बोकोबांचे शेपूट आत
शाहरुखच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अटकाव करण्याची आपली ताकद नाही, हे लक्षात येताच बोकोबांनी मानभावीपणे त्याचा मार्ग खुला करून टाकला. अपरिपक्व नेतृत्त्वामुळे शिवसेनेवर अनेकदा तोंडघशी पडण्याची पाळी आली आहे.
अपेक्षेप्रमाणे जे व्हायचे होते, तेच झाले. डरकाळी फोडण्याचा आव आणलेल्या तथाकथित वाघाने नुसतेच ‘म्याँव’ केले आणि झेप घ्यायच्या वेळी ‘अबाऊट टर्न’ करून चक्क शेपूट घातले. ‘शाहरुख खान याचे घर मुंबईत आहे, हे तो विसरला काय,’ ‘राहुल गांधी यांच्या पणजोबांना मुंबईत बंद गाडीतून फिरायला लागले होते, याची त्यांनी आठवण ठेवावी,’ अशा मवालीछाप गर्भित धमक्या देणा-यांना साधे काळे झेंडे दाखवण्यासाठी शे-पाचशे टाळकीही जमवता आली नाहीत. नरडीचा घोट घेण्याची भाषा करणा-यांचे नेते निषेधाच्या घोषणा देऊन साधी नरडी सुकवण्यासाठीही रस्त्यावर उतरले नाहीत. आपल्या नेहमीच्या नौटंकीला मराठी मुंबईकर आणि महाराष्ट्रातील सुज्ञ जनता विटली आहे, याचे दर्शन पुन्हा एकदा घडले आणि मग ‘देशभक्तीचा ठेका काय शिवसेनेनेच घेतला आहे काय? कशासाठी आमच्या सैनिकांनी डोकी फोडून घ्यायची? कशासाठी रक्त सांडायचे?’ असे कांगावखोर आकांडतांडव केले गेले. ‘शाहरुख खान याने खुशाल चित्रपट प्रदर्शित करावा. शिवसेना त्याला विरोध करणार नाही,’ अशी सपशेल शरणचिठ्ठी लिहून दिली गेली. मुळात, देशभक्ती, मुंबई कोणाची आणि मराठी माणसाचे हित या विषयांचा ‘ठेका’ शिवसेनेकडे कोणी दिला आहे? या तीनही विषयांवर शिवसेनेची कोणतीही शास्त्रशुद्ध भूमिका नाही. आपली (अ)विचारसरणी ज्यांना मान्य असतील, ते देशभक्त, सच्चे मुंबईकर आणि खरे मराठी, बाकी सगळे देशद्रोही, मुंबईचे मारेकरी आणि मराठीचे द्वेष्टे, असा शिवसेनेचा हिटलरी खाक्या आहे. त्याला रस्त्यावर राडे करणा-या माथेफिरू ‘सैनिकां’ची जोड होती आणि पोलिसांची छुपी सहानुभूती होती, तोपर्यंत या वाघोबांच्या डरकाळीत दम होता. राहुल गांधी यांच्या यशस्वी दौ-याने वाघोबांचे कातडे ओरबाडून काढले आणि त्याच्या आत दडलेला मुंबईच्या, मराठीच्या शिंक्याकडे डोळे लावून बसलेला आशाळभूत बोका सर्वाना दिसला. शिवसेनेच्या दंडेलीवर केवळ ‘खबरदार, याद राखा, सोलून काढू, खपवून घेणार नाही’ वगैरे सुके दम भरणा-या आणि प्रत्यक्षात कोणताही चाप न लावता तिची दहशत वाढू देणाऱ्या गृहखात्याला राहुल गांधी यांच्या दौ-यात कडेकोट बंदोबस्ताचे ‘कर्तव्य’ पार पाडावे लागले. तेथेच वाघोबांची निम्मी हवा गेली. उरलेली राहुल यांनी गनिमी काव्याने केलेल्या लोकलप्रवासाने काढून टाकली. एरवी चित्रपट कलावंत आपल्यामुळे चित्रपटाचे नुकसान नको, म्हणून ‘मातोश्री’च्या पायरीवर नाक घासायचे. शाहरुख खान याने ते केले नाही. काहीही झाले तरी आपले मत बदलणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्याने घेतली आणि मांडवलीबहाद्दर सेनेची पुरती गोची झाली. शाहरुख याचे गांधी घराण्याशी असलेले संबंध पाहता त्याच्या चित्रपटाविरुद्धचे आंदोलनही फुसके ठरेल, हे सेनेच्या लक्षात आले. शाहरुखच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अटकाव करण्याची आपली ताकद नाही, हे लक्षात येताच बोकोबांनी मानभावीपणे त्याचा मार्ग खुला करून टाकला. राज्याच्या प्रश्नांची जाण नसलेले अपरिपक्व नेतृत्त्व आणि राज ठाकरे यांची धास्ती यामुळे शिवसेनेवर गेल्या काही दिवसांत अनेकदा तोंडघशी पडण्याची पाळी आली आहे. एखाद्या विषयावर राज हे आपल्याआधी आंदोलन करतील, या भयाने शिवसेनेने फुसकी आंदोलने करून स्वत:चा पोपट करून घेतला आहे. पुराणकाळातील पोपटांमध्ये काही राजांचे जीव असत. आधुनिक काळातील या पोपटावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खूप जीव आहे. जेव्हा जेव्हा हा पोपट स्वकर्माने दांडीवरून खाली आपटतो, तेव्हा तेव्हा त्याला सावरायला, पेरू भरवायला ‘शरदबाबू’ आपुलकीने धावून जातात. रविवारीही त्यांनी तेच केले. काही देशाच्या क्रिकेटपटूंना शिवसेनेचा जो विरोध आहे, तो जणू खूप उपद्रवकारक आहे, असे दाखवण्याचा आणि शिवसेनेच्या ताकदीचा फुटलेला फुगा पुन्हा फुगवण्याचा हा प्रयत्न होता. महागाईच्या मुद्दय़ावर केंद्रात पवारविरोधी वातावरण तापलेले असताना राज्यात काँग्रेसला इशारा देण्याचाही हेतू त्यात स्वच्छपणे दिसतो. मात्र, फुटलेल्या फुग्यात कितीही हवा भरली, तरी ती फुस्सच होते, याचे भान त्यांनी ठेवले तर उत्तम.ंMarathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा