श्रावणातली खादाडी
एकादशी दुप्पट खाशी, असं आपल्याकडे म्हणतात. पण ‘टिपटॉप’ आणि ‘दिवा महाराष्ट्राचा’मधील श्रावण स्पेशल खाणं पाहून खरंच दुप्पट खायची इच्छा होईल.
क्षणात ऊन, तर क्षणात पाऊस, असा ऊन-पावसाचा खेळ रंगणारा महिना म्हणजे श्रावण. आपल्या परंपरेनुसार श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्यांचा, सणासुदीचा महिना. साहजिकच या महिन्यातलं खाणं-पिणंही तसं सात्त्विकच असतं. या काळात वातावरण काहीसं निरूत्साही असल्याने पचायला हलके असतील असेच पदार्थ खावेत, असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे सामिष आहार श्रावणात वज्र्य असतो. पण सात्त्विक शाकाहारी आहाराचं, भाजीपाल्यांचं व उपावासाच्या वगैरे पदार्थाचं इतकं वैविध्य या महिन्यात उपलब्ध असतं की मांसाहाराची आठवणही होत नाही. पण हे पदार्थ खायचे तर ते घरीच बनवावे लागतात. कारण ते बाहेर निवडक ठिकाणीच मिळतात. अर्थात, हल्ली उपावासाचे पदार्थ देणाऱ्या हॉटेलची संख्याही वाढत चालली आहे. तर ठाण्यातल्या ‘टिपटॉप प्लाझा’ आणि माहिमच्या ‘दिवा महाराष्ट्राचा’नी तर त्याच्याही पुढे जाऊन खास श्रावण स्पेशल पदार्थाची मेजवानीच द्यायला सुरुवात केलीय.
श्रावणातल्या पदार्थाची आताच्या इन्स्टंट लाइफस्टाइलशी घालण्यात आलेली सांगड हे ‘टिपटॉप’च्या श्रावण स्पेशलचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळे त्यांचे बरेचसे उपवासाचे पदार्थ कोरडय़ा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यातही कोरडी उपवासाची खिचडी हा खास संशोधन करून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे. आपल्या नेहमीच्या खिचडीतले घटक वापरून भाजलेल्या साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेला हा पदार्थ हेल्थ कॉन्शस लोकांनाही आवडेल असा आहे.
त्याच्याबरोबर आहे ड्रायफ्रुट पोटॅटो चिवडा. भरपूर सुकामेवा वापरून तयार करण्यात आलेल्या या चिवडय़ाची वेगळी चव दीर्घकाळ जिभेवर राहील यात शंकाच नाही. या पदार्थाबरोबर वेगवेगळया प्रकारच्यी मिठायादेखील आहेत. तुम्ही कुठल्याही मिठाईचं नाव घेतलंत तरी ती आमच्याकडे असणारच, असं टिपटॉपचे प्रमुख रोहित शहा मोठय़ा अभिमानाने सांगतात. 1997 मध्ये नौपाडा येथे एका छोटय़ा दुकानातून सुरू झालेला टिपटॉपचा व्याप आता दहा दुकानं आणि एक हॉटेल आणि दहा हॉल इतका वाढला आहे. ‘मिठायांचा व्यवसाय हा पूर्वी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळावर आधारित होता. तो आम्ही पूर्णपणे यांत्रिक केला आहे,’ असं शहा सांगतात. त्यांच्या घोडबंदर रोडवरच्या कारखान्यात हा सगळा माल तयार केला जातो. इथे तयार होणा-या मिठाया व इतर पदार्थ ऐंशी टक्के मशिनच्या सहाय्याने तयार होतात. त्यासाठी विविध संगणकचलित मशीन वापरल्या जातात.
मिठाईतही बंगाली, भारतीय, उत्तर भारतीय, गुजराथी मिठायांबरोबर आपलं श्रीखंड व बांसुदीही मिळते. काही मिठायांची नावेही मोठी मजेशीर आहेत. उदाहारणार्थ, एका बर्फीचे नाव आहे काजू कादंबरी आहे तर माणिक नावाची मिठाईदेखील टिपटॉपमध्ये मिळते. केशर पाकिजा ही मिठाई त्यांनी खास स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून तयार केली होती.
आपल्या दुकानात आलेल्या ग्रहकाला त्याला हवा तो पदार्थ खायला मिळाला पाहिजे, हा शहा बंधूंचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्हाला इथे पावभाजी, डोसा पासून ते विविध प्रकारचे चाट, पिझ्झा आणि चायनीज व्हेज पदार्थही मिळू शकतात. या जोडीला टिपटॉपच्या प्लाझा मध्ये खास गुजराथी थालीचीही चव चाखायला मिळते.श्रावणा महिन्याच्या निमित्ताने ठाण्यात टिपटॉप ठाण्यात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत असतानाच तिकडे माहिमच्या ‘दिवा महाराष्ट्राचा’मध्येही खास श्रावण महोत्सव सुरू झाला आहे. या हॉटेलचं वैशिष्टय म्हणजे त्यांची खास श्रावण थाली. उपवास असेल तर तुम्ही केवळ एक-दोन पदार्थ खाता, मात्र इथे तुमच्यासाठी संपूर्ण थालीच सजवण्यात आली आहे. त्याची सुरुवात खास मठ्ठयाने होते. त्यानंतर स्टार्टर म्हणून खास उपवासाच्या भाजणीचं थालीपिठ, सोबत अप्रतिम दही चटणी, केवळ मिरची व कोथिंबीरीची चव असलेला कुरकुरीत साबुदाणा वडा येतात. या स्टार्टरनंतर सुरू होतो तो मेन कोर्स. आपल्या एकादशीलाही मागे टाकेल असा हा श्रावणी मेन कोर्स आहे. यात असते ती बटाटयाची सुकी भाजी, सुरण, साबुदाणा व शिंगाडयापासून तयार करण्यात आलेली रस्सा भाजी,खोबर व जिरं घालून उपवासाच्या पदार्थाने तयार करण्यात आलेलं वरण आणि या सगळयांना आपल्या चवीने मागे टाकणारी पाइनॅपल आमटी असा बेत असतो. तुम्ही आजवर भाज्यांच्या अनेक वैशिष्टयपूर्ण रेसिपी पाहिलेल्या असतील. पण फळांची इतकी सुंदर रेसिपी तुम्हाला अगदी खूष करून टाकतील. याच्या जोडीला शिंगाडय़ाच्या पिठाच्या पुऱ्या आणि वरीच्या तांदळाच्या किंवा शिंगाडयाच्या पिठाच्या भाक-याही मिळतात. सोबत खमंग काकडी असते. त्यानंतर भात खाण्याच्या ऐवजी आपण खायचा तो खास वरीच्या तांदळाचा पुलाव. पाईनॅपल आमटी सोबत हा पुलाव खाण्याची मजा अगदी श्रावण नसतानाही घेण्यासारखी आहे. या खास श्रावण थालीबरोबर त्याच प्रकारचं डेझर्टही पेश होतं. त्यात खजूर व रताळ्यापासून तयार करण्यात आलेला खास हलवा आणि साबुदाण्याची विविध पदार्थानी सजलेली खीर असते. हे एवढं खाऊन पोट भरलं नाही तरच नवल.
एकादशी दुप्पट खाशी, असं आपल्याकडे म्हणतात. पण ‘टिपटॉप’ आणि ‘दिवा महाराष्ट्राचा’मधील श्रावण स्पेशल खाणं पाहून खरंच दुप्पट खायची इच्छा होईल.
- खजूर रताळी हलवा (चार जणांसाठी) साहित्य : 100 ग्रॅम खजूर, 150 ग्रॅम उकडलेली रताळी, एक कप खवलेला नारळ, काजू तुकडे करून, अर्धा कप साखर, चार टेबलस्पून तूप. कृती : रताळी किसून घ्यावीत. खजूराचे बारीक तुकडे करावेत व काजू पाण्यात भिजवून घ्यावेत. एका भांडय़ात तूप गरम करून त्यात खवलेला नारळ आणि साखर घालावी व साखर वितळेपर्यंत शिजवावं, त्यात किसलेलं रताळं घालून त्याचा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यावं, शेवटी त्यात खजूर व भिजवलेले काजू घालून पाच मिनिटे परतववावं व हलवा गरमागरम सव्र्ह करावा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा