देव भक्तीचा भुकेला
विठूरायाच्या चरणावर माथा टेकवून मनाची शांती मिळविणा-या वारक-यांना आता असे करता येणार नाही की त्याची महापूजाही करता येणार नाही.
‘दगडाचा देव त्याले पाण्याचे भेव’. देव असला तरी त्याला भीती असतेच. सोन्या-चांदीच्या देवाला चोरांची भीती असते, तर लाकडाच्या देवाला आगीची. लाखो वारक-यांचा प्राणसखा असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला मात्र त्याच्या भक्तांपासूनच वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. विठूरायाच्या चरणावर माथा टेकवून मनाची शांती मिळविणा-या वारक-यांना आता असे करता येणार नाही की त्याची महापूजाही करता येणार नाही.
आषाढी-कार्तिकीला लाखो भक्तांनी विठ्ठलाच्या पायावर माथा टेकवल्याने आणि पंचामृताने स्नान घातल्याने मूर्तीची झीज आटोक्याबाहेर चालली आहे. १३ व्या शतकातली ही मूर्ती वाचवायची असेल तर तिची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. पुरातत्व खात्याने याबाबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला वेळीच जागे केले होते; मात्र समितीने पुरातत्व खात्याचा हा इशारा फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. आता मात्र हा इशारा गंभीरपणे घेण्यास समिती तयाार झाली असली तरी याबाबत पुरातत्व खात्याने पुन्हा एकदा अहवाल पाठवावा, असा आग्रह या समितीचे अध्यक्ष शशिकांत पागे यांनी धरला आहे. मंदिर, मूर्तीची काळजी घेणे आणि भाविकांची गैरसोय होऊ न देणे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीने आतापर्यंत केवळ आपलेच हित पाहिल्याचा आरोप केला जातो आहे. आताही नव्या अहवालाची मागणी म्हणजे विठ्ठलाच्या महापूजेवर येऊ घातलेली बंदी आणखी काही काळ पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. विठ्ठलाची दररोज सात-आठ वेळा महापूजा केली जाते. आषाढी एकादशीला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. सर्वसामान्यांना पांडुरंगाचे दर्शन लांबूनच घ्यावे लागत असताना अनेकधनिक पैसे मोजून महापूजेचा मान मिळवीत असतात. मंदिर समितीचा उत्पन्नाचा हा मोठा स्रेत ठरला आहे. या पूजेतून मिळणा-या उत्पन्नावर सहजासहजी पाणी सोडण्याची मंदिर समितीची तयारी नाही.
आताच महापूजेसाठी पाच-साडेपाच हजार भाविकांचे अर्ज मंदिर समितीकडे पडून आहेत. महापूजेवर लगेचच बंदी घातल्यास या हजारो अर्जाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. महापूजेमुळे जर मूर्तीची झीज होत असेल तर ती तातडीने बंद केलीच पाहिजे. महापूजेच्या वेळी विठ्ठलाच्या मूर्तीला सुरुवातीस गरम पाण्याने, नंतर दही, दूध, तूप, मध, साखर या पंचांमृताने स्नान घातले जाते. त्यानंतर पुन्हा गरम पाण्याने स्नान घातल्यावर महापूजा पूर्ण होते. या स्नानाचे पाणी भाविकांच्या अंगावर प्रसाद म्हणून शिंपडले जाते. महापूजा बंद केली तर भाविकांकडून येणारा दक्षिणेचा हा ओघ आटेल.
समितीच्या नावामुळे सदस्यांना समाजात मिळणारा मान, महत्त्व आणि पतही कमी होईल, या भीतीतूनच मंदिर समितीचा बंदीस विरोध आहे. त्यांचा हा हट्ट पुरवायचा तर मूर्तीची झीज रोखता येणार नाही. मूर्ती याच वेगाने झिजत गेली, तर काही दिवसांनी मूर्तीऐवजी ‘या ठिकाणी साडेतीन फूट उंचीची पांडुरंगाची मूर्ती होती’ असा फलक लावावा लागेल. यावर उपाय म्हणजे विठ्ठलाच्या सध्याच्या मूर्तीऐवजी पर्यायी मूर्तीची पूजा हा आहे. मूळ मूर्ती समोर दिसत असताना दुस-या मूर्तीची पूजा करण्यास भाविकांचा विरोध असू शकतो. त्यासाठी भाविकांचे प्रबोधन करावे लागेल. भाविकांच्या भावना जपण्यासाठी अनेक मंदिरात आजही पूजेच्या मूर्तीचा पर्याय स्वीकारला गेला आहे. भावनेबरोबरच पांडुरंगाच्या मूर्तीच्या संरक्षणाचाही विचार भक्तांनी केला पाहिजे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा