थाने वादळ शमले
दक्षिण भारताच्या किनारपट्टीला शुक्रवारी थाने चक्रीवादळाने झोडपल्यानंतर शनिवारी वादळ शमले असून या वादळात 33 जणांचा बळी गेला आहे.
रामेश्वरम / तिरुअनंतपूरम- दक्षिण भारताच्या किनारपट्टीला शुक्रवारी थाने चक्रीवादळाने झोडपल्यानंतर शनिवारी वादळ शमले आहे. या वादळात 33 जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे 20 हजार लोकांना मदत शिबीराचा आश्रय घ्यावा लागला आहे. शुक्रवारच्या चक्रीवादळानंतर शनिवारी केरळला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे तीन जणांचे बळी गेले आहेत. तर मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. वादळामुळे केरळात पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसामुळे नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर पाणी पडले आहे.दरम्यान, वादळाचा तडाखा बसलेल्या भागात मदतकार्याला वेग आला असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
वादळाचा सर्वाधीधिक तडाखा बसलेल्या तामिळनाडूतील कुद्दालेर जिल्ह्यात आणि पद्दुचेरीमध्ये मदत कार्याला वेग आला आहे. तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कुद्दालेर जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष आणि विजेचे खांब उन्मूळून पडले आहेत. जीवनावश्यक गोष्टींचीही तिथे कमतरता जाणवत आहे. सध्या 60 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच खाद्यपदार्थही पुरवण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांकडून मदत कार्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. येत्या एक-दोन दिवसात जनजीवन सुरळीत होईल असा विश्वास अधिका-यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि इतर गोष्टी सुरळीत होण्यासाठी आठवडय़ाभराचा कालावधी लागेल असे अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे 20 हजार लोकांनी मदत शिबीराचा आश्रय घेतला आहे.पद्दुचेरी शहरातील जनजीवन झपाटय़ाने पूर्वपदावर येत आहे. तिथे बचावदलाच्या अथक परिश्रमांमुळे शनिवारी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शहरातील वीजपुरवठाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातून पद्दुचेरीत जमलेल्या पर्यटकांच्या उत्सवावर पाणी पडले आहे. शहरात इंधनाचा तुटवडा भासत आहे. पर्यटनाच्यादृष्टीने शहर पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन आठवडय़ांचा कालावधी लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
केरळमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून वादळामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. तसेच सबरीमल्ला यात्रेसाठी आलेले हजारो भाविक अडकून पडले आहेत.
तातडीची मदत म्हणून सरकारने 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. वादळामुळे भरकटलेल्या चार भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली होती. त्यांची श्रीलंकेच्या नौदलाकडून मुक्तता करण्यात आली आहे. लंकेच्या ताब्यातील इतर भारतीय मच्छिमारांनाही मुक्त करावे अशी मागणी होत आहे.
थाने वादळ शमले असले तरी समुद्र अजून खवळलेलाच आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. श्रीलंकेच्या लष्कराने अटक केलेल्या पाच भारतीय मासेमारांची सुटका करावी या मागणीसाठी त्यांनी 18 डिंसेबर पासून मासेमारी बंद केली होती. आता खराब हवामानामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाता येणार नाही. 3 जानेवारीपासून मासेमारीसाठी समुद्रात जाता येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा