PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मुलायमसिंहांची कोलांटउडी मुलायमसिंहांची कोलांटउडी ================================================================================ प्रहार on 13 March, 2010 04:30:00 AM महिला आरक्षणाच्या प्रश्नावर सगळ्यांचाच अंत पाहणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आता स्वत:च उलटले आहेत. राज्यसभेत सादर केल्या गेलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकास राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव आणि संयुक्त जनता दलाचे शरद यादव या तिघा यादवांनी प्रचंड विरोध केला. या विधेयकात दलित, मागास आणि अल्पसंख्याकांसाठी वेगळी तरतूद करावी म्हणजेच महिलांसाठी राखीव करायच्या जागांच्या कोटय़ामध्ये वेगळा कोटा जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घालणा-या, नंतर प्रसार माध्यमासमोर येत हातात हात घालून आपण एक आहोत असे उच्चरवाने सांगणा-या आणि वेळप्रसंगी सरकारला दिलेला बिनशर्त पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणा-या नेत्यांचे मुखवटे दोन दिवसांतच गळून पडायला सुरूवात झाली आहे. आपला विरोध असूनही राज्यसभेत संमत झालेले महिला आरक्षण विधेयक आणि नंतर समाजाच्या सर्व स्तरांतून याबाबत झालेली टीका त्यांच्या वर्मी लागली असावी म्हणूनच महिला आरक्षण विधेयकात मुस्लिम महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी आपण कधी केलीच नव्हती असा विश्वामित्री पावित्रा त्यांनी घेतला आहे. आपण मुस्लिमांचे मसीहा आहोत हे भारतीय जनतेच्या आणि विशेष करुन उत्तरप्रदेशातल्या मतदारांच्या मनावर बिंबविण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर ‘काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी संगनमताने मुस्लिम आणि दलित महिलांना संसद आणि विधिमंडळाबाहेर ठेवण्यासाठी कशी खेळी केली’ हे पटवून देण्याचा प्रयत्न करणारे मुलायमसिंह यांनी चक्क कोलांटउडी घेत प्रसारमाध्यमांनाच तोंडावर पाडायचा प्रयत्न केला आहे. आपण तसे बोललोच नव्हतो, प्रसारमाध्यमांनी खोटा प्रचार केल्याचे मुलायमसिंह आता बरळत असले तरी ज्यांनी वृत्तवाहिन्यांवर त्यांना तसे बोलताना ऐकले आणि पाहिले ते त्यांच्या या बनावाला कसे बळी पडतील? मुलायमसिंह यांचा भले स्वत:वर विश्वास नसेल, लोकांचा मात्र आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मुलायमसिंह यांनी आता ‘मी नाही त्यातली’चा कितीही घोषा लावला तरी जनतेने या चार-दोन दिवसांत जे काही पाहिले आणि ऐकले ते ती कसे विसरील? महिला आरक्षण विधेयक मुस्लिम महिलांच्या विरोधी असल्याचा प्रचार करून मुस्लिम मतदारांची मतपेढी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न मुलायमसिंह यांनी केला. लालूप्रसाद आणि शरद यादव यांनीही मुलायम यांच्या सुरात सूर मिळवले. त्यांचे गाणे मुळातच बेसुरी असल्याने त्याच्याकडे कोणी लक्षच दिले नाही ती बाब बेगळी. आता तर आपला राखीव जागांना विरोध नाही, मात्र राखीव जागांचा प्रश्न पक्षांवर सोडावा आणि महिलांसाठी राखीव जागांचे प्रमाण वीस टक्के असावे अशी आपली भूमिका असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. हीच भूमिका होती तर आतापर्यंत त्यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी या महिलांना का दिली नाही? ते त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा असल्याने त्यांना तशी उमेदवारी देण्याचा पूर्ण अधिकार होता. अमरसिंहांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करून जयाप्रदा यांना निवडून आणले, तसे अनुसूचित जातीच्या दोन महिला प्रतिनिधी राखीव मतदारसंघातून लोकसभेवर गेल्या. पण याच समाजवादी पक्षातर्फे एकही मुस्लिम महिला संसदेत का जाऊ शकली नाही याचाही खुलासा त्यांनी आता करायला हवा. महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरल्यानेच तसा कायदा करण्याची गरज निर्माण झाली. गेल्या चौदा वर्षात तीन वेळा हे विधेयक संसदेत मांडण्याचे प्रयत्न झाले . मात्र यादवांनी त्याचा कायम विरोधच केला,आता या प्रश्नावर भाजपनेही काँग्रेसला मनापासून साथ दिल्याने मतलबी यादवांची यादवी चालली नाही. राज्यसभेत हे विधेयक संमत झाल्याने लोकसभेतल्या १८१ जागा महिलांना द्याव्या लागणारआहेत. म्हणजेच पुढल्या लोकसभेत सध्याच्या १८१ पुरुष सदस्यांना आपल्या मतदारसंघांवर पाणी सोडावे लागणार आहे. महिलांना संसदेत प्रवेश मिळणार यापेक्षा आपल्या हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागणार याचेच त्यांना दु:ख आहे.