पहिले पान | मनोरंजन | मल्टिप्लेक्स | मालवणीच्या गल्लीबोळात भरकटलेला स्ट्रायकर

मालवणीच्या गल्लीबोळात भरकटलेला स्ट्रायकर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

चमकदार कल्पना घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत पॉलिश्ड सिनेमा करणा-या दिग्दर्शकांची एक फळी सध्या कार्यरत आहे. दिग्दर्शक चंदन अरोराचा ‘स्ट्रायकर’ याच पठडीतला सिनेमा आहे. पण कच्चं लिखाण, नीरस कथानक, रोमांचकतेचा अभाव यामुळे स्ट्रायकर डझंट स्ट्राइक अ कॉर्ड विथ ऑडियन्स.

मल्टिप्लेक्स संस्कृती फोफावल्यानंतर व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या चौकटीत विषयांचं वैविध्य आलं, चित्रपट निर्मितीचं तंत्र बदललं, पण एक गोष्ट मात्र कायम राहिली. चित्रपटाचा कणा समजला जाणा-या पटकथेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्याची परंपरा अजूनही सुरू आहे. नव्या पिढीतल्या काही दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षामध्ये ब्रिलियंट सिनेमे दिले. पण त्यांची संख्या वर्षाकाठी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीही नसते. चमकदार कल्पना घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत पॉलिश्ड सिनेमा करणा-या दिग्दर्शकांची एक फळी सध्या कार्यरत आहे. दिग्दर्शक चंदन अरोराचा स्ट्रायकर याच पठडीतला सिनेमा आहे. पण कच्चं लिखाण, नीरस कथानक, रोमांचकतेचा अभाव यामुळे स्ट्रायकर डझंट स्ट्राइक अ कॉर्ड विथ ऑडियन्स.

 

मालवणीसारख्या गजबजलेल्या वस्तीत, गुन्हेगारी विश्वाच्या परिघावर घुटमळणा-या सूर्या सारंगची (सिद्धार्थ) कथा स्ट्रायकर सांगतो. कॅरमसारखा खेळ इथे कथेच्या केंद्रस्थानी आहे. इथल्या असंख्य छोट्या-मोठ्या क्लबमधून कॅरमवर जुगार चालतो. त्याच्या अवतीभवती गुन्हेगारी विश्वाचं जाळं विणलं जातं. सूर्या कॅरमचा उस्ताद आहे. त्याने हे कौशल्य आपला भाऊ चंद्राकडून (अनुप सोनी) उचललंय. अनेक गैरधंदे करणारा जलील (आदित्य पांचोली) सूर्याला आपला खेली बनायला म्हणजे आपल्या बाजूने कॅरम खेळायला सांगतो. सूर्या त्याला नकार देतो. त्याचा मित्र जाहीद (अंकुर विकल) त्याला पुन्हा पुन्हा कॅरमच्या जुगाराकडे वळवतो. त्यातून सूर्या काही पैसेही कमावतो. पण त्याच्याही भोवती गुन्हेगारी पाश आवळायला सुरुवात होते. सूर्याला त्यात अडकायचं नसतं. पण परिस्थिती अकल्पित वळण घेते आणि सूर्यासमोरचे सर्व पर्याय बंद होतात.

 

स्ट्रायकरचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्याचं कथानक दिशाहीन आहे आणि पटकथा सपक. दिग्दर्शक चंदन अरोराने मालवणीचा परिसर, तिथली कनिष्ठ मध्यमवर्ग ते गरिबीच्या मधल्या पट्ट्यात घुटमळणारी सामान्य माणसं, तिथल्या गल्लीबोळात सहज फुलणारं गुन्हेगारी विश्व आणि या गुन्हेगारीच्या जाळ्यात न अडकण्याची तिथल्या माणसांची धडपड चांगली टिपली आहे. छायाचित्रकार पी. एस. विनोदच्या कॅमे-याने या अस्सल मुंबईची स्पंदनं अचूक टिपली आहेत. पण या पलीकडे हा चित्रपट काहीच देत नाही. सिनेमाचा नायक कॅरमचा उस्ताद आहे. चित्रपटाची सारी पूर्वप्रसिद्धी हीच गोष्ट केंद्रस्थानी ठेवून झाली. प्रत्यक्षात चित्रपटात चार-पाच प्रसंग वगळता या पैलूला महत्त्वच नाही. कॅरमच्या स्पर्धाचे जे प्रसंग आहेत, त्यातही उत्कंठा वाढवणारं काहीच नाही. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचत नाही, काळजाचा ठोका चुकत नाही, इतके हे प्रसंग सपक आहेत. कॅरमऐवजी गुन्हेगारी विश्व आणि त्यात न अडकण्याची सूर्याची धडपड यावर चित्रपटाचा बहुतांशी भाग खर्च होतो. कथानकाला १९९२च्या धार्मिक दंगलींची जोड तर संपूर्णत: अनावश्यक आहे.

 

हल्लीचे दिग्दर्शक तंत्राच्या बाबतीत सहसा डावे नसतात. दिग्दर्शक चंदन अरोराही त्याला अपवाद नाही. त्याची विषयाची निवडही वेगळी आहे. पण पटकथेची जाण तोकडी पडली आहे. तो स्वत: या चित्रपटाचा लेखक नसला तरी पटकथा निश्चित करण्यात दिग्दर्शकाचा सहभाग मोठा असतो. त्यामुळे कमकुवत पटकथेचा दोष त्याच्याकडेही जातोच. चित्रपटात असंख्य उपकथानकं आहेत आणि एकाही उपकथानकाचा शेवट विश्वासार्ह नाही.

 

रंग दे बसंतीत कौतुकाचा वर्षाव झालेला सिद्धार्थ ब-याच काळानंतर हिंदी पडद्यावर दिसलाय. चित्रपटाचा संपूर्ण फोकस त्याच्यावर असला आणि त्याची कामगिरी उत्तम असली तरी त्याचा कस लागेल, अशी ही भूमिका नाही. अंकुर विकल छाप पाडतो. आदित्य पांचोलीला प्रदीर्घ काळाने मेनस्ट्रीम चित्रपटात मोठी आणि त्याला साजेशी भूमिका मिळाली असली तरी तिला शेंडा-बुडखा नाही. अनुपम खेरची भूमिकाही अशीच अर्धकच्ची आहे. इतर भूमिकांमध्ये विद्या माळवदे लक्षात राहते. सीमा बिश्वास थेट मालवणीतली बाई वाटते, पण तिच्या वकुबाइतकी ही भूमिका नाही.

 

गुलजार, स्वानंद किरकिरे, जितेंद्र जोशी, प्रशांत इंगोले, नितीन रायकवार आणि ब्लेझ असे सहा गीतकार आणि विशाल भारद्वाज, स्वानंद किरकिरे, अमित त्रिवेदी, शैंलेंद्र बर्वे, युवान शंकर राजा आणि ब्लेझ असे सहा संगीतकार असूनही गाणी सामान्य आहेत.

 एकंदरीत, हा स्ट्रायकरना कॅरमच्या बोर्डावरील सोंगट्या मारायला उपयोगी पडतो, ना प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात.

चित्रपट- स्ट्रायकर

दिग्दर्शक- चंदन अरोरा

संगीतकार- विशाल भारद्वाज, स्वानंद किरकिरे, अमित त्रिवेदी, शैलेंद्र बर्वे, युवान शंकर राजा आणि ब्लेझ

कलाकार- सिद्धार्थ, अंकुर विकल, अनुपम खेर, विद्या माळवदे, आदित्य पांचोली

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0