न विसरण्याजोगं विचारनाट्य
‘झालं गेलं विसरून जाऊ’ हे त्यांचं ‘राजन क्रिएशन्स’ने व्यावसायिक रंगमंचावर आणलेलं नाटक. ‘डावेदार’ या नावाने त्याचं लेखन झालं होतं. ‘झालं गेलं..’ हे त्याचं व्यावसायिक नामकरण. खरं तर ‘डावेदार’ या नावातून नाटकाचा, लेखकाला अपेक्षित असणारा विषय सूचित होतो, तसा तो व्यावसायिक नामकरणातून होत नाही.
‘इतिहास’सारखी एकांकिका, ‘दिनकर पुरोहिताचा खून’ ते ‘ढोलताशे’, ‘इराक’, ‘जणू काही वास्तव’पर्यंतच्या नाटकांतून लेखक चंद्रकांत प्रभाकर देशपांडे यांनी वैचारिक संघर्ष दिला. त्यांची स्वत:ची अशी स्वतंत्र लेखनशैली आहे. त्यांच्या नाटकातील चर्चेचा विषय मांडून झाला की ते त्याच्या वेगवेगळ्या अंगानं विचार करतात आणि सरतेशेवटी प्रेक्षकांच्या विचारार्थ एक दिशा देतात. प्रेक्षकांच्या विचारांना मार्गस्थ करण्याची त्यांची ही लेखनखुबी त्यांच्या सा-याच नाटकातून दिसते.
‘झालं गेलं विसरून जाऊ’ हे त्यांचं ‘राजन क्रिएशन्स’ने व्यावसायिक रंगमंचावर आणलेलं नाटक. ‘डावेदार’ या नावाने त्याचं लेखन झालं होतं. ‘झालं गेलं..’ हे त्याचं व्यावसायिक नामकरण. खरं तर ‘डावेदार’ या नावातून नाटकाचा, लेखकाला अपेक्षित असणारा विषय सूचित होतो, तसा तो व्यावसायिक नामकरणातून होत नाही. मात्र नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना ‘झालं गेलं..’ नावातील श्लेष त्यातील अध्याहृत अर्थ, त्यामागचा आशय लक्षात येतो.
नाटकात घटना कशी प्रत्यक्ष घडत नाही. मुळात ‘घटनात्मक’ नाटकाचा लेखकाचा पिंडच नाही. त्यामुळं इथं, घडून गेलेल्या ‘घटने’वर चर्चा ‘घडते’ आणि त्यातून जे परिणाम होतात, त्यात ‘नाट्य’ आहे बरं, चं. प्र. देशपांडे त्या ‘नाट्या’ला वरवरचं न हाताळता, त्याच्या गाभ्याशी, त्याचा कार्यकारणभाव, त्याची सत्यासत्यता, त्याचं गुणात्मक महत्त्व.. अशा सा-या दृष्टीनं शोधू पाहतात. त्यामुळे कथानकापेक्षा नाटकात वैचारिक संघर्ष, चर्चा येते. त्या चर्चेतही एक तार्किक सुसंगती असते, म्हणून ती पटण्याजोगी होते.
हेमंत-स्मिता हे पतीपत्नी, वयस्कर. त्यांना दोन मुलगे, दोन्ही मोठे, सुस्थितीत. भास्कर हा हेमंतचा मित्र. हे सारे साम्यवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते. पुरोगामी विचारसरणीचे, पुंजीवादाच्या विरोधात असणारे, चंगळवादाच्या विरोधी भूमिका घेणारे, धर्म, संस्कार, जात-पात, वर्ग-स्तर न मानणारे, पुढारलेले. रोहिणी ही तरुणी, लग्न करताच एकत्र संसार करणारी. दोघांनाही परस्परांच्या संमतीनं मुलही होऊ दिलंय. तिच्या या ‘लग्नसंस्थे’ला आव्हान देणा-या संबंधास, नात्यास हेमंत-स्मिताचा पाठिंबा, हा एक भाग.
‘झालं गेलं..’चा केंद्रबिंदू आहे ती घटना म्हणजे, हेमंतच्या अनुपस्थितीत भास्कर आणि स्मिताचं एकत्र येणं आणि त्यातून मुलाचा जन्म. धाकट्याचा, हेमंतला तो आपलाच मुलगा वाटतो. भास्करनं आपल्या पत्नीला घटस्फोट दिलाय. मुलांना बेदखल केलंय. त्याची पंचाहत्तर लाखांची स्थावरजंगम मालमत्ता त्याला स्मिताच्या धाकटय़ाच्या नावावर करायचीय. पण त्यासाठी त्याला खात्री करून घ्यायचीच, की तो आपलाच मुलगा आहे त्यासाठी डीएनए टेस्ट करायचीय.
स्मिताला माहितीय, की धाकटा तिला भास्करपासूनच झालाय. पण हेमंतपासून तिनं ते लपवून ठेवलं होतं. आता मात्र तिला या कृत्याची कबुली हेमंतपाशी द्यायचीय आणि स्वत:ची ‘सुटका’ करून घ्यायचीय. त्यासाठी हेमंतनं तिला माफ करायला हवंय, उदार अंत:करणानं, कारण हे सारे पुरोगामी विचाराचे. पण तिनं हे कबूल करताच हेमंतचा ‘पुरुषी अहंकार’ दुखावतो. तिनं प्रतारणा केली असं त्याला वाटतं आणि तिला क्षमा करण्याचंच तो नाकारतो. पुरोगामी विचार, साम्यवादाची तत्त्वं, पुढारलेले विचार.. या साम्यांचाच वैयक्तिक पातळीवर पराजय होतो. समष्टीला आदर्श जीवनाचे धडे देणारे, सारी समाजव्यवस्थाच मुळापासून बदलू पाहणारे, रशियाला ‘आदर्श’ मानणारे झापडबंद विचारवंत वैयक्तिक आयुष्यात मात्र सनातन पुरुषांप्रमाणेच वागतात. स्मितासारखी स्त्रीदेखील प्रथम कौटुंबिक सौख्य, सुरक्षितता पाहते. रोहिणीच्या नव-यानं तिला नाकारणं हेदेखील पुरुषी अहंकाराचंच रूप.
चं. प्र. देशपांडे इथं वैचारिक दांभिकता, विचार प्रत्यक्षात उरवण्यातील त्यांची ढोंगी वृत्ती दाखवतानाच, तत्त्व, नीतिमत्ता, आदर्श नेमके कोणते? वैश्विक, सार्वकालिक अशी तत्त्वं, आदर्श, नीतिमूल्यं असतात का? एखाद्या चुकीनं मानवी नातेसंबंधात होणारे बदल, त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम, समाजावर होणारे परिणाम यांची चर्चा करतात. स्त्री-स्वातंत्र्य अथवा व्यक्तिवाद यापेक्षा प्रस्थापित कुटुंबसंस्था संस्कार याचं वरचढपण आणि देशकाल परिस्थितीसापेक्ष विचार/तत्त्व/आदर्श यांचा नव्यानं विचार करतात आणि त्या अनुषंगानं प्रेक्षकांनाही त्या दिशेनं विचारास प्रवृत्त करतात.
दिग्दर्शक गिरीश पतके यांनी या वैचारिक संघर्षाचा तोल नाटकभर छान सांभाळला आहे. पात्रांच्या हालचाली बांधताना, जागा ठरवताना दृश्यात्मकतेबरोबर नाटकाचा विचारांकडे, शब्दसंवादांकडे प्रेक्षकांचं लक्ष राहील, याची दक्षता त्यांनी घेतलीय म्हणूनच वैचारिक चर्चेवेळी पात्रांना त्यांनी कमी हालचाली दिल्यात. पात्रांचं ग्रुपिंग, परस्परसंबंध, त्यातील तणाव त्यांनी लक्षणीयरीत्या टिपलेत. (उदा. स्मिताचा हात हेमंतनं झिडकारणं) प्रयोगासही दिलेली गती, लय वैचारिक नाट्यास साजेशी.प्रकाश मयेकरांचं नेपथ्य हेमंतची आर्थिक सुस्थिती दर्शवणारं. त्यांच्या विचारांचा ढोंगीपणा स्पष्ट करणारं, श्रीमंती थाटाचं (अगदी ‘बार’सहित). चंगळवादी, शीतल तळपदेंची प्रकाशयोजना सुविहित, कालसंदर्भ देणारी. राहुल रानडे यांचं पार्श्वसंगीत त्या-त्या प्रसंगास पोषक, प्रेक्षकांसाठी नेमका रसपरिपोस करणारं. समुखी पेंडसे यांनी केलेल्या वेशभूषेतून पात्रांची ‘आवड’, ‘चैन’ स्पष्ट होणारी (आणि ती त्यांच्या पुरोगामीपणाच्या विचारांशी विसंगत.) केवळ चार कलांवतांच्या माध्यमातून चं. प्र. देशपांडेंनी आपले विचार स्पष्ट केलेत. त्यांच्या संवादात इतका बंदिस्तपणा आहे की एखादा साधा शब्दही कलावंतांना आपल्या पदरचा घालता येत नाही.
ही संवादाची, भाषेची ताकद ओळखून सा-याच कलावंतांनी भूमिका सुरेख केल्या. प्रदीप वेलणकरांनी पुरोगामी विचारवंत, ते ‘अहंकार’ दुखावलेला ‘पुरुष’ यातील तफावत आणि पती, बाप, मित्र यातील बदलत्या नातेसंबंधांच्या वेळची मनोवस्था छान दाखवली. गिरीश साळवींनी दांभिक पुरोगामी, स्वार्थ साधणारा पुंजीवादी, चंगळवादी पुरुष बारकाव्यांनिशी, भूमिकेची धारणा सबंध प्रयोगभर ठेवून झकास साकारला. त्यांनी उतरत्या वयातील चालणं, बोलणं, पाहणं लाजवाब. आभा वेलणकर यांची स्मिताही पुरोगामी आणि पारंपरिक सुरक्षा पाहणारी ‘स्त्री’च उभी केली. सीमा घोगळेंची रोहिणी ठीक. नाटकाचं नाव जरी ‘झालं गेलं विसरून जाऊ’ असलं, तरीही हे एक न विसरण्याजोगं वैचारिक नाटक आहे, अवश्य पाहण्याजोगं!
नाटक- झालं गेलं विसरून जाऊनिर्माते- राजन वेलणकरदिग्दर्शक- गिरीश पतकेलेखक- चं. प्र. देशपांडेनेपथ्य- प्रकाश मयेकरकलाकार- गिरीश साळवी, सीमा घोगळे, आभा वेलणकर, प्रदीप वेलणकर


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा