PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चेसाठी इझ्रायल उत्सुक पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चेसाठी इझ्रायल उत्सुक ================================================================================ पीटीआय on 09 March, 2010 09:50:00 PM संयुक्त राष्ट्रे- शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पॅलेस्टाइनचे मन वळवण्याची विनंती इझ्रायलने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना केली आहे. पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी इझ्रायल उत्सुक असल्याचे इझ्रायलचे उपपंतप्रधान शालोम यांनी बान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले. पॅलेस्टाइनला थेट चर्चेसाठी येण्याचे आवाहन अमेरिका, रशिया, युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्रांच्या क्वार्टेटने करावे, अशी विनंती इझ्रायलने केली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर सध्या क्वार्टेटचे विशेष प्रतिनिधी आहेत. क्वार्टेटची बैठक येत्या 19 मार्च रोजी मॉस्को येथे होणार आहे. क्वार्टेटच्या बैठकीनंतर इझ्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये थेट चर्चा पुन्हा सुरू होऊ शकेल, अशी आशा बान यांनीही व्यक्त केली आहे. डिसेंबर 2008 मध्ये इझ्रायलने गाझा पट्ट्यात केलेल्या लष्करी कारवाईनंतर इझ्रायल आणि पॅलस्टाइनमधील शांतता चर्चा खंडित झाली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने चर्चा करण्यास पॅलेस्टाइनने तयारी दर्शवली आहे. मात्र पॅलेस्टाइनला थेट चर्चेसाठी तयार करण्याचे आवाहन इझ्रायलने संयुक्त राष्ट्राला केले आहे.