PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अमेरिका-रशियाकडून गुप्तहेरांची अदलाबदल अमेरिका-रशियाकडून गुप्तहेरांची अदलाबदल ================================================================================ पीटीआय on 09 July, 2010 10:00:00 PM मॉस्को/वॉशिंग्टन- आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया यांचे संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. सोव्हिएत युनियनची शकले होऊनही अमेरिका आणि रशिया यांच्यात चढाओढ सुरूच आहे. पण गुरुवारी एक ऐतिहासिक घटना घडली. अमेरिकेने आपल्या ताब्यात असलेल्या रशियाच्या 10 गुप्तहेरांची रवानगी रशियात केली असून त्या बदल्यात रशियाने अमेरिकेचे चार गुप्तहेर अमेरिकेत धाडले आहेत. या घटनेमुळे उभय देशांमध्ये आता संशयाऐवजी विश्वासाचे पर्व सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेला भेट दिली होती. या भेटीत गुप्तहेरांच्या अदलाबदलीचा एक ‘विश्वास करार’ या दोघांमध्ये झाला होता. याची सुरुवात म्हणून बराक ओबामा यांनी आपल्या आलिशान लिमोझिन गाडीतून मेदवेदेव यांच्यासोबत वॉशिंग्टन ते व्हर्जिनिया असा प्रवास करून त्यांच्यासोबत जेवण घेतले होते. या मैत्रीपूर्ण भेटीचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया अमेरिका आणि रशियन सरकारने दिली आहे. या विश्वास करारानुसार अमेरिकेत काम करणा-या रशियाच्या 10 गुप्तहेरांना गुरुवारी एका विमानाद्वारे व्हिएन्ना येथे पाठवण्यात आल. तर अमेरिकेसाठी काम करणा-या चार रशियन एजंटांना व्हिएन्नात पाठवण्यात आले होते. व्हिएन्नातून हे सर्व हेर नेमके कोणत्या ठिकाणी जाणार आहेत, याची माहिती मात्र उघड करण्यात आलेली नाही. पण या घटनेचे वृत्तांकन ऑस्ट्रियन दूरचित्रवाहिन्यांवरून थेट करण्यात आले होते. विमानतळावर दोन्ही देशांची विमाने उभी होती. पण प्रत्यक्षात गुप्तहेरांच्या हस्तांतराचे चित्रण मात्र या वेळी दूरचित्रवाहिन्यांना मिळाले नाही.