PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक ================================================================================ पीटीआय on 29 August, 2010 10:40:00 PM जाकार्ता- इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील सुमारे चारशे वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेल्या ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाल्याने या परिसरातील हजारो रहिवाशांना स्थलांतर करावे लागले. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हवेत धूर आणि राखेचे लोट उठलेले दिसत होते. संपूर्ण परिसरावर जणू जाड, काळ्या धुराची चादर अंथरल्याचा भास होत होता. सिनाबंग असे या ज्वालामुखीचे नाव असून त्याच्या उद्रेकानंतर इंडोनेशिया सरकारने अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा उद्रेक सध्या तरी धोकादायक दिसत असून त्यामुळेच आता धोक्याचा सर्वोच्च इशारा दिल्याचे ज्वालामुखी आपत्ती सूचना केंद्राचे प्रमुख सुरोनो यांनी सांगितले. ज्वालामुखीच्या विवरापासून सुमारे सुमारे दीड हजार मीटर (पाच हजार फूट) उंच अवकाशात धूर आणि राख पसरलेली आहे. गेल्या चारशे वर्षापासून सुप्त असलेल्या या ज्वालामुखीत शुक्रवारपासूनच काही घडामोडी दिसून येऊ लागल्या होत्या, असे सुरोने यांनी सांगितले. या घटनेनंतर आमचे पथक जिल्हा आणि प्रांतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करत आहे. सध्या तरी ज्वालामुखीपासून सहा किलोमीटरच्या परिसरात येणा-या गावांतील 12,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. आकाशात फेकली गेलेली राख सुमारे 30 किलोमीटर अंतरापर्यंत विखुरली गेली आहे. या परिसरातील शेतक-यांचे विस्थापन केले असले तरी त्यांच्या शेतातील पिकांवर ही राख साचून राहिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ं