'अक्षरा'चा राखणदार
मुखपृष्ठ, कागद, आकर्षक मांडणी, रंगांचा वापर आदी ‘मेकअप’पेक्षा कसदार, टिकाऊ, उपयुक्त अक्षरसंपदा असलेले साहित्य अधिक महत्त्वाचे, असे मानणारे प्रकाशक गेल्या चार दशकांत कमी-कमी होत गेले. व्यवसायिकतेपेक्षाही धंदेवाईक बनत चाललेल्या प्रकाशनाच्या क्षेत्रात, याच काळात अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आपल्या निष्ठा मात्र बदलल्या नाहीत.
पुस्तक, ग्रंथ चांगले ‘असावे’ की ‘दिसावे’, हा प्रश्न छपाई-तंत्रज्ञानातील सुधारणेच्या काळात उपस्थित होत होता, त्याच सुमारास अनिरुद्ध कुलकर्णी प्रकाशन व्यवसायत स्थिरावत होते. मुखपृष्ठ, कागद, आकर्षक मांडणी, रंगांचा वापर आदी ‘मेकअप’पेक्षा कसदार, टिकाऊ, उपयुक्त अक्षरसंपदा असलेले साहित्य अधिक महत्त्वाचे, असे मानणारे प्रकाशक गेल्या चार दशकांत कमी-कमी होत गेले. व्यवसायिकतेपेक्षाही धंदेवाईक बनत चाललेल्या प्रकाशनाच्या क्षेत्रात, याच काळात अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आपल्या निष्ठा मात्र बदलल्या नाहीत.
लोकप्रिय, सवंग, खपाऊ पुस्तकांचा रतीब घालण्यापेक्षा अभिजात, दर्जेदार साहित्याची निर्मिती करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. सारा देश शेतीकडून शहराकडे धावत असताना शेतक-यांना उपयुक्त अशी किंवा निसर्ग-पर्यावरण याबाबतची पुस्तके प्रकाशित करणे म्हणजे अनेक यशस्वी प्रकाशकांच्या लेखी वेडेपणा होता. पण अनिरुद्ध कुलकर्णी यांनी हा वसा अखेपर्यंत जपला.
मराठी सारस्वतांमध्ये प्रतिष्ठा आणि प्रकाशन क्षेत्रात नामवंत असलेल्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला नावारूपाला आणले, ते अनंतराव कुलकर्णी यांनी. अनिरुद्ध हे त्यांचे चिरंजीव. इंग्रजी साहित्य या विषयात सर्वप्रथम क्रमांकासह पदवी मिळविलेल्या अनिरुद्ध कुलकर्णी यांनी अध्यापनाऐवजी प्रकाशन व्यवसायाकडे वळावे ही अनंतरावांची इच्छा प्रमाण मानून अनिरुद्ध या क्षेत्रात उतरले आणि ४२ वर्षाच्या कारकीर्दीनंतर ६४ व्या वर्षी, अगदी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेऊन गेले. पुण्याच्या स. प. महाविद्यालयामागे कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची देखणी वास्तू आहे. गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यिकांना आणि होतकरू लेखकांना या इमारतीने निवांतपणा आणि आसरा दिला. त्यातूनच अनेक ग्रंथांची भर मराठीत पडली.
साहित्याचे असे माहेरघर असलेल्या या वास्तूत अनंतरावांप्रमाणेच अनिरुद्धही पुरते रमले. दस्तायवस्की असो वा इब्सेन, शिवाजी सावंतांची श्रीकृष्णावरची कादंबरी असो वा उर्दू भाषेचा अभ्यास; अनिरुद्ध इथे तासन् तास वाचताना दिसत. तिथेच विश्रांतीही घेत. आयुष्याच्या अखेरीसही त्यांनी याच चार भिंतींच्या आत, आपल्या लाडक्या पुस्तकांच्या सहवासात, चेह-यावर कृतार्थतेचे, समाधानाचे भाव ठेवून झोपेतच जगाचा निरोप घ्यावा, हा विलक्षण योगायोग आहे. त्यांचे निधन सर्वाना धक्कादायक, चटका लावणारे असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि भावनांना साजेसे होते. आयुष्यभर अभ्यासलेल्या तत्त्वज्ञानाचेही ते रूपक असावे. त्यांच्या, उर्दू शिकण्याच्या, अपूर्ण राहिलेल्या इच्छेबद्दल मात्र त्यांच्या चाहत्यांना रुखरुख वाटत राहील. रशियन भाषेतील मोती वेचण्यासाठी ते त्या भाषेच्या सागरात उतरले होते, तसाच उर्दू जलाशयाचाही तळ त्यांनी गाठला असता.
फ्रेंच व जर्मन वाड्.मयाचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. अशा अक्षर-शोधाचा त्यांच्या प्रवासाचा अनुभव ऐकणे हाही आनंद असे. ‘कॉन्टिनेण्टल’चे कुटुंबीय आता त्यास कायमचे पारखे झाले आहेत. अनिरुद्ध कुलकर्णी यांचा मूळ पिंड अभ्यासकाचा. त्यामुळे प्रकाशनाला व्यावसायिक, किंबहुना धंदेवाईक स्वरूप देणे त्यांना जमले नाही. नामवंत कवींची, लेखकांची मोजकीच, दर्जेदार पुस्तके भारंभरा किंमतीला विकणेही त्यांना शक्य होते; पण ते त्यांनी केले नाही. आपल्या आवडीच्या प्रांताबरोबरच वेगळय़ा, काहीशा उपेक्षित क्षेत्रातील आणि त्यातही नवनवीन, तरुण, होतकरू लेखकांचा शोध ते घेत राहिले. अभ्यासक आणि प्रकाशक अशा दोन्हींचा समन्वय ठेवून त्यांनी अनंतरावांनी दिलेला वारसा अधिक समृद्ध केला. देवयानी ही त्यांची कन्या आता तो तिस-या पिढीतही तितक्याच समरसतेने जपते आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा