झरदारींविरोधातले खटले पुन्हा चालणार?
लष्कर, न्यायव्यवस्था आणि सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये (पीपीपी) निर्माण झालेला संघर्ष कमी करण्यासाठी राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांच्याविरोधातले खटले पुन्हा चालवावे, अशी विनंती पाकिस्तान सरकार स्वित्झर्लंडलडला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाहोर-लष्कर, न्यायव्यवस्था आणि सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये (पीपीपी) निर्माण झालेला संघर्ष कमी करण्यासाठी राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांच्याविरोधातले खटले पुन्हा चालवावे, अशी विनंती पाकिस्तान सरकार स्वित्झर्लंडलडला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
झरदारी यांच्याविरोधात कारवाई न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली होती. त्याचबरोबर कारवाईसाठी मोठय़ा प्रमाणात दबाव टाकण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने झरदारी यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, स्वित्झर्लंडलडच्या अॅटर्नी जनरलने कोणताही राजनैतिक अधिकारी किंवा घटनेने संरक्षण दिलेल्या व्यक्तीवर खटला चालवणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे झरदारी यांच्याविरोधात 16 जानेवारीला सुरू होणा-या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरच झरदारी यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
माजी लष्करी शासक परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात लाचमाफी प्रकरणातील तीन वरिष्ठ नोकरशहांना राष्ट्रीय उत्तरदायीत्व विभागाकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना मुशर्रफ यांनी काढलेल्या राष्ट्रीय माफी अध्यादेशाद्वारे लाच प्रकरणात माफी देण्यात आली होती. याच लाचमाफीच्या प्रकरणात झरदारी यांच्यासह आठ हजार जणांवर 16 जानेवारीला खटला सुरू होणार असून त्याचा निकाल अत्यंत स्फोटक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जर सरकारविरोधात निर्णय दिला तर त्याची अमलबजावणी करण्यासाठी न्यायव्यवस्था लष्कराची मदत घेण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.‘राष्ट्रीय हितासाठीच लोधी यांची हकालपट्टी’
मेमोप्रकरणी सरकार आणि संरक्षण विभागाची परवानगी न घेता थेट सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यामुळेच राष्ट्रहितासाठी लोधी यांची हकालपट्टी करण्यात आली, असे सरकारने स्पष्ट केले आहे. लष्करप्रमुख अशफाक कयानी यांचे निकटवर्तीय असल्यामुळे लोधी यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र, संरक्षण विभाग अणि कायदा विभागाची परवानगी न घेता सर्वोच्च न्यायालयात लोधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. ही बाब नियमांना धरून नसल्यामुळे राष्ट्रहितासाठी ही कारवाई केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
‘पाकिस्तानी जनतेला बदल हवा आहे’
वॉश्गिंटन- पाकिस्तानी जनतेला आता बदल हवा आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये परतणार आहे. त्यासाठी माझा जीव धोक्यात आला तरी चालेल. तो धोका मी पत्करायला तयार आहे, असे पाकिस्तानचे माजी लष्करी शासक परवेज मुशर्रफ यांनी म्हटले आहे. मुशर्रफ सध्या अज्ञातवासात असून त्यांनी दुबईतून एका खासगी वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. पाकिस्तानमध्ये परतण्याचा धोका मी पत्करू शकतो. मी त्यासाठी तयार आहे. पाकिस्तानी जनतेला माझी आवश्यकता आहे. आर्थिक-सामाजिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे फक्त राजकारण न करता पाकिस्तानमध्ये सत्ताबदल आवश्यक आहे. त्यात माझेही योगदान असावे, यासाठी मी पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुशर्रफ म्हणाले. दरम्यान, अमेरिकेवर ११ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही आला नसेल इतका दुरावा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात आला असल्याचे मत परवेज मुर्शफ यांनी व्यक्त केले आहे.
‘पाकिस्तानमध्ये बंडाची शक्यता कमीच’
न्यूयॉर्क-पाकिस्तानमध्ये लष्कराचा प्रभाव असला तरी लष्करी बंड करून सत्ताबदल करण्याची येथील लष्करी अधिका-यांची इच्छा तीव्र नसल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याबाबत सविस्तर वृत्त देण्यात आले आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानी लष्कराने 1958, 1969,1977 आणि 1999 मध्ये सरकार उलथवून लष्करी राजवट प्रस्थापित केली होती. मात्र, चालू स्थितीत सरकार उलथवून लष्करी राजवट प्रस्थापित करण्याची लष्कराची इच्छा तीव्र नाही. या आधीपेक्षा आताची परिस्थिती ही लष्कराच्या बाजूने नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कयानी यांनी घेतली झरदारींची भेट
इस्लामाबाद- लष्कर आणि सरकार यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख अशफाक कयानी यांनी राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली ते समजू शकले नाही. मात्र, लष्कर आणि सरकार यांच्यातील बेबनाव कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर कयानी आणि झरदारी यांची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मेमो प्रकरणानंतर शनिवारी पहिल्यांदाच कयानी आणि झरदारी यांची भेट झाली.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा