पहिले पान | कोलाज | भगवंताची द्वारका

भगवंताची द्वारका

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आणि आधारभूत ठरलेल्या लोकोत्तर-अलौकिक अशा श्रीकृष्णाची द्वारका ही पवित्र भूमी! तिच्या दर्शनाच्या ओढीने येथे येणारा प्रत्येक जण श्रद्धेने तिच्यासमोर नतमस्तक होतो. तर समोरच्या अफाट सागर दर्शनाने त्या श्रद्धेला विशालतेची जोड आपसूक मिळते.

पर्यटनाचा उगम नवीन भूप्रदेशाचा शोध घेत त्या अज्ञात भूप्रदेशाची नवलाई अनुभवण्याच्या जिज्ञासेतून जसा झाला, तसाच आपल्या भूप्रदेशातील आवश्यक (पण दुर्मीळ) वस्तूंच्या प्राप्तीसाठी होणा-या व्यापारवृद्धीतूनही पर्यटन शाखा विस्तारली. पण हे जरी खरं असलं तरी देशांतर्गत प्रवास पर्यटनाला हजारो वर्षापूर्वी सुरुवात झाली, ती मात्र धार्मिक प्रवासातून. धार्मिकतेचा पगडा असलेला आपला भारतीय समाज देवदर्शनासाठी विविध स्थळांना भेटी द्यायला आजही पूर्वीइतकाच उत्सुक आहे. आणि भारतातील कुठल्याच प्रांतात धार्मिक पर्यटनाला तोटा नाही.

महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या गुजरातला तर हजारो वर्षाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक-धार्मिक वारसा लाभलेला आहे. बारा ज्योतिर्लिगातील सोरटी सोमनाथ, शत्रुंजय पहाडावरील 863 जैन मंदिरांचा विक्रमी समूह, गांधीनगरचे स्वामीनारायण मंदिर, भरूचजवळचे जगाडियाचे गायत्रीदेवी मंदिर.. असं मोठंच धार्मिक वैभव गुजरातमध्ये आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजारो र्वष भारतवासीयांचं अढळ श्रद्धास्थान असलेली कृष्णाची द्वारका नगरी गुजरातमध्येच आहे. कृष्णाचा आणि त्याच्या द्वारकेचा महिमा काय वर्णावा!

द्वारका हे ठिकाण गुजरातमधील जामनगर जिलत असून ते गोमती नदी जेथे समुद्राला मिळते तेथे वसले आहे. चार धामांपैकी एक असे हे प्रख्यात पवित्र तीर्थस्थान आहे. सोरटी सोमनाथप्रमाणेच हे ठिकाण भाविक पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

द्वारका हे ठिकाण ओखा बंदराच्या दक्षिणेस आणि जामनगरच्या पश्चिमेस वसलं असून येथे राज्य परिवहन मंडळाची बस, रेल्वे व जलमार्गाने जाता येतं. आज या नगरीचं नाव द्वारका असलं, तरी कालौघात ही नगरी अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखली गेली आहे. द्वारावतीपूर, द्वारावती, नयालिनी अशा अनेक नावांनी द्वारका प्रसिद्ध होती. प्राचीन काळी सुरक्षेसाठी या नगराभोवती असलेल्या तटाला अनेक प्रवेशद्वारं होती, त्यावरूनही या नगराला द्वारका नगरी असं नाव पडलं असावं, असं जाणकारांचं म्हणणं आहे. पूर्वी हे आनरी’’ प्रदेशाच्या राजधानीचं ठिकाण होतं.

मथुरेत जरासंधापासून यादवांना उपद्रव व्हायला लागल्याने श्रीकृष्णाने या दूरच्या ठिकाणी सागरकिनारी द्वारकानगरी वसवली. जरासंधाला जशास तसं युद्धाने प्रतिकार करण्यापेक्षा कृष्णाने द्वारकेला स्थलांतर केलं, म्हणून द्वारकेच्या श्रीकृष्णाला रणांगणातून माघार घेणारा रणछोडजी असंही संबोधलं जातं. येथील द्वारकाधीश श्रीकृष्णाचं पुरातन मंदिर हे पर्यटक-भाविकांचं प्रमुख आकर्षण आहे. सोरटी सोमनाथप्रमाणेच या मंदिरालादेखील परकीय आक्रमणाचे तडाखे सोसावे लागले. इ.स. 1460 मध्ये मुहमद बेगडाने या मंदिराच्या कळसाचा भाग उद्ध्वस्त केला होता. तसंच शेरदिल वाघेर जमातीने 1857 साली केलेल्या उठावाचा बिमोड करण्यासाठी इंग्रजानीही या मंदिराचा विध्वंस केला होता. बडोदा संस्थानाधीश श्रीमंत समाजीराव गायकवाडांनी येथील मंदिराचा नंतर जीर्णोद्धार केला. अनेक राजकीय स्थित्यंतरांतून गेलेल्या या मंदिर परिसरात आजवर अनेक अवशेष उत्खननात सापडले आहेत. यातील काही अवशेषांवरील नक्षी आणि त्यावरील शिल्पकाम आकर्षक आणि मनोहारी आहे.

येथील उत्खननात इ.स. पूर्व दुस-या शतकापासूनच्या लोकवस्तीचा पुरावा देणारे रोमन मद्यकुंभ, शंखाच्या, काचेच्या बांगडय़ा आणि काचेचा मुलामा असलेली चिनी मातीची मृत्पात्रंदेखील आढळली आहेत.

द्वारकानगरीत प्रवेश करताना खूप दूरवरून येथील उंचच उंच मंदिराचं दर्शन घडतं. दिवसा फडकणारा केशरीध्वज आणि रात्री प्रखर प्रकाशझोतात होणाऱ्या मंदिराच्या प्रथम दर्शनानेच येणारा प्रत्येक भाविक किंवा पर्यटक भारावून जातो. या मंदिराचे जोते 90 फूट लांब आणि 20 फूट रुंद असून मंदिराची उंची 170 फूट आहे. या मंदिराला एकूण पाच मजले आहेत. त्याचा चार द्वारांचा सभामंडप भरभक्कम असून, मंदिर 60 खांबांवर उभं आहे, मात्र हे खांब जवळजवळ असल्याने समामंडप मोठे असूनही त्याचा प्रशस्तपणा जाणवत नाही. मंदिरातील श्यामवर्णी चतुर्भूज कृष्णमूर्ती 1.2 मीटर उंचीची असून ती अतिशय रेखीव आहे. या मंदिर प्रांगणात अनेक लहान-मोठी मंदिरं असून येथील कुंड व घाट प्रसिद्ध आहेत.

घाटाच्या पायथ्याशी वाहणारं पाणी इतकं स्वच्छ आहे की, पाण्याखालची शुभ्र वाळू आणि शंखाशिपले स्पष्ट दिसतात. द्वारकानगरीनजीक दीड कि.मी. अंतरावर जुनं बंदर आहे. पूर्वी या बंदरातून आयात-निर्यात होत असे, पण ओखा बंदर झाल्यावर द्वारका बंदराचं महत्त्व कमी झालं.

द्वारकाधीश मंदिर प्रांगणातील हत्ती आणि मानवी पुतळय़ाना पंखांचं वलय असल्याने त्यावर असिरियन शिल्पकलेचा प्रभाव जाणवतो. आद्य शंकराचार्याच्या चार मठांपैकी एक मठ येथे आहे.

द्वारकेपासून 20 मैलावर ओखा बंदराजवळच द्वारकाबेट आहे. येथे जाण्यासाठी यांत्रिक नौकेची सोय असून हा अल्पकाळचा सागरीप्रवास संथ-खोल सागराचं जवळून दर्शन घडवतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आणि आधारभूत ठरलेल्या लोकोत्तर- अलौकिक अशा श्रीकृष्णाची ही पवित्र भूमी. त्या ओढीने येथे येणारा प्रत्येक जण श्रद्धेने नतमस्तक होतो. तर समोरच्या अफाट सागर दर्शनाने त्या श्रद्धेला विशालतेची जोड आपसूक मिळते..     

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0