दिल्लीचा गेम
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा यदाकदाचित यशस्वी झालीच, तर तो एक चमत्कार ठरेल! पण ऐतिहासिक दिल्लीनं असे अनेक ‘गेम’ सोसलेत..
‘कामनवेल्थ के नामपर शीला दीक्षितने दिल्लीका कबाडा कर दिया है साहब..’हे थेट दोषारोपपत्र ठेवणारं विश्लेषण आहे एका रिक्षावाल्याचं. कुतुबमिनारहून प्रगती मैदानच्या दिशेनं येताना, रस्त्यावरले खड्डेखुड्डे चुकवत, रस्त्याकडेच्या राबिटांच्या ढिगा-यांकडे बोट दाखवत हा रिक्षावाला गेल्याच आठवडय़ात या एक्स्पर्ट कॉमेंट्स करत होता. पेट्रोल-डिझेल दिल्लीतच तुलनेनं स्वस्त असलं, तरी दिल्ली मेट्रोचा विस्तार वाढू लागल्यावरच इथल्या ‘ब्लू लाइन’ बसगाडय़ांनी भाडेवाढ केली आणि पाठोपाठ रिक्षाभाडय़ांतही जबर वाढ झाली. या सर्वाचं खापर ‘कामनवेल्थ गेम्स’वर फोडण्याची कला आता अनेक दिल्लीकरांना जमते आहे. हा रिक्षावालादेखील अशा कलावंतांपैकी एक!
पण रिक्षावाल्याच्या म्हणण्याला कितीतरी निरनिराळे अर्थही होते. एक मोठं शहर आमूलाग्र बदलण्यासाठी ‘2010च्या ऑक्टोबरात होणा-या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धाच्या आधी कायापालट हवाच’ असं उद्दिष्ट सात वर्षापूर्वी ठरवलं जातं, पण त्यादृष्टीनं कामं सुरू व्हायला मात्र दोनतीन वर्षाचा उशीर होतो. हॉटेलं जास्त हवीत, म्हणून दिल्ली राजधानी क्षेत्रातल्या (म्हणजे गुडगाँव- नोएडासकट) सर्व ठिकाणच्या हॉटेलांना तीन वर्षापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात करमाफी दिली जाते; पण एरवी हे महानगर राष्ट्रकुलातल्या सर्व देशांतल्या क्रीडाप्रेमींचं यजमानपद स्वीकारणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहे, हे अजिबात स्पष्ट नसतं. असल्या गहाळपणामुळेच अगदी अखेरच्या दोन महिन्यांत, पर्यटकांवरच निर्बंध लादण्याची भाषा सुरू होते. काय तर म्हणे तंग आणि आखूड कपडे घालू नका, सार्वजनिक ठिकाणी चुंबन-आलिंगनादि भिन्नलिंगी जवळिकीचे प्रकार करू नका.. आणि किमान 41 हजार 589 कोटी रुपये या ‘गेम्स’च्या नावावर विविध यंत्रणांचा खर्च होऊनदेखील, ‘लष्करी जवानांना देण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. पण सुरक्षा महत्त्वाची असल्यानं लष्करानं काम तर केलं पाहिजे,’ असा खाकाबगला वर करण्याचा पवित्रा सर्व संबंधित यंत्रणा घेतात!
‘आम्ही घेतलेल्या मेहनतीची फळे दिसू लागलेली आहेत’ असं सांगणारी मुलाखत या गेम्सच्या आयोजन समितीचे (आता पंख छाटले गेलेले) प्रमुख सुरेश कलमाडी यांनी 23 जुलै रोजी दिली होती. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धाच्या वेबसाइटवर ‘चेअरमन्स ब्लॉग’ अशी एक लिंक आहे. त्या ब्लॉगवरली ही मुलाखत म्हणजे शेवटची ‘एंट्री’. त्यानंतर कलमाडी या वेबसाइटवरून फरारच झालेले दिसतात. मुळात ‘कलमाडींचा भ्रष्टाचार’ याविषयीच्या बातम्या गेल्या महिन्यात येऊ लागल्या, तेव्हा कुठे देशाच्या लक्षात आलं की दिल्लीतली ही प्रतिष्ठेची क्रीडास्पर्धा इतकी जवळ आली आहे. या खेळांचं आयोजन आता इथून पुढे तरी सभ्यपणे व्हावं, यासाठी मग पंतप्रधानांनी आणि सत्ताधारी आघाडीच्या अध्यक्षांनी लक्ष घातलं. कदाचित यानंतर भ्रष्टाचार थांबेल. किंवा असं मानून चला की कलमाडी फार धुतल्या तांदळासारखेच असतील.. तरीही राष्ट्रकुल क्रीडास्पर्धासारख्या आता ज्याची प्रतिष्ठा कळत्येय अशा विषयाबद्दल देश झोपलाच कसा होता, हा प्रश्न उरणारच.
दिल्ली हे आंतरराष्ट्रीय शहरच आहे, हा काही उच्चभ्रू दिल्लीकरांचा (अनेकदा, मुंबईकरांना ऐकून दुस-या कानानं सोडून द्यावा लागणारा) दावा राष्ट्रकुल स्पर्धामध्ये धसाला लागणार आहे. मुंबई असे दावे करण्याच्या फंदातच पडत नाही आणि क्रीडास्पर्धाच काय, मैदानांसाठीसुद्धा मुंबईत जागा तर नाहीच! देशाची शान ठरू शकणा-या गोष्टी आपणच करायच्या, हे दिल्लीचं वर्षानुवर्षापासूनचं ब्रीद राष्ट्रकुल क्रीडास्पर्धाच्या निमित्तानं पुन्हा दिसतंय. पण सर्व केंद्रीय अकादम्या, महत्त्वाच्या संशोधनसंस्था आपल्याचकडे ठेवण्याइतकं हे क्रीडास्पर्धाचं आयोजन सोपं आहे का? विशेषत: बदललेल्या काळात आणि ‘ग्लोबल आउटलुक’च्या जमान्यात ते आणखीच कठीण आहे. देशाची शान खरोखरच अशा क्रीडास्पर्धानी वाढते, यावरदेखील आता कुणाचा विश्वास राहिलेला नाही. नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाच्या वेळी (1982) देशात ‘अप्पू’ची हवा होती, तशी आज ‘शेरा’ची आहे का? हा शेरा गेले नऊ महिने जिची वाट पाहातोय, ती लोकप्रियता त्याला अजिबात मिळालेली नाही. क्रीडास्पर्धा असतात, त्यांची बोधचिन्हं असतात, हे सगळंच 1982 मधल्या भारतवासींना फार नवं होतं. शिवाय रंगीत टीव्ही येणार तो ‘एशियाड’च्या वेळी, या आकर्षणालाही देशवासी भुलले होते. त्या टीव्हीवर आता सत्राशेसाठ मॅस्कॉट एरवीच जाहिरातींतून कडमडतात आणि टीव्हीमुळे घरबशेपणा आणि प्रत्येक गोष्ट नुस्ती ‘पाहण्या’चा निस्संगपणा या प्रवृत्ती बळावणारच, हे मीडिया थिअरिस्टांचं भाष्य खरोखर जगणारी पिढीही आता कमावती झाली आहे.
या पिढीच्या वास्तवाला शरण न गेलेले, राजकीय-सामाजिक जाणिवा जिवंत ठेवू पाहणारे काही जण आहेत, पण तेही ‘लोकांचा पैसा वाया घालवणारे हे गेम हवेच कशाला?’ अशा आक्रस्ताळी भूमिकेपर्यंत आपण यावं की नाही, या विचारात आहेत. देशाचं आंतरराष्ट्रीय स्थान या स्पर्धाच्या यशस्वी आयोजनानंतर उंचावलं असतं, हे या लोकांना समजलंय; पण प्रतिष्ठा कमावण्याच्या- हासिल करण्याच्या खेळातही भारत शेवटून दुसरातिसराच ठरणार, अशा शंकेनं आता त्यांना घेरलं आहे.‘हो. आत्तासुद्धा बरंच काम बाकी आहे. पण चालायचंच.. कारण दिल्लीत तयारीच फार करावी लागणार होती,’ असं चुचकारणारं वक्तव्य राष्ट्रकुल क्रीडा प्रतिष्ठानाचे (सीडब्ल्युएफ) अध्यक्ष मायकल फेनेल यांनी दिल्लीत दोन दिवसांच्या पाहणीनंतर केलं आहे. पण ‘सर्व कामे वेळेत होतील अशी आशा’ वगैरे सुसंस्कृत दमबाजी फेनेल यांनीही केलीच आहे.कलमाडींची राष्ट्रकुल-कुलंगडी मीडियानं बाहेर काढल्यापासून या गेम्ससाठी प्रत्यक्ष साइटवर कामं करणारे उप-उप-कंत्राटदारही खासगीत धास्तीच व्यक्त करू लागले आहेत, ‘इतना करेंगे हम, काहेके लिए करेंगे. बिलकेही लिए ना. जिनको खाना था खा लिए’ वगैरे रडगाणी (अर्थातच मीडियाला टाळून) गाऊ लागले आहेत. अशा स्थितीत दिल्लीत होणा-या क्रीडास्पर्धा जर यदाकदाचित यशस्वी झाल्याच, तर तो एक चमत्कार ठरेल!
अशा चमत्काराची वाट सध्या ढिगारे आणि खड्डय़ांमधून जाते आहे. आजपासून बरोब्बर 42 दिवसांनी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा सुरू होतील, तर त्यासाठी देशोदेशींच्या खेळाडूंचं आगमन 25 दिवसांतच होऊ लागेल. या ‘इंटरनॅशनल इव्हेंट’वर आता बारकाईनं लक्ष ठेवणारं सचिवमंडळ, स्पर्धाबद्दल उत्साहानं विचारच करू न शकणारे देशवासी आणि या स्पर्धाच्या घाईमुळे गांजूनच दिल्लीवासी, या सर्वाची साथ स्पर्धेच्या ‘यशा’साठी आवश्यक आहे.
पण असे कितीही गेम आले नि गेले, कितीही परीक्षा पाहिल्या गेल्या, तरी दिल्ली आपला स्वभाव सोडेल का, हाही प्रश्न आहेच. ‘यहाँ तो करप्शन ही मेन इन्कम सोर्स है’ अशा गप्पा ज्या चहाच्या टपरीवर दिल्लीत तुम्ही ऐकाल, तिच्या मागचाच एखादा बंगला ‘मेन इन्कम सोर्स’ची साक्ष दिमाखानं देत असेल. ती तारीख 2010 च्या ऑगस्टमधली असो की नोव्हेंबरातली- स्पर्धा संपून गेल्यानंतरची! अपमानांचे आणि पराभवांचे असले अनेक ‘गेम’ या ऐतिहासिक दिल्लीनं पचवलेले आहेत.


प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा