अवलिया संगीतकार
संगीताचे स्वर सातच; मात्र रसिकांच्या हृदयाला हात घालण्याची त्यांची ताकद जोखून त्यांना हवे तसे वळण देण्याची अजब किमया साधलेल्या हाताच्या बोटावर मोजता येणा-या संगीतकारांपैकी एक म्हणून भास्कर चंदावरकर यांचे नाव घ्यावे लागेल.
संगीताचे स्वर सातच; मात्र रसिकांच्या हृदयाला हात घालण्याची त्यांची ताकद जोखून त्यांना हवे तसे वळण देण्याची अजब किमया साधलेल्या हाताच्या बोटावर मोजता येणा-या संगीतकारांपैकी एक म्हणून भास्कर चंदावरकर यांचे नाव घ्यावे लागेल. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक असो की ‘सामना’, ‘थोडासा रुमानी हो जाए’सारखा चित्रपट, त्यांना पूरक संगीत देण्याची अवघड कामगिरी चंदावरकरांनी सहज पेलली आणि संगीताचा बाजच बदलून टाकला.
चंदावरकर मुळात उत्कृष्ट सतारवादक. पं. रविशंकर आणि उमाशंकर मिश्र यांच्यासारख्या विख्यात संगीतकारांकडून सतारीचे शिक्षण घेतलेल्या चंदावरकरांनी काही काळ सतारवादनाच्या मैफली गाजविल्या. या क्षेत्रात आपली वेगळी ओळखही अल्पावधीतच त्यांनी निर्माण केली. मात्र एकाच क्षेत्रात कायम अडकून न पडण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे भारतीय शास्त्रीय संगीतापेक्षा भिन्न शैली असलेल्या पाश्चिमात्य जाझ संगीताचाही त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे उगवत्या पिढीशी त्याचे सहज भावनिक नाते तयार झाले. जय जवान जय मकान या विश्राम बेडेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली. वंशवृक्ष, मायादर्पण, जादू का शंख अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मात्र त्यांच्या कारकीर्दीला खरी कलाटणी मिळाली, ती विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने. घाशीरामचा विषय, त्याचे सादरीकरण वेगळ्या पद्धतीचे होते. पाठोपाठ आलेल्या सामना, सर्वसाक्षी, गारंबीचा बापू, एक डाव भुताचा, आक्रित, सरीवर सरी, श्वास या चित्रपटांनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत मानाचे तुरे खोवले. ‘सामना’तील ‘सख्या रे घायाळ मी हरणी’, किंवा ‘कुणाच्या खांद्यावर’ ही गाणी असोत; गारंबीचा बापू चित्रपटातील ‘अजब सोहळा’ किंवा ‘सांज आली दूरातून’ हे शान्ताबाईंचे गाणे असो किंवा ‘सरीवर सरी’तील गजेंद्र अहिरे यांचे ‘सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते’ हे गीत असो, चंदावरकरांचा खास ‘मिडास टच’ त्यांना लाभला आहे.
आरती प्रभूंच्या गीतांना सोपी चाल लावण्यात त्यांचा हातखंडा होता तसाच शान्ताबाईंच्या साध्या सोप्या शब्दातला भावही तितक्याच ताकदीने श्रोत्यांच्या मनावर बिंबविण्याची हातोटी केवळ त्यांचीच होती. मराठी चित्रपटांबरोबरच अरविंद देसाई की अजब दास्ताँ, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है सारखे प्रायोगिक चित्रपट असो, चंदावरकरांनी या चित्रपटांतील प्रत्येक गाण्यावर आपला अमिट ठसा उमटविला आहे. मृणाल सेन यांचा खंडहर, अपर्णा सेन यांचा परोमा, विजया मेहता यांचा रावसाहेब, अमोल पालेकरांचा कैरी, आक्रित या चित्रपटांची नुसती नावे घेतली तरी त्यातील वैविध्य आपल्याला जाणवू शकेल. या सगळ्या दिग्दर्शकांचे वैविध्य जपत आपला ठसा निर्माण करणे तसे अवघड काम होते. मात्र चंदावरकर मुळातच प्रयोगशील असल्याने मिळालेल्या या संधीला पुरेपूर न्याय देत, हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले. ‘श्वास’ने त्यांना राष्ट्रीय सन्मान मिळवून दिला.
संगीत नाटक अकादमीनेही त्यांच्या या प्रयोगशीलतेची दखल घेत त्यांचा गौरव केला. द एलिमेंटस- फायर आणि सिझन्स भाग १ आणि २ हे त्यांचे अल्बमही चांगलेच गाजले. पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये १५ वर्ष त्यांनी अप्लाईड म्युझिक शिकवले. त्यामुळे त्यांच्या संगीतात ताजेपणा आणि प्रयोगशीलता टिकून राहण्यात मदतच झाली. चंदारवरकर आपल्यातून गेले असले तरी ‘सख्या रे..’ ऐकताच त्यातली आर्तता आपले हृदय पिळवटतच राहील, यात शंका नाही.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा