डासांच्या सहवासातलं संशोधन
एक काळ होता, जेव्हा मलेरियाच्या साथीसाठी वाईट हवामानाला जबाबदार धरलं जात होतं. त्या काळात एक डॉक्टर मलेरियाचे वाहक म्हणून डासांना जबाबदार धरत होता. त्यासाठी त्याने अनेक डासांचा पिच्छा पुरवला, त्यांचं विच्छेदन केलं आणि आपलं म्हणणं सिद्ध केलं. तेव्हापासून म्हणजे 1898 पासून 20 ऑगस्ट हा दिवस ‘वर्ल्ड मॉस्क्युटो डे’ म्हणून पाळला जातो. नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड मॉस्क्युटो डे’च्या निमित्ताने, डासांच्या मागे भटकून डॉ. रोनाल्ड रॉस यांनी केलेल्या संशोधनाची आणि त्यांच्या चिकाटीची ही गोष्ट..
दरवर्षी पावसाळ्यात काही काळ मुंबई आणि उपनगरांना भेट देऊन जाणा-या मलेरियाच्या साथीने यंदा विक्राळ रूप धारण केलं आहे. एरवी मामुली वाटणारे डास शहरभर या रोगाचा प्रसार करत फिरतायत. त्यांनी दहशतच निर्माण केली आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी सर्व पातळय़ांवर प्रयत्न होत आहेत. पण एक काळ असा होता की, मलेरिया डासांमुळे पसरतो हेच माहीत नव्हतं. वाईट हवामानामुळे मलेरियाची साथ पसरते, असं मानलं जायचं. मलेरिया ही संज्ञाच ‘मल’ म्हणजे वाईट आणि ‘एरिया’ म्हणजे हवा या दोन इटालियन शब्दांच्या संयोगातून अस्तित्वात आली. देशभरात दरवर्षी लाखो रुग्ण या आजारामुळे आपला जीव गमावत. पण एक डॉक्टर होता, ज्याला मलेरियाचा केवळ वाईट हवामानाशी संबंध नसावा, असं वाटत होतं. त्याचा संशय होता साठलेल्या पाण्यात वाढणा-या डासांवर..
मलेरियाच्या प्रसारातील डासांच्या सहभागाचा वेध घेणारी ही व्यक्ती होती, डॉ. रोनाल्ड रॉस. ब्रिटिश-इंडियन मेडिकल सव्र्हिसमध्ये रूजू झालेल्या डॉ. रॉस यांची 1883 साली बंगळूरु येथे नियुक्ती करण्यात आली. तिथे त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेला बंगला दिमाखदार होता. मात्र बंगल्यात दिवसरात्र संचार करणा-या डासांमुळे रॉस त्रासले होते. बंगल्याच्या खिडकीजवळ ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टबमुळे डास येत असावेत, असं त्यांना वाटलं. या टबमध्ये त्यांना डासांची खूप अंडी आढळली. तसंच हा टब हटवताच डासांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. त्या अनुषंगानेच सुट्टीत इंग्लंडला गेले असताना रॉस यांनी बॅक्टेरिऑलॉजीचा अभ्यासक्रम केला. या अभ्यासक्रमात त्यांना सूक्ष्मदर्शक वापरण्याची संधी मिळाली आणि सूक्ष्म पेशींचं दर्शन घडवणारं साधन गवसलं. जे त्यांना पुढच्या संशोधनात अतिशय उपयोगी पडलं. याच सुमारास विषुववृत्तीय देशांमधील आजारांविषयी अभ्यास करणारे डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन यांची त्यांनी भेट घेतली. मलेरियाग्रस्त रुग्णांना दंश केलेल्या डासांनी पाण्यात अंडी घातली असता त्या पाण्याच्या सेवनामुळे मलेरियाचा प्रसार होतो, असा मॅन्सन यांचा कयास होता. रॉस यांनी हे पडताळून पाहण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले. मलेरियाचे वाहक शोधण्याचा त्यांनी इतका ध्यास घेतला होता की, ब्रिटनहून भारतात परतताना जहाजातील प्रवाशांच्या रक्ताचे नमुने घेण्यासही त्यांनी पुढे-मागे पाहिलं नाही. जहाज बंदरावर थांबलं की ते तेथील स्थानिक प्रयोगशाळेत जात आणि या नमुन्यांचा अभ्यास करत.
भारतात परतल्यावर ते मॅन्सन यांचं मत पडताळून पाहण्यात गुंतून गेले. मात्र काहीच निष्पन्न झालं नाही. तरीही या दोन शास्त्रज्ञांमध्ये पत्र व्यवहार सुरूच राहिला. 1895 ते 1899 या कालावधीत त्यांनी एकमेकांना 173 पत्रं लिहिली. ही पत्रं या नोबेल विजेत्या संशोधनाचे साक्षीदार ठरली. एक पत्र पोहोचायला तीन आठवडे लागत, त्या काळात त्यांनी एवढय़ा प्रचंड प्रमाणात पत्र व्यवहार केला.
रॉस अनेक डासांचं विच्छेदन करत. हॉस्पिटलमध्ये येणा-या तापाच्या प्रत्येक रुग्णाचं रक्त तपासून पाहत. त्यामुळे रुग्णांनी त्यांची धास्तीच घेतली होती, मात्र मार्ग काही गवसत नव्हता. डासांच्या दंशातून रोगाचा प्रसार होत असावा, असं त्यांना वाटू लागलं. म्हणून त्यांनी मलेरियाग्रस्त रुग्णांना दंश केलेल्या डासांना निरोगी व्यक्तींना दंश करण्यास भाग पाडलं. तरीही निरोगी व्यक्ती निरोगीच राहिल्या. कदाचित आपण योग्य प्रजातीच्या डासांचं विच्छेदन केलं नसावं, असं त्यांना वाटून त्यांनी संशोधन सुरूच ठेवलं. अखेर 16 ऑगस्ट रोजी त्यांना वेगळय़ाच प्रकारचे डास आढळले. त्यांच्या पंखांवर ठिपके होते. तेव्हा अॅनोफेलस प्रजातीच्या या डासांवर संशोधन करून पाहण्याचं त्यांनी ठरवलं. हुसेन खान नावाच्या एका मलेरियाच्या रुग्णाच्या शरीरावर त्यांनी या डासांच्या मादी सोडल्या. प्रत्येक डासाच्या दंशासाठी हुसेन यांना एक आणा देऊ केला. अशा पद्धतीने हुसेन यांनी दहा आणे कमवले.
अखेर 17 ऑगस्ट रोजी रॉस यांनी त्यापैकी दोन डासांना मारलं आणि त्यांचं विच्छेदन केलं. मात्र वेगळं असं काहीच आढळलं नाही. 19 ऑगस्टला त्यांनी आणखी काही डासांचं विच्छेदन करून पाहिलं. या डासांमध्ये त्यांना 10 मायक्रॉन व्यासाच्या काही वैशिष्टय़पूर्ण पेशी आढळल्या आणि 20 ऑगस्टला अखेर त्यांच्या संशोधनाला यश आलं. मलेरियाचे पॅरासाईट्स डासाच्या शरीरात आढळले आणि या रोगाचा प्रसार डासांच्या माध्यमातूनच होत असल्याचं निष्पन्न झालं. अनेकांचे बळी घेणारा हा आजार अशुद्ध हवेमुळे नव्हे; तर क्षुल्लक दिसणा-या डासांमुळे होत असल्याचं सिद्ध झालं. तेव्हापासून 20 ऑगस्ट हा दिवस ‘वर्ल्ड मॉस्क्युटो डे’ म्हणून पाळला जाऊ लागला.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा