विश्वासार्हतेचे काय?
केवळ अटक टाळण्याच्या उद्देशाने गेला महिनाभर पोलिसांना गुंगारा देत गायब राहिलेले माजी खासदार सज्जनकुमार यांना दिल्ली न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे पोलिसांच्या आणि सीबीआयच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे.
केवळ अटक टाळण्याच्या उद्देशाने गेला महिनाभर पोलिसांना गुंगारा देत गायब राहिलेले माजी खासदार सज्जनकुमार यांना दिल्ली न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे पोलिसांच्या आणि सीबीआयच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. १९८४ सालच्या शिखांविरुद्धच्या दंगलीतील सहभागाबद्दल सज्जनकुमार यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. सज्जनकुमार यांच्याखेरीज स्व. एच. के. एल. भगत आणि जगदीश टायटलर हेही ३००० हजार शिखांच्या निर्घृण हत्याकांडातील आरोपी आहेत. असा सहभाग असूनही टायटलर आणि सज्जनकुमार यांना नवी दिल्लीतील मतदारसंघातून उमेदवारी दिली गेल्याबद्दल मागील निवडणुकीच्या वेळी मोठा गहजब झाला. अखेरीस काँग्रेसने त्यांची उमेदवारी मागे घेतली होती. टायटलर आणि सज्जनकुमार यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु शीखविरोधी दंगलीचे भूत त्यांच्या मानगुटीवरून काही उतरत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात अद्याप शीख समुदायाची निदर्शने अधूनमधून सुरूच असतात. १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावलेले असतानाही सज्जनकुमार हजर झाले नाहीत. उलट सभोवती ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असूनही ते गायब झाले. बिगर जामीनपात्र वॉरंट बजावल्यावरही ते हजर होईनात तेव्हा कोर्टाने सीबीआय आणि पोलिस यंत्रणा कसला तपास करते, अशी पृच्छा करून दोन्ही यंत्रणांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. पोलिस यंत्रणा कार्यक्षम आहे की, नाही यापेक्षाही तिची भूमिका संशयास्पद होती, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. अन्यथा चोख सुरक्षा व्यवस्थेतील आरोपी एकाएकी गायब कसा होऊ शकतो अन् लपंडाव खेळत महिनाभर पोलिस यंत्रणेला झुलवू कसा शकतो? जामीन मिळण्याची खात्री झाल्यानंतरच सज्जनकुमार काल कोर्टात अवतरले आणि त्यांना जामीनही मिळाला हे सारेच तर्कापलीकडचे आहे. पोलिस, गुन्हेगार व राजकारणी यांच्या ‘सख्या’ची अनेक उदाहरणे देता येतील. दीपक मानकर हे पुण्यातील नगरसेवक जमीन बळकाव प्रकरणात आरोपी असूनही बराच काळ अटकेविना होते. मुंबईत मुक्तपणे फिरणाऱ्या मानकरांचा पुणे पोलिस शोध घेऊ शकले नव्हते, हा अलीकडील किस्सा आहे. अशा ‘संगनमता’मुळे पोलिस खात्याची अब्रू जाते याचे भानही राखले जात नाही, हे दुर्दैव आहे. शीख समाजाचे शिरकाण करून सज्जनकुमार यांनी आधीच दुष्कीर्ती मिळविली आहे, त्यापायी त्यांना दुर्जनकुमारच म्हणायला हवे. त्यामुळे पोलिसी यंत्रणांनी त्यांना अप्रत्यक्षपणे मदत करण्याचे थांबवले पाहिजे. तरच पोलिस, सीबीआय आणि न्यायालयांवरील विश्वास पूर्ववत होईल.Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा