PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, 65 ठार पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, 65 ठार ================================================================================ पीटीआय on 09 July, 2010 02:45:00 PM इस्लामाबाद/पेशावर- पाकिस्तानच्या आदिवासी भागातील एका गावात शुक्रवारी सरकारी कार्यालयाला लक्ष्य करून झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 65 जण ठार झाले, तर 110 जखमी झाले. याकाघुंद गावातील या सरकारी कार्यालयाजवळच बाजार असल्यामुळे शेकडो लोकांची वर्दळ होती. मोटारसायकलवररून आलेल्या आत्मघाती हल्लेखोराने सरकारी कार्यालयाबाहेर स्फोटकांनी स्वतःला उडवून दिल्याचे, घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले. या हल्ल्यात 65 जण ठार झाले, 110 जखमी झाले, असे या भागातील वरिष्ठ सरकारी अधिकारी अमजद अली खान यांनी सांगितले. जखमींवर पेशावर येथील लेडी रीडिंग रुग्णालयात उपचार चालू आहेत, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल हमीद आफ्रिदी यांनी सांगितले. या कार्यालयाजवळच कारागृह आहे. हल्ल्यामध्ये या कारागृहाचे तसचे आसपासच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले. अनेक इमारती कोसळल्या असून त्याखाली अनेकजण अडकले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांनी संबंधित भागाला वेढा घातला असून मदत आणि बचावकार्य जोरात चालू आहे. स्थानिक शांतता समितीचे तसेच तालिबानविरोधी संघटनेचे अधिकारी शुक्रवारी सरकारी अधिका-यांना भेटायला याकाघुंदला आले होते. त्यांना लक्ष्य करूनच हा हल्ला झाला असावा, असा कयास आहे. अर्थात आत्तापर्यंत कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पाकिस्तानी लष्कराने गेल्या अनेक दिवसांपासून तालिबानींविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी एका सुरक्षा ठाण्यावर हल्ला करून निमलष्करी दलातील अधिका-यांचे अपहरण केले होते. गेल्याच आठवड्यात लाहोर शहरातील एका सूफी प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यात 45 जण ठार, तर 180 जण जखमी झाले होते.