मराठी कलावंतांची चित्रपटांच्या प्रसिद्धीकडे पाठच
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आल्याचे चित्र असले तरी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी त्याच चित्रपटातले कलाकार उपलब्ध होत नाहीत, अशी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांची तक्रार आहे.
मुंबई- ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट यशस्वी होतो त्याचे आपण कौतुक करतो. मात्र या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आमीर खान आणि इतर कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतो. मराठीत मात्र कलाकार अशा प्रसिद्धीसाठी मेहनत घेताना दिसत नाहीत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आल्याचे चित्र असले तरी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी त्याच चित्रपटातले कलाकार उपलब्ध होत नाहीत, अशी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांची तक्रार आहे.
निर्माते विजय शिंदे यांच्या ‘बायको झाली गायब’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही तक्रार केली. आज मोठ्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी कलाकार येत असतात. मात्र ज्या प्रमाणात या कलाकारांनी वेळ द्यायला हवा तो दिला जात नाही. अनेक कलाकार शूटिंग संपल्यानंतर त्या चित्रपटाच्या पुढच्या वाटचालीकडे लक्षही देत नाहीत. कलाकारांच्या या अनास्थेचा फटका या व्यवसायाला थोड्याफार प्रमाणात बसतोच. प्रसिद्धीसाठी करायच्या फोटोसेशनला वेळेवर न येणे, एखाद्या वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत जाण्यासाठी किंवा चित्रपटांच्या संबंधित इतर कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित न राहणे, असे प्रकार कलाकारांकडून वारंवार होत आहेत. या बाबी व्यवसायासाठी मारक आहेत, असेही ते म्हणाले.
ही खंत याआधी अनेक निर्मात्यांनी खासगीत व्यक्त केली होती. ही तक्रार त्यांनी चित्रपट महामंडळाकडेही नेली आहे. यावर आता सर्व निर्मात्यांना एकत्र आणून काही उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, असेही सरपोतदार या वेळी म्हणाले. आज चित्रपट प्रदर्शित करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मुंबईसारख्या शहरात चित्रपट प्रदर्शित करून फारसा फायदा होत नाही. चांगल्या प्रकारे चाललेल्या चित्रपटामधून थिएटर मालकांना फायदा होतो, मात्र निर्मात्याला केवळ २० ते २५ टक्के रकमेवर समाधान मानावे लागते. मराठी चित्रपटांची हक्काची व्यवसाय केंद्रे आजही छोट्या शहरांत आहेत. त्यामुळे चित्रपटांच्या जाहिरातींपेक्षा वृत्तपत्रांमधून झालेली प्रसिद्धी फार महत्त्वाची ठरते. अशा वेळेस खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदांनाही कलाकार येत नसल्याने हा खर्चही अनेक वेळा वाया जाण्याची शक्यता असते.
बाहेरच्या पत्रकार परिषदांना तर सोडाच, मुंबई-पुण्यातल्या पत्रकार परिषदांनाही कलाकार येत नाहीत. चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी काही छोट्या शहरांत कार्यक्रम ठेवला तर त्याचा थेट फायदा चित्रपटांना होत असतो. त्याचाही विचार कलाकार मंडळी करत नाहीत. अर्थात, या प्रसिद्धीचा फायदा कलाकारांनाही होत असतो. मात्र प्रसिद्धीकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे मराठी चित्रपटांचे नुकसान होत आहे.आता निर्मात्यांनी कलाकारांबरोबर करार करतानाच त्यात प्रसिद्धीसाठी अमुक दिवस देण्याची अट टाकावी की काय, असा विचार होऊ लागला आहे.
निर्माते विजय शिंदे यांच्या ‘बायको झाली गायब’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेसाठी या चित्रपटाचा नायक विजय पटवर्धन वगळता एकही मराठी कलाकार उपस्थित नव्हता. या चित्रपटात खलनायकाची भूमिका शक्ती कपूर हा हिंदीतला नावाजलेला नट करत आहे. आपली जबाबदारी ओळखून तो मात्र या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, याकडेही अजय सरपोतदार यांनी लक्ष वेधले.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा