पहिले पान | दिल से | गंगामृत की प्रदूषित पाणी?

गंगामृत की प्रदूषित पाणी?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

कित्येक वर्ष आपणच कोटी कोटी घाव घालून तिला घायाळ करून टाकलंय. तिला हीन-दीन-क्षीण करून टाकलंय. तिला धरणात अडकवलं, रासायनिक प्रदूषणानं भ्रष्ट केलं. इतके आघात सोसूनही ती मात्र आपल्या धर्माला जागतेय. गंगेच्या कोट्यवधी पुत्रांनी तिची कितीही अवहेलना केली तर ती मात्र कर्तव्याला चुकलेली नाही. आपलं काम ती तितक्याच नेटानं करतेय.

कोट्यवधी भारतीयांना प्रेम आणि श्रद्धा या धाग्यात बांधणारी गंगा नदी. तिच्याकाठी वसली आहे कित्येक शतकांची, युगांची संस्कृती. युगानुयुगं ही गंगामैया तिच्या पुत्रांना पोसते आहे, त्यांच्यावर माया करते आहे. गंगाजलास भारतीय संस्कृतीनं अमृत मानलं आहे. हजारो वर्षांचा तिचा प्रवास आहे. पण आता मात्र ती थकलीय. तिचा अंत करायला आपणच टपलोय. कित्येक वर्ष आपणच कोटी कोटी घाव घालून तिला घायाळ करून टाकलंय. तिला हीन-दीन-क्षीण करून टाकलंय. तिला धरणात अडकवलं, रासायनिक प्रदूषणानं भ्रष्ट केलं. इतके आघात सोसूनही ती मात्र आपल्या धर्माला जागतेय. गंगेच्या कोट्यवधी पुत्रांनी तिची कितीही अवहेलना केली तर ती मात्र कर्तव्याला चुकलेली नाही. आपलं काम ती तितक्याच नेटानं करतेय. ती थकली असली तरी थांबलेली नाही. तिचा हा अविरत प्रवाह कधीही थांबू नये हीच माझी मनोकामना आहे. मी तिच्या वात्सल्यानं भारावलो आहेच, तिच्यावरील आक्रमणानं हताशही झालोय. पण माझा प्रयत्न मी आता थांबवणार नाही. गंगाजल शुद्धीकरणअसो की गंगा नदी बचाव मोहीम’, मी आणि माझा कॅमेरा, आपल्या परीनं काम करतोय. इथं सर्वानाच मोक्ष हवाय, सगळ्यांनाच पापं धुवायची घाई लागलीय. लोकांना पापमुक्त करण्यासाठी हीच गंगामाता राम-कृष्णाच्याही आधीपासून वाहतेय. मग तिचं अमृततुल्य पाणी पिताना ते स्वच्छ नको का? घाणमिश्रीत पाणी आचमन करताना आपल्याला ते जाणवत नाही का? उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल.. जिथं जिथं म्हणून गंगा वस्त्यांच्या संपर्कात आली तिथं तिथं दिसतं ते प्रचंड प्रदूषण आणि कचरा. गंगामैया, गंगादेवी, गंगाजी म्हणत आपण तिला प्रदूषणाच्याच खाईत लोटत आहोत. मला गंगा नदी भावली ती तिच्या सौंदर्यासाठी. पण जसजसा मी फोटो काढत गेलो आणि अभ्यास करत गेलो, तसतसं अधिकाधिक हादरत गेलो. सौंदर्यापेक्षा या नदीला असणारा दु:खाचा काठ मला विशेष जाणवला. बघ किती घाण माझ्या पात्रात साचलीय ते,’ असं म्हणत गंगामाईनंच कोलकात्याला बेल्लूर मठाच्या पाठीमागे काळंभोर झालेलं गंगाजल दाखवलं. त्या वेळी गोमुखला पाहिलेलं निळंशार गंगाजल आठवलं मला. निसर्गाचा चमत्कार पाहून माझ्या डोळ्यातल्या गंगेला महापूर आला होता तेव्हा. पण कोलकात्याचं भीषण पाणी पाहिलं आणि गंगेच्या अवहेलनेनं अक्षरश: रडलो. -हास करणारे कोणी गंगेचे शत्रू नव्हते. सारेच तिचे भक्त. पण जाणते-अजाणतेपणी मोक्षप्राप्तीच्या आंधळ्या कोशिंबिरीत हे भक्तच देवाची अवहेलना करत होते. प्रेतं, जनावरांची कलेवरं, स्मशान घाटावरली राख, हाडं, सांडपाणी, मलमूत्र, रसायनं.. पवित्र मानल्या गेलेल्या गंगेच्या काळजावर अशा विटंबनांचे घाव रोजच्या रोज वाढत चाललेत. या सर्वांना आवरणारा श्रीकृष्ण कुठंच दिसत नाही, दु:ख त्याचंच होतंय. गेली सहा वर्ष मी गंगामय झालोय. कितीदा गंगोत्री, गोमुख, प्रयाग, काशी फिरलोय. हरिद्वारची कावडयात्रा, अलाहाबादचा कुंभमेळा, वाराणशीची देवदिवाळी, पाटण्याची छटपूजा, कोलकात्याचा दुर्गा उत्सव आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटावरील मकर संक्रांतीची गंगासागर यात्रा. सगळीकडं तिची पूजा होताना पाहिली. तिचं पाणी श्रद्धेनं गंगाजल म्हणून प्राशन करणारे कोट्यवधी भाविक त्याच पाण्यात बिनदिक्कत घाणही करताना आढळले. पर्यावरणप्रेमी, देशी-परदेशी जल शास्त्रज्ञ, विश्व प्रकृती निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ), संकटमोचन फाऊंडेशनसारख्या पर्यावरणवादी संस्था धोक्याचे इशारे देऊन थकल्या. देवदिवाळीचे आकाशकंदीलही धोक्याचा लालबावटा दाखवत असावेत, असं वाटायला लागलंय. तरीदेखील गंगानदीच्या प्रदूषणाला रोखणं अवघड झालंय. पण अशक्य नाही, एवढं नक्की. प्रयत्न सुरू आहेत. यशापयश प्रयत्नांवर आणि काळावर अवलंबून आहे, तसंच गंगाकिना-यांवरील लोकांच्या सहभागावरही अवलंबून आहे.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0