहिजे. वाचन हे निव्वळ ‘वाचन’ कधीच नसतं. ते वाचणाऱ्याला उत्तरोत्तर समृद्ध करत नेतं. ज्ञानाने- अनुभवाने. एकदाच मिळालेल्या आयुष्यात आपण स्वत: जे करू शकत नाही, अनभवू शकत नाही; ते-ते सारं करता येतं-अनुभवता येतं फक्त वाचनाने. वाचन शहाणं-सुरतं करून सोडतं माणसाला. दोस्तोव्हस्कीची ‘क्राइम अॅण्ड पनिशमेन्ट’ वाचली की, आपलं आपल्या बायकोशी असलेलं वर्तन पूर्वीचं राहूच शकत नाही. मी मला स्वत:ला तपासत असतो. कवी म्हणून, माणूस म्हणून आणि मला वाटतं, वाचन हे स्वत:ला तपासण्याचं एक उत्तम माध्यम आहे. केवळ स्वत:लाच नाही, तर कुणाची प्लेसमेन्ट कुठे करावी (अर्थात माझ्या दृष्टिकोनातून) हे कळण्यासाठी वाचन आवश्यक आहे.’
वाचन करताना काळसेकर कुठलाच भेदाभेद, विधिनिषेध मानत नाहीत. समोर जे येईल ते सारं वाचत जातात. कधी कधी ज्याला फक्त ‘लोकप्रिय’ असं लेबल लावावं असंही. पण ‘लोकप्रिय’म्हणून त्या साहित्याचा काळसेकर अव्हेर करत नाहीत. कारण त्यांच्या लोकप्रियतेच्या कसोटय़ा वेगळ्या आहेत. लोकप्रिय ते सगळंच वाईट असं ते मानत नाहीत. ते सांगतात, ‘लोकप्रियता वाईट कशी असणार? आमच्या कविकुलाचा आद्य कवी तुकाराम लोकप्रिय आहेच ना! माणूस लोकप्रिय असण्यात काय वाईट आहे? पण तुम्ही लोकप्रिय काय करता, हे महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही लोकांचा अनुनय करता की तुम्ही लिहिता आणि मग ते लोकांना आवडतं.. तुकाराम कुणाचा अनुनय करण्यासाठी लिहीत नव्हता. पण तुकारामाच्या अनुभवातलं जे आकलन आहे, ते आकलन इथल्या मोठय़ा जनसमूहाला आपलं वाटतं. त्यामुळे तुकाराम लोकप्रिय. म्हणजे तुकारामाची लोकप्रियता आणि आजच्या एखाद्या लेखकाची लोकप्रियता यात गुणात्मक फरक आहे.’
लिहिणाऱ्याला, मग तो कवी असो, कथाकार असो, कादंबरीकार असो किंवा आणखी काही लिहिणारा, त्याला आपल्या भाषेच्या परंपरेचं, समकालीन वास्तवाचं, संस्कृतीचं पुरेपूर ज्ञान असावं असं मात्र काळसेकरांचं ठाम म्हणणं आहे. कारण हे सारं ठाऊक नसेल, तर आपण काय लिहितोय आणि का लिहितोय याचं भानच लिहिणाऱ्याला येणार नाही, असं ते सांगतात. एवढंच नाही, तर आपल्या पिढीला ते भान होतं, असंही आवर्जून सांगतात. याची सविस्तर मांडणी ते अशी करतात- ‘तुम्ही ज्या भाषेत लिहिता त्या भाषेची स्वत:ची एक जन्मापासूनची परंपरा असते. त्या परंपरेचं तुम्हाला भान हवं. म्हणजे परंपरा आत मुरवून काळाप्रमाणे काय बदल करावे, ते लिहिणाऱ्याला कळतं. म्हणजे असं की, मी एक भूमिका गेली काही र्वष सातत्याने मांडतोय. ती म्हणजे मराठी कवितेचा सगळ्यात चांगला काळ हा नामदेव-ज्ञानेश्वर-महानुभाव साहित्यापासून सुरू होतो. तेव्हापासून ते साधारपणे 16-17 व्या शतकापर्यंत मराठी साहित्याची भरभराट झालेली दिसते. त्या भरभराटीचं मुख्य कारण म्हणजे तुमचा साक्षात् अनुभव आणि तुम्ही लिहिलेली कविता-साहित्य एकजीव झालेलं आहे. सावतामाळी आपल्या कष्टांना साक्षात् करत होता. गोरा कुंभार-चोखामेळा प्रत्येक जण आपल्या घामाची अभिव्यक्ती आपल्या साहित्यात करत होता. त्यामुळे त्यांच्या कवितेला एकदम थेट कष्टाचा, मातीचा वास होता आणि कवितेच्या उगमाचे जे स्त्रोत सांगितले जातात, त्यातला एक थेट श्रमाशीच संबंधित आहे. म्हणजे जात्यावर म्हटली जाणारी ओवी, रहाट हाकताना गायलं जाणारं गाणं किंवा कुठलंही श्रमाचं काम करताना म्हटली जाणारी गाणी या साऱ्याची निर्मिती कष्टातूंन झालेली आहे. प्रत्यक्ष श्रम आणि साहित्याची निर्मिती यांचा अगदी आदिम काळापासून चालत आलेला संबंध आहे. श्रमाचा साहित्याशी असलेला संबंध थेट तुकाराम, त्याची शिष्या संत बहिणाबाई यांच्यापर्यंत चालत आलेला दिसतो. मात्र जिथपासून काव्याच्या व्याकरणाचा दाब कवींवर वाढायला लागला, तेव्हापासून साहित्यातील ऱ्हासकाळाला सुरुवात झाली. 19-20व्या शतकापर्यंत हा दाब कायम होता. त्यानंतर मुख्यत: सगळा भर पंडिती साहित्यावर राहिला. अर्थात यात काही अपवाद होते. उदाहरणार्थ शरच्चंद्र मुक्तिबोध, बा.सी. मर्ढेकर, मनमोहन, र. वा. दिघे वगैरे. पण लिहिण्याच्या शक्यता असलेले कष्टकरी वर्ग होते, ते लिहिण्यापासून दूर गेले. किंवा त्यांनी काय लिहिलं असेल, तर ते आपल्यापर्यंत पोचलंच नाही. हे म्हणजे अंधारयुगच होतं आणि हे सारं तुकारामसारख्या कवीच्या पार्श्वभूमीवर घडलं ही मराठी वाङ्मयाची शोकांतिका आहे. मर्ढेकरांनी-मनमोहन-मुक्तिबोध-अनिलांनी याच्या विरोधात काही प्रयत्न केले. पण जाणीवपूर्वक काही करणं, ही भावना त्यामागे नव्हती. प्रस्थापितांना नाकारतोय, अशी भूमिका नव्हती. ते नकळत करत होते. याला पहिला छेद दिला तो नारायण सुर्वे यांनी. साहित्याच्या केंद्रस्थानी असलेल्या लोकांना पहिलं सामाजिक भान सुर्वेनी आणलं. कविता ही अशीही असू शकते हे त्यांनीच पहिल्यांदा दाखवून दिलं. तोच काळ 1962चा- लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या प्रारंभाचा आहे. मी वा माझ्या समकालिनांनी केलेले मराठी साहित्याचे हे टप्पे अनेकांना मान्य होणारे नाहीत. पण मला तशी मांडणी करावीशी वाटली; कारण मला भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचं भान आहे.’’
ज्यांना-ज्यांना हे भान होतं, त्या सा-यांनीच 1960च्या दशकात प्रस्थापितांच्या पांढरपेशी, श्रमाशी संबंध नसलेल्या साहित्याच्या विरोधात बंडाचं निशाण रोवलं. लघुअनियतकालिकांची चळवळ सुरू केली. अर्थात तिथेही प्रत्येकाच्याच भूमिका स्पष्ट नव्हत्या. काळसेकर सांगतात, ‘ज्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती, ते सगळे एकसारखे नव्हते. काहींना साहित्यिकांचा चळवळीशी असलेला संबंध मान्य नव्हता. त्यांची ही भूमिका एकप्रकारे प्रस्थापितांच्या भूमिकेशी मिळतीजुळती होती, असं मला आता इतक्या वर्षानी वाटतंय. त्यांची भूमिका जवळपास मर्ढेकरसदृश होती. म्हणजे बंड होतं, पण ते चळवळीसारखं नव्हतं.’
चळवळीची भूमिका मान्य असो वा नसो किंवा कितीही मतभेद असोत, पण तेव्हाच्या पिढीत एक भ्रातृभाव कायम होता; जो आताच्या पिढीत नाही, असं एक निरीक्षणही काळसेकर आवर्जून नोंदवतात. ‘आमच्यासमोर जी प्रस्थापित व्यवस्था होती, जिच्याशी आमचं जुळत नव्हतं, तिच्या विरोधातच आम्ही सारे होतो. पण त्यांच्याशी लढण्याचे मार्ग काय असावे, सवतासुभा असावा की नसावा, अशा बारीकसारीक गोष्टींवरून आमच्यात मतभेद होते आणि तरीही ‘चक्रवर्ती’ अनियतकालिकात सारे एकत्र आलेच होते. ते फक्त तेरा दिवस चाललं. तेव्हा आम्ही सर्व एकत्रच होतो. हा जो भ्रातृभाव आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. नव्वदोत्तर काळात हा भ्रातृभाव उभा राहिलेला दिसत नाही. आमच्या काळात जी सहिष्णुता होती, आम्ही जे एका समानसूत्राने जोडलेले होतो, ते अलीकडच्या काळात दिसत नाही. आम्ही शारीरिक ओरबाडेही काढत होतो. ‘चक्रवर्ती’मध्ये तर एक सदरच होतं- ‘येथे थोबाड रंगवून मिळेल’ म्हणून. पण असं सारं असूनही आमचं एकमेकांवर असलेलं प्रेम कायम होतं. आजतागायत आहे. तरुण वय असल्यामुळे चुका तेव्हा झाल्याही असतील. पण त्या सर्व मर्यादांनिशीसुद्धा आम्ही एक सिच्युएशन निर्माण केली. आणि आता मराठीचा इतिहास लिहिणाऱ्या कुणाही माणसाला हे मान्य करावंच लागतं की, अनेक मोठे साहित्यिक लघुअनियतकालिक आणि दलित चळवळीच्या मुशीतूनच निर्माण झालेले आहेत.’
लघुअयितकालिकांची चळवळ ही मराठी साहित्यासाठी इष्टापत्तीच ठरली. भाषेपासून शैलीपर्यंत आणि अनुभवापासून साहित्याच्या रुपबंधापर्यंत लेखनाचे-अभिव्यक्तीचे सारे संदर्भच या चळवळीमुळे बदलले गेले. लिहिणं हे जगण्याला समांतर असलं पाहिजे, याची जाण या चळवळीमुळे लिहित्या वर्गाला आली. महत्त्वाचं म्हणजे या चळवळीने पुन्हा एकदा साहित्याला मूळ परंपरेशी. धारेशी जोडण्याचं काम केलं. ते कसं झालं, ते सांगताना काळसेकर म्हणतात,‘माझी, राजा ढालेची तेव्हाची भूमिकाच अशी होती की, जगण्यामधलं आणि लिहिण्यामधलं अंतर नष्ट करत न्यायचं. किंबहुना ते समूळ नष्ट करू शकलो, तर ती फार चांगली गोष्ट, जी तुकारामामध्ये होती. त्यामुळे आम्ही अनेक गोष्टी संत पंरपरेकडून स्वीकारल्या. अनियतकालिकांतून जो वाङ्मयीन काळ उभा राहिला, त्याचं मूळ संतमेळ्यातच होतं. आमच्या लिहिण्याच्या पद्धती, शब्द वापरण्याच्या पद्धती, विरामचिन्हांचा तिरस्कार, पूर्णविरामाऐवजी दंड देणं.. अशा ज्या गोष्टी आम्ही करत होतो, त्यातून आम्ही स्वत:ला जुन्या काळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत होतो. साहित्याचे टप्पे पाहिले, तर पहिला टप्पा नामदेव-ज्ञानदेव असा आहे, तो तुकाराम-बहिणाईपर्यंत संपतो. दुसरा कालखंड शाहिरी वाङ्मयापासून सुरू होतो, तो 1940 पर्यंत येतो. नंतर मुक्तिबोध, मर्ढेकर येतात. मग 1960च्या दशकात लघुअनियतकालिकाची चळवळ सुरू झालेली दिसते. दलित साहित्याचा आवाज निर्माण झालेला दिसतो. म्हणजे पुन्हा एकदा जुन्याला उच्चार मिळालेला दिसतो. 1960आधीची आणि नंरची कविता बदललेली दिसलीच सगळ्यांना. साहित्यातली नावंही बदललेली दिसतात. म्हणजे पूर्वीचा वारक-यांचा जो सर्व जातीधर्माच्या लोकांना सामावून घेणारा मेळा होता, तसाच आमचा मेळा होता.’’
लघुअनियतकालिकाची चळवळ ज्या जोमाने फोफावली, तेवढीच लवकर थंडही झाली. प्रस्थापितांच्या विरोधात बंड करण्यासाठी केवळ कविता करणं अपुरंही वाटलं असेल कदाचित या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना. परिणामी प्रत्येकाने वेगवेगळे मार्ग शोधले. तुळशी परब शहाद्याला गेले. नामदेव ढसाळवगैरे मंडळींनी दलित पँथर काढली. तर खुद्द सतीश काळसेकरांनी ट्रेड युनियन जॉइन केली. प्रत्येकाने आपापला मार्ग निवडल्यामुळे क्वचित कधी त्यांच्यावर प्रस्थापित झाल्याचे आरोपही झाले. पण काव्यगत न्याय म्हणजे आता गेल्या दशकभरात पुन्हा एकदा नियतकालिकांची चळवळ मराठीत रुजू पाहतेय. हा बदल आश्वासक असला, तरी काळसेकर समाधानी नाहीत. ते म्हणतात, ‘दिलीप चित्रेचं म्हणणं होतं की, प्रत्येक पिढीला आपला शिवाजी आपणच शोधावा लागतो. या न्यायाने आम्ही आमची स्पेस निर्माण केली. नंतरच्या लोकांनी स्वत:ची स्पेस स्वत: निर्माण करायला हवी होती. आमच्याही काही मर्यादा होत्या. आमच्यातले काही प्रस्थापितही झाले. पण मग आताच्या नव्या पिढीने आमच्याविरुद्ध बंड करून नवीन शक्यता निर्माण करायला हव्या होत्या. पण तसं झालं नाही. आम्ही लय बदलली, शब्द बदलले, विषय बदलले. खूप गोष्टी केल्या. मराठीचा आदर असूनही आम्ही वैश्विक झालो. ते नव्वोदोत्तर पिढीला जमलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापित झाल्यावरही आमच्यातल्या अनेकांनी स्वत:च्या लेखनाचं कौमार्य टिकवून ठेवलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेमाडे. तसंच, आता साहित्यविषयक खूप नियतकालिकं प्रसिद्ध होत आहेत. पण ती नियतकालिकंच आहेत. अनियतकालिक नाहीत. इथे वृत्तीचाच फरक आहे. ‘असो’, ‘वाचा’ किंवा कुठल्याही अनियतकालिकाला काळाचं बंधन नव्हतं. ते कधीही निघायचं. एखादा अंक तर पहिलाच शेवटचा ठरायचा. अन्य नियतकालिकांत जे चाललंय, ते आम्हाला अमान्य आहे, म्हणून हे वेगळं काढतोय. तसंच आम्हाला आमच्या मनासारखा मजकूर मिळाला, तरच पुढचा अंक काढू, अन्यथा काढणार नाही, अशी स्वत:शी पक्की गाठ आम्ही बांधून घेतली होती. आम्ही आमच्या अटीवर जगू आणि आमच्या अटीवरच अंक काढू अशी तेव्हा आमची जिद्द होती. ती आता नाही.’’
काळसेकर हे विधान करतात, ते साहित्याचं वाचन गांभीर्यानं केल्यानंतरच. त्यांच्याइतकं सद्यस्थितीत क्वचितच कुणी वाचत असेल. त्यांचं हे वाचन म्हणजे लेखनपरंपरेचंच वाचन असतं. महत्त्वाचं म्हणजे या परंपरेत बुडी मारून ते कोरडेपणाने बाहेर येत नाहीत. त्यात चांगले माखूनच बाहेर येतात. त्यामुळेच ते जेव्हा एखादं निरीक्षण नोंदवतात, तेव्हा ते महत्त्वाचं ठरतं.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा