मातीतल्या खेळांचा सन्मान
गेल्या वर्षीचे प्रलंबित आणि यंदाच्या वर्षीचे अपेक्षित शिवछत्रपती पुरस्कार अखेर गुरुवारी जाहीर झाले. पण केवळ राज्य सरकारच्या वेबसाइटवर याची घोषणा करणा-या क्रीडा खात्याने पुरस्कार प्रदान केव्हा करणार, याविषयी भाष्य केलेले नाही.
गेल्या वर्षीचे प्रलंबित आणि यंदाच्या वर्षीचे अपेक्षित शिवछत्रपती पुरस्कार अखेर गुरुवारी जाहीर झाले. पण केवळ राज्य सरकारच्या वेबसाइटवर याची घोषणा करणा-या क्रीडा खात्याने पुरस्कार प्रदान केव्हा करणार, याविषयी भाष्य केलेले नाही. गेली काही वर्षे हे पुरस्कार सतत कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत, त्याला राज्य सरकारची अनास्था हे एक कारणही आहे. यंदा हिंदकेसरी मारुती माने आणि ज्येष्ठ खो-खो संघटक माधव पाटील यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. काही वेळा एखाद्या पुरस्काराची शान पुरस्कार विजेत्या व्यक्तिमत्त्वामुळे वाढते असे म्हटले जाते. माने आणि पाटील ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे त्या प्रकारातली आहेत, याविषयी दुमत होणार नाही. शिवाय कुस्ती आणि खो-खो या दोन अस्सल मराठी मातीतल्या खेळांचाही हा सन्मान आहे.
कुस्ती विश्वात अलीकडे उत्तरेकडील राज्यांचा आणि तेथील मल्लांचा बोलबाला असतो. तो रास्तही असतो. पण महाराष्ट्रात आधीच्या पिढीत असे काही मल्ल होते, जे निधडय़ा छातीने पंजाब, हरयाणातल्या मल्लांना भिडत आणि त्यांना अस्मानही दाखवत. मारुती तथा भाऊ माने त्या सुवर्णयुगाचे शिलेदार होते. त्यांच्या उमेदीच्या काळातल्या आठवणी सांगणारे आजही भेटतात. १९६२मधील जाकार्ता आशियाई स्पर्धेत त्यांनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. फ्री-स्टाइल आणि ग्रीको-रोमन या दोन्ही प्रकारांत चमक दाखवणा-या दुर्मिळ मल्लांमध्ये भाऊंचा समावेश होतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सिनेनटांच्याही मनात गंड निर्माण होईल, असे रुबाबदार होते. १९६२नंतर दोनच वर्षानी पंजाबमधील कर्नाल येथे झालेल्या हिंदकेसरी लढतीत त्यांनी मेहेर या राजस्थानच्या तगडय़ा मल्लाला अस्मान दाखवले. सांगली जिल्हय़ात कवठेपिरानसारख्या लहानशा खेडय़ात गरीब कुटुंबात जन्माला येऊनही भाऊ माने यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी त्यांना भावी आयुष्यात अनोख्या उंचीवर घेऊन गेली. १९६० ते १९७२ या काळात भाऊंची कीर्ती शिखरावर होती. त्या काळात त्यांचा चाहतावर्ग महाराष्ट्राबाहेर दिल्ली-पंजाबातही मोठय़ा प्रमाणात होता. त्या तुलनेत या गुणी मल्लाच्या वाटेला मानसन्मान काहीशा उशीरानेच आले. भाऊंना त्याचा विशाद नक्कीच वाटतो, पण याबाबत जाहीर स्तरावर त्यांनी कधीही तक्रारसूर लावलेला नाही. त्यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्याही आधी केंद्र सरकारचा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा गौरव करण्यात राज्य सरकारवर केंद्र सरकारने कुरघोडी केली, असे मात्र खेदाने म्हणावेसे वाटते. खो-खो या खेळाची पंढरी म्हणून धुळे जिल्हय़ाला ओळखले जाते, याचे मोठे श्रेय ज्येष्ठ संघटक माधवराव पाटलांना द्यावे लागेल. गेली ४३ वर्षे खो-खोच्या स्पर्धा भरवण्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरचे खो-खोपटू घडवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. धुळ्यात सात वेळा राष्ट्रीय खो-खो स्पर्धाचे आयोजन केले गेले. इतक्या मोठय़ा संख्येने स्पर्धा मुंबई-पुण्यातही झालेल्या नाहीत. एक ज्येष्ठ संघटकाचा हा गौरव माधवरावांच्या हजारो चाहत्यांसाठी समाधान देणारा ठरला. यंदा हे पुरस्कार जाहीर करण्याचे सोपस्कार राज्य सरकारने पार पाडले आहेत, पण वाद याही वेळी आहेतच. दरवर्षी पुरस्कार जाहीर करण्याचा शिरस्ताच जेथे मोडून पडलेला आहे, तेथे उत्तरेकडील राज्यांसारखी क्रीडा संस्कृती रुजवली-राबवली जाण्याची अपेक्षा बाळगण्याची सोयही राहिलेली नाही.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा