PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तानात तीन आत्मघाती हल्ल्यांत 45 ठार पाकिस्तानात तीन आत्मघाती हल्ल्यांत 45 ठार ================================================================================ पीटीआय on 02 July, 2010 07:30:00 PM लाहोर- पाकिस्तानमधील लाहोर शहरात दाता दरबार या सुफी दर्ग्यावर झालेल्या तीन आत्मघाती हल्ल्यांत 45 जण ठार तर अन्य 180 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दाता दरबार पूर्ण भरलेला असताना हे तीन आत्मघाती हल्ले झाले. पहिला स्फोट दर्ग्यातच झाला, दुसरा स्फोट दर्ग्याच्या तळघरात झाला तर तिसरा स्फोट दर्ग्याजवळील बाजाराच्या गर्दीत झाला. या आत्मघाती हल्ल्यातील 180 जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून यातील 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक जहीद परवेझ यांनी दिली.गुरुवारी रात्री दाता दरबार येथे झालेल्या तीन आत्मघातकींचे दर्गा हेच लक्ष्य होते. हा हल्ला दोघा आत्मघातक्यांनी घडवून आणल्याची माहिती विशेष पोलिस अधिक्षक चौधरी शफीक अहमद यांनी दिली. एका हल्लेखोराने स्वतःजवळ असलेल्या स्फोटकांचा तळघरात स्फोट केला तर दुस-याने ज्या ठिकाणी प्रार्थना सुरू होती त्या ठिकाणी स्फोट घडवून आणल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याची माहिती अहमद यांनी दिली. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नसल्याचेही त्यांनी सांगितले. हा हल्ला तालिबान्यांनीच घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानमधील तालिबान्यांनी या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही असे सांगत या हल्ल्यामागे परकीय दहशतवादी असल्याचे तालिबानचा प्रवक्ता अझीम तारीक याने वृत्तसंस्थेला सांगितले.दोन आत्मघातकी हल्लेखोर पोलिस, सुरक्षा रक्षक आणि तिथे असलेल्या कार्यकर्त्यांचे सुरक्षा कवच तोडून जबरदस्ती गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दर्ग्यात शिरले. एका हल्लखोराने पांढरा सलवार कुर्ता परिधान केला होता आणि त्याने हिरव्या रुमालाने तोंड झाकून घेतल्याचे दृश्य सीसीटीव्हीवर रेकॉर्ड झाले आहे. या हल्लेखोरानेच दर्ग्याच्या तळघरात स्वतःजवळील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. यानंतर पंधरा मिनिटांच्या अवधीनंतर दुस-या हल्लेखोराने भाविक जिथे प्रार्थनेसाठी जमले होते. तिथे स्फोट घडवून आणला. या हल्ल्यानंतर दाता दरबार दर्गा भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहेत.