पहिले पान | संपादकीय | दखल | महाराणी ते राजमाता

महाराणी ते राजमाता

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

फॅशन आयकॉन, जगातील सौंदर्यवतींपैकी एक, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कट्टर विरोधक, लोकसभेची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकणा-या खासदार, मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणा-या समाजसुधारक अशा विविध भूमिका एकाच आयुष्यात जगलेल्या महाराणी गायत्रीदेवी काल या जगातून निघून गेल्या.

राजघराण्यातील श्रीमंती त्यांनी उपभोगली; तसेच तिहारमधील तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थाने खालसा झाल्यानंतर त्यांच्या राजवैभवाचा अस्त झाला, तरी लोकांच्या मनात राजमाताम्हणून त्यांचे स्थान अबाधित राहिले.

 

एका व्यक्तीच्या जीवनात स्थित्यंतरे तरी किती यावीत, याचेच आश्चर्य वाटावे असे आयुष्य त्या जगल्या. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एकत्र नांदत नाहीत, असे म्हटले जाते. गायत्रीदेवी मात्र त्याला अपवाद होत्या. त्या जितक्या सुंदर होत्या तितक्याच तल्लखबुध्दीही होत्या. रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये त्या बंगाली शिकल्या. इंग्रजी, फ्रेंच या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्या पोलोही उत्तम खेळत. घोडदौड हा तर त्यांचा छंद होता. बाराव्या वर्षी त्यांनी बिबटय़ाची शिकार केली होती. गायत्रीदेवी मूळच्या कूचबिहार संस्थानच्या राजकन्या. त्यांच्या आईने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता कूचबिहारच्या राजपुत्राशी प्रेमविवाह केला होता. ही बंडखोरी गायत्रीदेवींमध्येही होती. त्याच्या पत्रिकेत शकुनाचे अक्षर आल्याने त्यांचे नाव गायत्री ठेवले तरी त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचे रायडर हॅगार्डची शीया  कादंबरीचे वाचन सुरू होते. या कादंबरीची नायिका आयेशा त्यांच्या आईच्या मनात घर करुन होती. आपल्या मुलीचे नाव आयेशाच ठेवायचे, असे त्यांनी मनाशी ठरवून टाकले होते. त्यामुळे गायत्रीदेवी त्यांच्यासाठी शेवटपर्यंत आयेशाच राहिल्या.

 

गायत्रीदेवींनी जयपूरचे राजा सवाई मानसिंग यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यांच्या या विवाहाला घरच्यांकडून विरोध झाला. कारण मानसिंग आणि गायत्रीदेवी यांच्या वयात असलेले अंतर आणि राजा मानसिंगांचे झालेले दोन विवाह. राजा मानसिंगांना त्या जय म्हणायच्या. जयही एक उत्कृष्ट पोलोपटू होते. घोडदौड त्यांनाही प्यारी होती. इंग्लंडमध्ये या दोघांचे प्रेम रुजले आणि बहरलेही. संस्थाने खालसा झाल्यानंतर १९६२ मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या स्वतंत्र पक्षातर्फे त्यांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढविली. या निवडणुकीत झालेल्या एकूण दोन लाख ४६ हजार ५७६ मतदानापैकी एक लाख ९२ हजार ९०९ अशी मते मिळवून त्या विजयी झाल्या आणि गिनीज बुकातील सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक जिंकण्याची पहिली नोंदही त्यांच्याच नावावर जमा झाली. अमेरिकेत त्या गेल्या तेव्हा तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या पत्नीला त्यांच्या या यशाचे कोण अप्रूप होते. १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपली जागा राखली. इंदिरा गांधी यांच्या त्या कट्टर विरोधक. आणीबाणीला त्यांनी केलेल्या टोकाच्या विरोधाने कर चुकविल्याच्या आरोपांवरून त्यांना पाच महिने तिहारच्या तुरुंगात डांबण्यात आले होते.

 जयपूरमध्ये त्यांनी मुलींसाठी शाळा काढली. नेहमी माणसांच्या गराडय़ात वावरणाऱ्या गायत्रीदेवी अखेरच्या दिवसांत एकाकी होत्या. एकुलता एक मुलगा तरुणपणीच त्यांना सोडून गेला होता. गेली ९० वर्षे भरभरुन आयुष्य त्या जगल्या. आयुष्यातले टोकाचे चढउतार त्यांनी सहज स्वीकारले. जे मिळाले त्यात केवळ आनंदच मानला असे नाही तर त्याचाही दुस-याला हेवा वाटेल, असे रुप त्याला दिले. त्यामुळे समाधानाचे भाव त्यांच्या चेह-यावर कायम होते. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0