अमेरिकी रहिवाशांचा कुराण दहनाला विरोध
अमेरिकेवर नऊ वर्षापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध म्हणून फ्लोरिडा येथील एका चर्चच्या फादरने केलेल्या कुराण दहनाच्या घोषणेचा अमेरिकेच्या सर्वच थरांतून विरोध होत आहे. मात्र या विरोधाला न जुमानता दहन करणारच अशी अडेलतट्ट भूमिका या फादरने घेतली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेवर नऊ वर्षापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध म्हणून फ्लोरिडा येथील एका चर्चच्या फादरने केलेल्या कुराण दहनाच्या घोषणेचा अमेरिकेच्या सर्वच थरांतून विरोध होत आहे. मात्र या विरोधाला न जुमानता दहन करणारच अशी अडेलतट्ट भूमिका या फादरने घेतली आहे.
रिपब्लिकन नेते आणि अलास्का प्रांताच्या माजी गव्हर्नर सारा पालिन यांनी फेसबुक आणि ट्विटरवर फादर टेरी जोन्स यांच्या या घोषणेचा निषेध केला असून हे कृत्य चिथावणीखोरीचे आहे. ‘ग्राउंड झिरो’जवळ मशीद उभारण्याच्या प्रस्तावाशीच या घोषणेची बरोबरी होऊ शकेल, असे मत नोंदवले आहे. या कृत्यामुळे अमेरिकेतील धार्मिक सामंजस्यच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ही चिथावणीखोरीची कृती करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनीही या प्रस्तावावर टीका केली. अफगाणिस्तानात अमेरिकी फौजांचे नेतृत्व करत असलेले जनरल डेव्हिड पेट्रॉस यांनीही या घोषणेचा निषेध केला व जोन्स यांच्या या कृतीमुळे अफगाणिस्तानात कार्यरत अमेरिकी सैन्यासमोर आणखी अडचणी निर्माण होऊ शकतील, असे मत व्यक्त केले. या फादरचे केवळ 50 पाठीराखे आहेत. त्यामुळे हा फादर अमेरिका किंवा अमेरिकी नागरिक किंवा अमेरिकेतील धार्मिक अथवा राजकीय नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे क्लिंटन यांनी स्पष्ट करून त्याच्या या कृत्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नसेल, असे सांगितले.
अमेरिकेच्या परराष्ट्र समितीचे अध्यक्ष हॉवर्ड बेरमन यांनीही टोरी जोन्सच्या या कृतीमुळे अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूलभूत तत्त्वालाच धक्का बसेल, अशी भीती व्यक्त केली. अमेरिकी सैन्यादलाचे मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते कर्नल डेव्हिड लापान यांनीही या कृतीचे विपरित परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली. एकीकडे या कृत्याला अमेरिकेतून विरोध होत असताना, न्यू यॉर्कचे महापौर ब्लूमबर्ग यांनी मात्र ही कृती चुकीची असली तरी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून टोरी जोन्स यांना परवानगी द्यावी लागेल, असे मत नोंदवले.
भारताकडून निषेध
नवी दिल्ली- कुराणाचे दहन करण्याच्या योजनेचा भारताने धिक्कार केला असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी अमेरिकी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्या, असे आवाहन केले आहे. 11 सप्टेंबर रोजी कुराणाचे दहन करण्याची घोषणा फादर टेरी जोन्स यांनी केली आहे. मात्र भारतीय माध्यमांनी शांतता आणि सलोखा अबाधित राखण्यासाठी या घटनेच्या वार्ताकनापासून दूर रहावे, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिला. स्वत:ला धर्मगुरू म्हणवणा-या व्यक्तीकडून होणारी ही कृती पूर्णत: निंदनीय आहे, अशी टीकाही त्यांनी एका पत्रकात केली आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा