डाळ भडकली
तूरडाळीच्या दराने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. साखर, तांदूळ, दूध, भाज्या यांच्याही दरांत प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे लोकांची क्रयशक्ती आधीच कमकुवत झाली आहे. त्यात शासकीय कर्मचारी वगळता सर्वच क्षेत्रात कामगारकपात किंवा वेतनकपातीचे धोरण कठोरपणे राबविले जाते आहे.
वरण -भात त्यावर तुपाची धार आणि पिळलेले लिंबू हा रोजच्या जेवणातला अविभाज्य भाग असल्याचे दिवस केव्हाच इतिहासजमा झाले आहेत. आता सणासुदीलाही ही चैन परवडण्याजोगी राहिलेली नाही. घरी नाही तर किमान उपाहारगृहात जाऊन चवीने ‘दाल तडका’ खाण्याचा शौक पूर्ण करणेही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले आहे. सरकार मात्र महागाई निर्देशांक शून्याच्याही खाली गेल्याचा आनंद साजरा करण्यात मश्गुल आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महागाई निर्देशांक दररोज कोसळतो आहे. सध्या तर तो शून्याच्याही खाली गेला आहे. विकासाचा दरही आपण कायम ठेवल्याचे अभिमानाने सांगितले जाते आहे. मात्र बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने आभाळ गाठले आहे. तूरडाळीचे उत्पादनच कमी झाल्याने दरवाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले जात असले तरी दोन महिन्यांपूर्वी ४० रुपये किलो असलेला तूरडाळीचा दर अचानक १०० रुपये किलोपर्यंत जाण्याचा संबंध तिच्या उत्पादनात घट झाल्याशी लावणे तर्कसंगत वाटत नाही. गेल्या हंगामात ते कमी झाले आहे. तुरीचा हंगाम संपल्या संपल्या उत्पादन नेमके किती कमी झाले आणि किती क्विंटल डाळीची टंचाई भासणार आहे, याचा अंदाज घेतला गेला असता आणि टंचाई भरून काढण्यासाठी काही उपाय केले गेले असते तर ही वेळ आली नसती.
देशाला पहिल्यांदाच दूरदृष्टी असलेला आणि शेतात राबलेला कृषीमंत्री मिळाल्याने असे काही भोगावे लागेल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नसावे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने महागाई वाढते, हा अर्थशास्त्रातला सर्वसाधारण नियम आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असताना कृषीमंत्री मात्र देशात धान्याची कोठारे भरली असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे खरे असेल तर मग महागाई का वाढते, हा प्रश्न उरतोच.
तुरीच्या डाळीच्या दरात झालेली ही अभूतपूर्व वाढ साठेबाजांनी केली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. ती पूर्णत: फेटाळून लावता येत नाही. गेल्याच आठवडय़ात सांगली, कोल्हापूर येथील गोदामांवर छापे टाकून लाखो क्विंटल साखर आणि तांदूळ जप्त करण्यात आले. जप्त केलेली सर्वच्या सर्व साखर बाजारात आणल्यास सध्या ३० रुपयांवर गेलेली साखर २० रुपयांवर येणे सहज शक्य आहे. येत्या दोन महिन्यांत राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्याची महागाई अशीच कायम राहिल्यास त्याचा फटका सत्तारुढ आघाडीला बसू शकतो, एवढे तरी सरकारच्या लक्षात यायला हवे. ते लक्षात न घेता शिधापत्रिकेवर तूरडाळीऐवजी चणाडाळ देण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा सर्वसामान्यांची चेष्टा करणारी आहे. याऐवजी साठेबाजांवर कठोर कारवाई करून महागाई आटोक्यात आणण्याची घोषणा त्यांनी केली असती, तर सामान्यांना किमान मानसिक दिलासा मिळाला असता. व्यापा-यांनी करावयाच्या साठय़ाच्या मर्यादेत काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली वाढही दरवाढीस चालना देणारी ठरली आहे. अजूनही साठेबाजांवर कठोर कारवाई झाली तर दरवाढ नियंत्रणात येऊ शकेल. त्यासाठी इच्छाशक्ती मात्र हवी.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा