लोकसंस्कृतीचा उपासक
आजच्या रा. चिं. ढेरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधूनच ‘करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीसंदर्भात उपलब्ध असलेल्या सा-या अभ्यास साधनांचा धांडोळा घेऊन शरीर साथ देत नसतानाही गेली अडीच-तीन वर्ष हा ग्रंथ लिहिण्यात ते व्यग्र होते.
लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे आज ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मात्र वय झाले तरी, ढेरे यांचा लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा-संशोधनाचा उत्साह कायम आहे. आजच्या त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधूनच ‘करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीसंदर्भात उपलब्ध असलेल्या सा-या अभ्यास साधनांचा धांडोळा घेऊन शरीर साथ देत नसतानाही गेली अडीच-तीन वर्ष हा ग्रंथ लिहिण्यात ते व्यग्र होते. केवळ याच पुस्तकासाठी नाही, तर आतापर्यंत प्रकाशित झालेल्या विठोबा, खंडोबा, शिखर शिंगणापूरचा महादेव, श्रीतुळजाभवानी अशा प्रत्येक दैवतावरील पुस्तकासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले त. किंबहुना अपरिमित ग्रांथीय आणि क्षेत्रीय अभ्यास हे रा. चिं. ढेरे यांच्या एकूणच अभ्यासाचे आणि आयुष्याचेही सार आहे.
गेल्या ६० वर्षात ढेरे यांनी लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचे केलेले अध्ययन व संशोधन पाहून थक्क व्हायला होते. विशेष म्हणजे कुणाचेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी एकहाती हा ज्ञानयज्ञ चालू ठेवला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विश्वकोशाच्या कार्याचा आणि डॉ. सरोजिनी बाबर यांनी केलेल्या लोकसाहित्याच्या कामाचा नेहमीच उचित गौरव झालेला आहे. पण विश्वकोश काय किंवा लोकसाहित्याचे संकलन काय, या कामासाठी या दोन्ही महनीयांच्या पाठीशी शासकीय महामंडळे होती. पण ढेरे यांच्या पाठीशी कुणीच नव्हते. काही काळासाठी डेक्कन कॉलेज व ‘यूजीसी’ची फेलोशिप त्यांना मिळाली होती. पण तेवढे सोडले, तर आजवर त्यांनी एकटय़ाच्या हिमतीवर हे ज्ञानसत्र सुरू ठेवले आहे.
संशोधनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वी वाहनांची सोयच नसायची. अशा काळात ढेरे यांनी तब्बल तीसेक वर्षे एसटीसारख्या वाहनांतून भटकत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील शेकडो खेडी पालथी घातली. पण या भटकंतीचा त्यांनी कधीच कंटाळा केला नाही. अशा प्रकारच्या अफाट आणि अचाट भटकंतीतून त्यांनी अक्षरश: हजारो साधनग्रंथ मिळवले. त्यात पोथ्या, हस्तलिखिते, दुर्मीळ पुस्तकांचा मोठा समावेश आहे. ढेरे यांची आपल्या अभ्यास विषयांवरची ज्ञाननिष्ठा एवढी प्रबळ आहे, की १९६१मध्ये पानशेतचं धरण फुटून पुण्यात शिरलेल्या पुराच्या पाण्यात त्यांची सारी ग्रंथसंपदा वाहून गेली होती. पण आपल्या उपयोगाचे हे साधनग्रंथ त्यांनी पुन्हा मिळवले आणि आपला अभ्यास सुरूच ठेवला.
रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या कामाचे मोल म्हणजे त्यांनी इतरांसारखे लोकवाङ्मयाचे-लोकसंस्कृतीचे केवळ संकलनच केले नाही, तर संकलित केलेल्या साधनांचा अभ्यास करून लोकसंस्कृतीविषयक ठोस असे सिद्धान्तही मांडले. विशेषत: लोकदेवतांचे उन्नयिनीकरण आणि मातृदेवतेच्या सर्जनावस्थेतील मूर्तीचा त्यांना लावलेला अन्वय ही केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारतीय लोकसांस्कृतिक अभ्यासाला दिलेली देणगी आहे.
आज ८० व्या वर्षी त्यांचा ‘करवीरनिवासिनी महालक्ष्मी’ हा ग्रंथ प्रकाशित होत आहे आणि या मुहूर्तावरच ते ‘वेंकटेश आणि महाराष्ट्र’ या आपल्या नव्या पुस्तकाची घोषणा करीत आहेत. जोपर्यंत कुडीत धुगधुगी आहे, तोपर्यंत हा अभ्यास सुरूच राहणार असे ते सांगतात. कुणाकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता रा. चिं. ढेरे यांच्यासारखी तपस्वी माणसे आपले काम सुरू ठेवतात. अशांच्या पाठी शासनाने आपले आर्थिकबळ उभे केले, तर त्यांच्याकडून निश्चितच अधिक काम होईल आणि हे काम महाराष्ट्रासाठी गौरवाचेच असेल.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा