कोकणी कुलाचे भीष्माचार्य
रवींद्र केळेकर हे ख-या अर्थाने कोकणी कुलाचे भीष्माचार्य. कोकणी भाषा, कोकणी साहित्य आणि कोकणी अस्मिता यांचे रक्षण करण्यासाठी आयुष्यभर जीव तोडून मेहनत करीत अहर्निशपणे झटणारा एक असामान्य शब्दयोगी. त्यांच्या स्वत:च्याच शब्दात सांगायचे झाले तर ‘फायटर’ असलेला एक ‘रायटर’.
रवींद्र केळेकर हे ख-या अर्थाने कोकणी कुलाचे भीष्माचार्य. कोकणी भाषा, कोकणी साहित्य आणि कोकणी अस्मिता यांचे रक्षण करण्यासाठी आयुष्यभर जीव तोडून मेहनत करीत अहर्निशपणे झटणारा एक असामान्य शब्दयोगी. त्यांच्या स्वत:च्याच शब्दात सांगायचे झाले तर ‘फायटर’ असलेला एक ‘रायटर’.
कोकणी साहित्याचे प्रवर्तक शणं गोयंबाब यांच्यानंतर कोकणी साहित्य चळवळीचा झेंडा रवींद्र केळेकर यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि पाहता पाहता पुढील 50 वर्षाच्या काळात ते कोकणी लढय़ाचे सरसेनानी बनले. कोकणीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम त्यांनी व्रतस्थपणे केले. प्रसंगी गोव्यातील मराठीवादी व मराठी भाषा यांच्यावरही कठोर प्रहार केले. भाषावादाच्या काळात मराठी प्रेमींचा प्रचंड रोषही त्यांनी पत्करला. अनेक वेळा केळेकर मर्यादा भंग करतात की काय असे वाटावे इतपत मराठीद्वेषाचे दर्शन त्यांनी घडवले. यामुळे एकीकडे साहित्यिक व विचारवंत म्हणून त्यांना सर्वत्र मान्यता मिळत असतानाही गोव्यातील मराठी प्रेमींना ते आपलेसे वाटू शकले नाहीत.
तथापी, कोकणी प्रेमी जनतेसाठी मात्र त्यांनी पितामहाची भूमिका स्वीकारली. आजही कोकणातील अनेक लेखकांना रवींद्र केळेकर हे ‘रोल मॉडेल’ वाटतात. कोकणी भाषेच्या विकासात अनेक वेळा ‘पहिलेपणा’चा मान त्यांच्यामुळे मिळाला. कोकणी भाषेला पहिलावहिला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी मिळवून दिला. ‘हिमालयात’ या त्यांच्या प्रवासवर्णनपर पुस्तकाला 1977 साली हा मान प्राप्त झाला होता. त्यापूर्वी 1974 साली ‘जपान असा दिसला’ या पुस्तकासाठी त्यांना गोवा कला अकादमीचा साहित्य पुरस्कार लाभला होता आणि 1975 साली ‘उजवाडाचे सूर’ या पुस्काला कोकणी भाषा मंडळाचा पुरस्कार मिळाला होता. 1978 साली साहित्य अकादमीच्या कार्यकारी समितीवर त्यांची नियुक्ती झाली. 1997 साली गोवा कला अकादमीचा ‘साहित्य शारदा’ हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार देवून त्यांना गौरवण्यात आले. 2007 साली साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. 2008 साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देवून गौरवित केले तर त्याच वर्षी मिळालेल्या 42व्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या आजवरच्या साहित्यिक कारकिर्दीवर सुवर्णमुकूट चढवला.
रवींद्र केळेकर यांचा जन्म झाला सात मार्च 1925 रोजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण दीव येथे झाले. त्यामुळे बालपणीच गुजराती भाषेशी त्यांचा सपंर्क आला. 1942 साली त्यांनी पणजीतून लिसेवचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिथे पोर्तुगीज भाषा हे माध्यम होते. यामुळे पोर्तुगीज, मराठी, हिंदी, गुजराती व नंतर इंग्रजी या भाषांवर त्यांनी चांगलेच प्रभुत्व संपादन केले. 1946 साली त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात उडी घेतली आणि दीर्घकाळ या लढय़ात काम केले. 1961 साली त्यांना कारावासही भोगावा लागला.
मुक्तिलढय़ात सहभागी होण्याअगोदरपासून रवींद्र केळेकर साहित्यपंथाचे वारकरी बनले होते. साहित्यातला त्यांचा प्रवास 1953 पासून सुरू झाला. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी त्यांनी ‘मीर्ग’ हे मासिक चालू केले. तीन वर्षे ते चालवल्यानंतर 1956 साली त्यांनी मुंबईतून ‘गोमंत भारती’ हे साप्ताहिक रोजी लिपीतून चालवले. 1988 साली ‘जाग’ या मासिकाची स्थापना केली. कोकणातील कितीतरी उदयोन्मुख लेखकांना पहिला मंच मिळवून दिला तो रवींद्रबाबांनीच. कितीतरी नवे लेखक त्यांनी घडवले. जे आधीपासून लिहीत होते त्यांना आणखी लिहिण्याची प्रेरणा दिली. न थकता अक्षरसाधना कशी करावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
1953 पासून लिहिती झालेली त्यांची लेखणी 2010च्या प्रारंभापर्यंत कार्यरत होती. या काळात त्यांची पन्नासाहून अधिक पुस्तके छापून आली. काही स्वतंत्र, काही अनुवादीत, काही संपादीत. त्यांच्या पुस्तकांचे इतर भाषांतही अनुवाद झाले. याशिवाय वेगवेगळ्या दैनिकातून, नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने विपुल लेखन केले. ललित साहित्य असो की वैचारिक लिखाण, रवींद्र केळेकर यांनी आपल्या खास शैलीची साथ कधी सोडली नाही. त्यांची स्वत:ची अशी एक शैली होती. अवघड शब्दांची आणि अवजड वाक्यांची भेंडोळी सोडीत न बसता सोपे, साधे शब्द आणि छोटी-छोटी वाक्ये यांची पखरण ते करायचे. त्यांचे लेखन
म्हणजे कागदावर घातलेली सुबक रांगोळीच होती.
रवींद्र केळेकर यांची सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती म्हणजे 1985 साली त्यांनी प्रकाशित केलेला ‘महाभारत- एक अनुसर्जन’ हा ग्रंथ. व्यासांच्या महाभारताचा केळेकर यांनी विवेचक आणि विचक्षण नजरेने घेतलेला वेध म्हणजे रवींद्रबाबानी कोकणी साहित्य शारदेला प्रदान केलेला एक सुंदर अलंकारच आहे. रवींद्र केळेकर यांनी ललित साहित्य फारसे लिहिले नाही, पण वैचारिक साहित्याची विपुल प्रमाणात निर्मिती केली. मनोरहरराय सरदेसाय, चंद्रकांत केणी यासारखे त्यांचे समकालीन मित्र रंजनवादी साहित्य निर्मितीत गुंतले असताना रवींद्र केळेकर यांनी मात्र गांभीर्यपूर्वक वैचारिक लेखनासाठी स्वत:ला समर्पित केले. त्यामुळे त्यांचे बरेचसे लेखन हे सर्वसामान्य वाचकापर्यंत पोचू शकले नाही. सत्याग्रह (1957), अशे अशिल्ले गांधीजी (1960), कथा यानी काणयो (1961), आमची भास कोकणीच (1962), शाळेत कोकणी कित्याक? (1962) तुळशी, वेळेवयल्यो युलो (1971), भज गोविंदम् (1973), उजवाडाचे सूर (1973), भौभाशिक भारतात भाशेचे समाजशास्त्र (1974), हिमालयांत (1976), सांगाती (1977), राजा-राणी (1979), ब्रम्हांडातले तांडव (1980), महाभारत-एक अनुसर्जन (1985), आमोरेर (2003), भारतवर्षाची संस्कृतायेची साधनां, तीन पावलां प्रज्ञावादाची, अघळ पघळ (2005), आशिकुशीत (2007) ही त्यांची कोकणातील ग्रंथसंपदा. मराठीतून त्यांची कोकणीचे राजकारण (1984), जपान जसा दिसला (1970), ज्ञाननिधीच्या सान्निध्यात (1970) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.
रवींद्र केळेकर लिहायला लागले त्या वेळी नागरी कोकणीत फारसे साहित्य नव्हतेच. शण गोयंबाब यांची आठ-दहा पुस्तके, प्रो. राणू नायक यांच्या चार-पाच नाटिका, बयाभाव व शां. वि. कामत यांचे कवितासंग्रह आणि कुणाचातरी एक कथासंग्रह एवढीच कोकणीची ग्रंथसंपदा होती. कोकणी ही भाषाच नव्हे म्हणणा-यांचा गट त्या वेळी प्रबळ होता. अशा परिस्थितीत केळेकरांनी लिखाणाला प्रारंभ केला. ते स्वत: तर लिहित राहिलेच उलट अनेकांना त्यांनी लिहायला प्रवृत्त केले. आज कोकणीत जवळजवळ दोन हजार पुस्तके आहेत. या वाटचालीत रवींद्रबाबांचे योगदान फार ऐतिहासिक प्रकारचे आहे हे मान्य केलेच पाहिजे.
महात्मा गांधी, विनोबा भावे आणि आचार्य काकासाहेब कालेलकर या तीन व्यक्तिमत्त्वांचा मोठा प्रभाव तरुण वयातच केळेकरांवर पडला होता. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यांना अत्यंत प्रिय होते. व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी कर्मकांडाला, जातीपातींना कधीच स्थान दिले नाही. ज्ञानपीठ पुरस्कार हा त्यांच्या एकूणच साहित्यिक वाटचालीचा यथार्थ गौरव आहे. रवींद्रबाबा या पुरस्कारामुळे मोठे तर झालेच पण त्यांनी कोकणीलाही सन्मान मिळवून दिला. 84 वर्षाचे संपन्न, सुंदर आणि कृतार्थ जीवन हा ज्ञानयोगी जगला, नि कोकणी साहित्य विश्वात चिरंजीव पदाचा अधिकारी बनला.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा