एक दिवस ‘विकिपीडिया’शिवाय!
अमेरिकेच्या इंटरनेट पायरसी विधेयकाचा विरोध करण्यासाठी विकिपिडिया आणि इतर लोकप्रिय वेबसाइट्सनी आपल्या साइट्सचे होमपेज काळ्या स्वरुपात प्रदर्शित केले.
न्यूयॉर्क- जगभरच्या नेटकरांसाठी ऑनलाइन ज्ञानभांडार असलेल्या विकिपीडियाने बुधवारपुरते ‘काम बंद’ आंदोलन पुकारत अमेरिकेच्या ‘इंटरनेट पायरसीविरोधातील विधेयका’चा अभिनव निषेध केला. जगभरातील इतर अनेक वेबसाइट्सनी आणि काही भारतीय संकेतस्थळांनीही या प्रस्तावित मुस्कटदाबीच्या निषेधार्थ त्यांच्या होमपेजवर काळ्या फिती लावल्या होत्या. या निषेधामध्ये सहभागी झालेल्या गुगलच्या होमपेजवरील लोगोवरही ‘काळी फीत’ दिसत होती.
‘विद्यार्थ्यांनो तुमचा गृहपाठ लवकर आटपा’ असे विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनी मंगळवारीच ‘काम बंद’ची घोषणा करताना सांगितले होते. आम्ही माहिती जमवण्यासाठी गेल्या दशकात कोटय़वधी तास दिले आहेत. त्याद्वारे आम्ही इंटरनेटच्या महाजालावरील माहितीचा ‘महाकोष’ तयार करू शकलो. त्यावर अमेरिकन काँग्रेस आपल्या विधेयकाद्वारे निर्बंध लादू इच्छिते, असे विकिपीडियाच्या वेबसाइटवर म्हटले आहे.
गुगलनेही त्यांच्या लोगोवर आयताकृती काळी पट्टी प्रदर्शित करून आपला निषेध व्यक्त केला. याशिवाय बोइंग बोइंग, रिडिट, फेसबुक, ट्विटर यांनीही निषेध दर्शवला.
‘एंड पायरसी, नॉट लिबर्टी’
या काळ्या पट्टीवर क्लिक केल्यावर ‘एंड पायरसी, नॉट लिबर्टी’ असा पायरसी संपवा परंतु स्वातंत्र्य संपवू नका, असे शीर्षवाक्य असलेल्या एका विशेष पेजवर आपण दाखल होतो. ऑनलाइन पायरसीला आळा घालणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा चोरटय़ा वेबसाइटला मिळणारा निधी रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांच्या माध्यमातून या वेबसाइट बंद करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. मात्र, अमेरिकन सोशल नेटवर्क कट्टे, ब्लॉग आणि सर्च इंजिनांवर सेन्सॉरशिप लादण्याची गरज नाही, असे या पेजवरील संदेशात म्हटले आहे.
निषेध कशाचा?
अमेरिकन काँग्रेसच्या प्रस्तावित ‘स्टॉप ऑनलाइन पायरसी अॅक्ट’ (सोपा) आणि ‘प्रोटेक्ट आयपी अॅक्ट’ (पीपा) या दोन विधेयकांना विकिपीडिया, गुगलसह अनेक साइट्सचा विरोध आहे.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा