पहिले पान | मनोरंजन | मल्टिप्लेक्स | देर आए नादुरुस्त आए

देर आए नादुरुस्त आए

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

‘प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो’ हे सूत्र आता इतकं घिसंपिटं झालं आहे की, या चित्रपटांमधलं नावीन्य आता पूर्णत: संपून गेलं आहे. जोपर्यंत कल्पक लेखक या विषयावर आधारित नावीन्यपूर्ण पटकथा घेऊन येत नाही, तोपर्यंत असे चित्रपट पाहताना, हे यापूर्वीच आपण बघितलं, असं सातत्याने वाटणं (देजा वू) स्वाभाविक आहे. ‘माय नेम इज खान’चा नेमका तोच प्रॉब्लेम आहे.

इस्लामी दहशतवादावर आधारित मुख्य धारेतल्या हिंदी व्यावसायिक चित्रपटांचं स्वरूप आता ठरून गेलेलं आहे. समाजाच्या पूर्वग्रहदूषित नजरेची सामान्य मुस्लिम माणसाला बसणारी झळ, त्यातून कोणाचं तरी दहशतवादाकडे वळणं आणि प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतोहे सूत्र आता इतकं घिसंपिटं झालं आहे की, या चित्रपटांमधलं नावीन्य आता पूर्णत: संपून गेलं आहे. जोपर्यंत कल्पक लेखक या विषयावर आधारित नावीन्यपूर्ण पटकथा घेऊन येत नाही, तोपर्यंत असे चित्रपट पाहताना, हे यापूर्वीच आपण बघितलं, असं सातत्याने वाटणं (देजा वू) स्वाभाविक आहे. माय नेम इज खानचा नेमका तोच प्रॉब्लेम आहे. चित्रपट वाईट किंवा टाकाऊ नाही. पण तो जवळपास तीन-चार वर्ष उशिरा आला आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षातच न्यूयॉर्क’, ‘कुर्बान’, ‘शूट ऑन साइटहे साधारण याच विषयावरचे चित्रपट येऊन गेल्यामुळे माय नेम इज खानमधलं नावीन्य संपून जातं. चित्रपट केवळ शाहरुख खानच्या अदाकारीसाठी पाहण्यापुरता उरतो आणि ज्या चित्रपटाच्या शेवटी केवळ प्रमुख कलाकाराचा अभिनयच प्रामुख्याने लक्षात राहणार असेल तर तो चित्रपट फार काही ग्रेट आहे, असं म्हणता येणार नाही.

 

रिझवान खान (शाहरुख खान) हा ऑटिझमचा रुग्ण आहे. आईच्या निधनानंतर तो अमरिकेत आपला भाऊ झहीर (जिमी शेरगील) याच्याकडे येतो. आपल्या भावाच्या कंपनीचा सेल्समन म्हणून काम करताना त्याची ओळख मंदिराशी (काजोल) होते आणि तिचा घटस्फोट झालाय, तिला एक मुलगा आहे हे माहिती असतानाही रिझवान तिच्याशी लग्न करतो. सगळं सुखात चाललं असताना ११ सप्टेंबर २००१चा दहशतवादी हल्ला होतो आणि चित्र पालटतं. मुसलमानांकडे बघायची नजर बदलते. मंदिरा आणि तिच्या मुलगा समीर याला हा बदल जाणवायला लागतो. एक दिवस खान कुटुंबाला या बदललेल्या परिस्थितीचा थेट फटका बसून त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो, हे सिद्ध करण्यासाठी रिझवान घराबाहेर पडतो.

 

करण जोहरने पहिल्यांदाच इतक्या गंभीर विषयाला हात घातला आहे आणि त्याने हा विषय पुरेशा गांभीर्याने हाताळला असला तरी व्यावसायिक गल्लाभारू चित्रपट करण्याच्या सवयीने अंगात मुरलेला फिल्मीपणा माय नेम इज खानमध्येही अधूनमधून डोकावतो. याचमुळे ऑटिझमचा रुग्ण असलेल्या शाहरुखला पूर्णत: डीग्लॅमरस, नॉनफिल्मी दाखवायचा की, त्याला लार्जर दॅन लाइफ स्वरूप द्यायचं, या गोंधळात तो पडलाय. परिणामी काही प्रसंगांत शाहरुख भूमिकेशी प्रामाणिक आहे तर काही प्रसंगात तो फिल्मी नायक वाटतो. गो-या अमेरिकनांच्या संशयित नजरांच्या पार्श्वभूमीवर रिझवानला काळ्या निग्रोंकडून मिळणारं प्रेम हा घटकही फिल्मी झाला आहे. काजोलची एण्ट्री आणि चित्रपटाचा शेवटही याच फिल्मीपणाचे बळी ठरले आहेत. काजोल आणि शाहरुखमधलं भांडण जो या चित्रपटाचा टर्निग पॉइंट आहे, तेही कृत्रिम वाटतं.

 

काही काही प्रसंग प्रभावशाली आहेत. सुरुवातीलाच विमानतळावरचा रिझवानच्या झडतीचा प्रसंग अंगावर येतो. उत्तरार्धात मशिदीत तरुण मुलांना भडकवणा-या एका माथेफिरू मुस्लिम डॉक्टरचा खोटेपणा रिझवान उघड करतो, तो प्रसंगही लाजवाब आहे. करण जोहरची हाताळणी संयत आहे. चित्रपट पूर्णत: मुस्लिमांची कड घेऊनही तो बटबटीत होऊ न देण्यात करण यशस्वी ठरतो. पण नावीन्याचा अभाव, लांबलेला शेवट, शेवटाला जोडलेलं वादळाचं लांबलचक उपकथानक आणि सामान्य रिझवान खानला हिरो करण्याचा अट्टहास यामुळे चित्रपटाचा परिणाम शेवटाकडे जाताना पूर्णत: पुसला जातो. वादळाचा ट्रॅक तर पूर्णत: फिल्मी आणि हास्यास्पद आहे.

 

रिझवान खानच्या व्यक्तिरेखेबाबतही करणला आपल्या भूमिकेत सातत्य राखता आलेलं नाही. रिझवान खानच्या व्यक्तिरेखेत शाहरुख असल्यामुळे ऑटिझमग्रस्त असूनही त्याला मधूनच लार्जर दॅन लाइफ करण्याचा मोह करणला टाळता आलेला नाही. अशा अनेक प्रसंगांत शाहरुखचा रिझवान आपल्या भूमिकेची वस्त्र उतरवून ठेवतो. ऑटिझमग्रस्त रुग्ण नेमके कसे वागतात, त्यांच्या शारीरिक हालचाली कशा असतात, हे नेमकं सांगता येणार नाही. पण इथे मुद्दा तो नाहीच. इथे शाहरुखने आपला आजार दाखवण्यासाठी ज्या शारीरिक हालचाली स्वीकारल्या आहेत, उदा. मान तिरकी करणं, थेट नजरेला नजर न देता अज्ञातात बघणं, या गोष्टी तो मध्येच सोडून देतो आणि हिरोगिरी करायला मोकळा होतो. एवढा एक अपवाद वगळता शाहरुखने भूमिकेचं बेअरिंग उत्तम सांभाळलंय. स्वदेस’, ‘चक देया चित्रपटांमध्ये दिग्दर्शकांनी ज्याप्रमाणे त्याचा शाहरुखपणाखरवडून त्याच्यातल्या अभिनेत्याला बाहेर काढलं होतं, तसा प्रयत्न त्याने इथे केलाय. त्यात तो काही वेळा यशस्वी होतो, काही वेळा नाही.

 

शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री नेहमीप्रमाणेच भन्नाट आहे. पण काजोलची भूमिका म्हणावी तशी दमदार नाही. उत्तरार्धात तर तिला फारच मर्यादित वाव आहे. तिच्या अभिनयाबाबत नेहमीप्रमाणेच काही प्रश्न नाही. या दोन प्रमुख व्यक्तिरेखा वगळता इतर कलाकारांच्या भूमिका तोंडी लावण्यापुरत्या आहेत. त्यात रिझवानच्या आईच्या भूमिकेत झरिना वहाबने सुरेख काम केलं आहे. जिमी शेरगिल, रफिक झकेरिया आणि अनेक परदेशी कलावंतांचं काम ठिकठाक आहे.

 

करण जोहरचा चित्रपट असूनही यात गाण्यांचा उच्छाद नाही. एकच गाणं सातत्याने पार्श्वभूमीवर वाजतं आणि चित्रपट पाहताना ते ऐकण्यापुरतं बरं वाटतं. त्याचे शब्द आणि चाल नंतर मात्र लक्षात राहात नाही. शंकर-एहसान-लॉयची कामगिरी निराशानजक आहे. निरंजन अय्यंगारचे संवाद प्रभावी आहेत. रवी के. चंद्रनने सॅन फ्रॅन्सिस्को, वॉशिंग्टनबरोबरच आतापर्यंत हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर न आलेली अमेरिकाही चांगली टिपली आहे.

 

एकंदरीत, ‘माय नेम इज खानहा करण जोहरपुरता वेगळा चित्रपट असला तरी विषयाच्या पातळीवर फारसं नावीन्य त्यात आता राहिलेलं नाही. त्यात चित्रपटात असंख्य दोष आहेत. त्यामुळे देर आए नादुरुस्त आएअशी त्याची गत झाली आहे. पण, विषयाचं गांभीर्य पूर्णपणे समजून व्यावसायिक दबावांकडे दुर्लक्ष करण्याचं धाडस करणने दाखवलं तर तो खरोखर एक चांगला चित्रपट देऊ शकेल, असा विश्वास मात्र माय नेम इज खानदेतो.

 

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0